माणूस असेपर्यंत कदर केली जात नाही आणि गेल्यानंतर गुणगान गायले जाते…असे का बरे..?
जन्म-मृत्यू हे चक्र कोणाला चुकलेले नाही.जो जन्माला येतो, तो कधी ना कधी जाणारच असतो…मृत्यू पावणार असतो.फक्त प्रत्येकाची जन्म-मृत्यू ची वेळ वेगवेगळी.जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. आणि ह्या प्रवासात प्रत्येक माणसाला अनेक माणसे भेटतात.
आणि आयुष्य त्या त्या प्रमाणे बदलत जाते.प्रत्येक जण वेगवेगळा. प्रत्येकाचे स्वभाव विभिन्न.आणि ह्या सगळ्यात सर्वात महत्वाचे ठरते ते म्हणजे ‘माणसाचे वर्तन’.माणूस दुसऱ्या माणसाशी कसा वागतो हे फार महत्वाचे ठरते.ह्या लेखात आपण एका कॉमन मानसिकतेविषयी बोलणार आहोत.आणि ती मानसिकता म्हणजे : ‘माणूस असेपर्यंत कदर केली जात नाही आणि गेल्यानंतर गुणगान गायले जाते…’.का बरे असे अनेकदा घडते?
ह्या अनेक, विविध कारणे आहेत.जो पर्यंत एखादी व्यक्ती जगात असते, आपल्या अवती भवती असते, तो पर्यंत आपल्याला त्या व्यक्तीचे खरे महत्व असतेच असे नाही.कदाचित आपण त्या व्यक्तीला गृहीत धरलेले असते.ती व्यक्ती आपल्या सदैव उपयोगी पडते,आपल्यासाठी नेहमी उपलब्ध असते,त्यामुळे तिला गृहीत धरून चालण्याचे प्रमाण वाढते.आणि जेव्हा ती व्यक्ती कायमची निघून जाते तेव्हा तिची आठवण काढून गुणगान गायले जाते.
आपल्यामधील काही व्यक्ती खूप अहंकारी असतात.त्यांच्या अवती भवती ज्या काही चांगल्या व्यक्ती असतात, त्यांची स्तुती करणे, त्यांचे धन्यवाद मानणे ,त्यांना कमी पणाचे वाटते.त्यांनी त्यांच्यासाठी किती जरी केले तरी ते स्वीकारत नाहीत आणि ‘Thank You’ म्हणण्याची तसदी देखील घेत नाहित. त्यांचा हा अहंकार कायम राहतो.आणि जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा मात्र मग इतरानजवळ हीच माणसे त्या व्यक्तीचे अगदी पोवाडे गातात.
काही व्यक्ती सदैव दुसऱ्याचा द्वेष, मत्सर करणाऱ्या असतात.एखाद्याचे चांगले त्यांना पाहवत नाही.आयुष्यभर त्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मानत जळफळाट च असतो.मग या मानसिकतेमुळे ते त्या व्यक्तीची कदर करीत नाहीत.आणि माणूस गेल्यानंतर मात्र मग चांगले चांगले बोल बोलले जातात.
काही व्यक्ती खूपच आत्मकेंद्रित असतात.स्वराच्या पलीकडे त्यांना दुसरे काहीच दिसत नाही.काही काही वेळेस हा आत्मकेंद्रितपणा स्वार्थी रूप धारण करतो.मग तो माणूस फक्त स्वतःपुरताच विचार करू लागतो आणि तसेच जगू लागतो.तशी सवयच त्याला लागून जाते.मग कोणी त्याच्यासाठी किती जरी करीत केले तरी त्याला त्याची कदर राहत नाही.आणि मग कालांतराने त्या व्यक्ती गेल्यावर ही माणसे जागी होतात.
आजकाल ‘व्यस्त असणे’ हा एक प्रकारचा आजरच झाला आहे जणू.प्रत्येकाला आज घाई घाई आहे.रस्त्याने जाताना थोडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की, जो तो नुसता धावत आहे.त्यात ‘मोबाईल फोन चे व्यसन’.ज्याने जग जवळ आणले आहे पण जवळची माणसे दुरावत चालली आहेत.आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे,माणुस एकमेकांची किंमत विसरू लागला आहे.कदर करेनाशी झाला आहे.
अशी काही मानसिक कारणे आहेत, की माणूस गेल्यानंतर च त्याचे गुणगान गायले जाते.असेपर्यंत नाही.ही व्यक्ती कायम आपल्या भोवती असणारच आहे ह्या अविर्भावात आपण जगतोय.पण कुठेतरी खूप जास्त चुकतोय देखील.कोण आपल्या आयुष्यात किती काळ असणार माहिती नाही.म्हणून जे काही बोलायचे आहे, व्यक्त करायचे आहे, त्या व्यक्तीला सांगायचे आहे ते आज, आता केले पाहिजे.नाहीतर मग खंत करण्याची वेळ येऊ शकते.
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
