स्वतःच्या दुःखातून उभारी घ्यायची असेल तर इतरांच्या दुःखात सामील व्हा.
प्रत्येकाला आपलेच दुःख मोठे वाटते.अनेकजण ते दुःख कित्येक वर्षे कुरवाळत बसतात.काही जण तर म्हणत असतात की, ‘तुम्हाला नाही कळणार, माझं दुःख, मी काय काय भोगले आहे ते’.पण किती जरी मोठे दुःख असले तरी देखील त्याची पातळी कधी ना कधी कमी होतेच.कित्येकदा ते दुःख दुःख देखील नसते तर तक्रारी, अपेक्षा असतात.आणि माणूस त्यालाच मोठे करत जातो.पण आयुष्यभर जर दुःख दुःख करीत बसलो तर पुढे जाता येत नाही, प्रगती करता येत नाही.
दुःख प्रत्येकाला असते.कोणाला काही आर्थिक अडचणी, मानसिक समस्या, नातेसंबंध, प्रेम, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू या बाबतीत समस्या , शैक्षणीक , कार्यालयीन जीवनातील काही अडचणी असतात.जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत समस्या ,दुःख हे असणारच आहे.आणि हे प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच ह्या दुःखातून बाहेर जितक्या लवकर पडता येईल तितक्या लवकर पडणे अपरिहार्य असते.आणि तुम्हाला जर का स्वतःचे दुःख मोठे वाटत असेल किंवा त्यातून बाहेर कसे पडावे हे समजत नसेल तर इतरांच्या दुःखात सामील व्हा.
आपण कल्पना करू शकत नाही इतके दुःख ह्या जगात आहे.कोणाला दोन वेळेस चे अन्न मिळत नाही, तर कोणाच्या डोक्यावर छप्पर नाही, कोणाला वस्त्र नाहीत.ह्या तर अगदी मूलभूत गरजा आहेत.पण आपल्या समाजात ह्या देखील अनेकांच्या आज पूर्ण होत नाहीत.हातावरचे पोट असणारे, रात्री फक्त पाणी पिऊन झोपणारे कित्येक जण आहेत.रस्त्यावर लाखो लोक आजही झोपलेले आहेतच. ह्या समाजातील घटकाला शिक्षण, इंटरनेट, विज्ञान याचा गंध च नाही.आणि आपण आपल्या क्षुलल्क तक्रारी, दुःखे घेऊन बसलो आहोत.कधी तरी ह्या लोकांचे आयुष्य जवळून पाहण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या दुःखाचे हसू येईल.
दिव्यांग असणारी माणसे पाहा, उच्च शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभी तर आहेतच पण स्वतःच्या कुटुंबियांना देखील आधार देत आहेत, कित्येकांना प्रेरणा देत आहेत.कधी तरी त्यांच्याशी बोलून पाहा. खऱ्या अपेक्षा, दुःख, यातना काय असतात याची जाणीव होईल.
एखाद्या घरात कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावतो. त्या घरातील लहान मुलांवर, घरातील स्त्रियांवर सर्व जबाबदारी येऊन पडते.अचानक सुस्थितीत असलेले घर कोलमडते.त्यांना जाऊन विचारा दुःख काय असते.स्वतःच्या दुःखाची पातळी तुमची नक्कीच कमी होईल.आधार काय असतो ते त्यांना विचारा. त्यांचा चेहराच तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे कदाचित देऊन जाईल.
एखाद्याने साथ सोडली तर कसे वाटते हे घटस्फोटित व्यक्तींना विचारा. नाते तुटणे म्हणजे काय असते हे त्यांना विचारा. लग्नाचे खरे महत्व, पती-पत्नी नाते याची महती तुम्हाला त्यांच्याकडून समजेल.आणि तुमच्या अवाढव्य अपेक्षा तिथेच थांबतील.
अशी अनेक उदाहरणे आहेत,जिथे दुःख हे पाचवीला पुजलेले आहे.पण तरी देखील ती माणसे मन भक्कम करून स्वतःची प्रगती करीत आहेत.मग आपण पण का करू नये? किती जरी मोठे दुःख असले तरी त्यातून उभारी घेणे देखील गरजेचे असते.सहानुभूती मिळण्याची अपेक्षा ठेवून जगणे कधीच उचित ठरत नाही.
जेव्हा कधी मनात दुःख साचलेले असेल तेव्हा उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहा, त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा, शक्य असेल तिथे त्यांना मदत करा.तुम्ही स्वतःचे दुःख विसरू शकाल. तुम्हाला रडू वाटत असेल तर रडून मोकळे व्हा, कोणाशी त्या विषयी काही बोलू वाटत असेल तर बिनधास्त बोला पण दुःखाला कवटाळून राहू नका.
आज अनेक माणसे शारीरिक आजारांनी ग्रासलेली आहेत.पण ह्या बरोबरीने मानसिक आजार देखील भयंकर वाढलेले दिसत आहेत.प्रत्येक माणसाला आज काही ना काही मानसिक समस्या आहे. पण ती सोडविणे, त्यावर Solution काढणे हे ज्याच्या त्याच्या हातात नक्कीच आहे.आणि हे करण्यासाठी एका सकारात्मक, निरोगी मानसिकतेची नितांत गरज आहे.
आणि ही मानसिकता तेव्हाच तयार होईल जेव्हा आपण स्वतःच्या कोषातून बाहेर पडू आणि जगाकडे एका वेगळ्या नजरेने पाहू.माणूस फक्त निरिक्षणाने देखील खूप काही शिकू शकतो.हे जग एक शाळा आहे. तुमची दृष्टी तशी ठेवा, हीच दृष्टी तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करेल.
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

