Skip to content

अस्वस्थता ही मुळात मनाची नसते, ती आधी बाहेरून आत शिरते आणि मग मनाची होते.

अस्वस्थता ही मुळात मनाची नसते, ती आधी बाहेरून आत शिरते आणि मग मनाची होते.


For every effect there is a definite cause, likewise for every cause, there is a definite effect..

प्रत्येक गोष्टीला काही ना काही कार्यकारणभाव असतो. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, प्रसंग, एखाद्या विशिष्ट गोष्टीबाबत असलेले आपलं वागणं यामागे काहीतरी पार्श्वभूमी असते. उगाच माणूस त्या पद्धतीने वागत नसतो. माणसाचं अस्वस्थ होणं ही त्यातलाच एक भाग आहे.

माणसाच्या वागण्यात, स्वभावात विचारांचा मोठा वाटा आहे. आपले विचार आपल्या एकंदरीत आयुष्यावरच प्रभाव पाडत असतात. पण त्याचबरोबर आजुबाजुला घडणारे प्रसंग, समाज यांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. त्यांचही योगदान असतं. म्हणूनच लहानपणी घडलेल्या त्रासदायक गोष्टी, वाईट अनुभव, अपघात माणसाच्या मनावर पुढच्या आयुष्यात परिणाम करतात.

व्यक्ती बरेचदा अस्वस्थ असण्यामागे पण बरीच कारणे असतात. करिअरची चिंता, वैवाहिक जीवन, आर्थिक प्रश्न अश्या बऱ्याच गोष्टी आयुष्यात घडतं असतात आणि हे आयुष्यातील वास्तव प्रश्न आहेत. यातील कोणत्याच गोष्टीतून कोणी गेलं नाही असं होत नसतं. प्रत्येक व्यक्ती यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीला सामोरे जातेच. हे असं सामोरे जातानाच व्यक्ती विविध भावना अनुभवायला लागते. सर्वांना परिस्थितीशी जुळवून घ्यायला, खंबीरपणे दोन हात करायला जमत नाही.

आपण मनात ठरवलेल्या गोष्टी आणि वास्तव यात जेव्हा तफावत निर्माण होते तेव्हा मनाच्या मनावर एकप्रकारचा ताण, अस्वस्थता यायला लागते. काहीच कारण नसताना कोण अस्वस्थ, उदास असत नाही. याची सुरुवात व्हायला काही ना काही घडलेलं असतं. ते कारण शोधून काढणं गरजेचं असतं.

इथे पण माणसाची बरेचदा गल्लत होते. आपण आपल्याला अस्वस्थ करणारे प्रसंग, घटना किंवा माणसं यात ही कारण शोधत राहतो किंवा त्यांच्यावर आपली मनस्थिती पूर्णपणे अवलंबून आहे असं समजतो. हे खरं आहे की ह्या सर्व गोष्टी कुठेतरी कारण बनून आपल्याला अस्वस्थ करतात. आपल्या मनात येते.

पण हे देखील तितकंच खरं आहे की ही अस्वस्थता टिकवून ठेवण्याचं काम मात्र आपले विचार करतात. एकच प्रसंग तीन वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारे अस्वस्थ करून शकतो. त्याचा कालावधी पण वेगळा असू शकतो. म्हणूनच मनाची ही अस्वस्थता आपल्याला कमी करायची असेल, आपल्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवायचं असेल तर आपल्या विचारांना आधी ताब्यात ठेवता आलं पाहिजे.

प्रसंग, घटना घडत राहतात ते आपल्याला बरेचदा अस्वस्थ करून जातात. कारण माणूस भावनाशील प्राणी आहे. त्याला सर्व भावना जाणवणार. त्या किती काळ टिकवून ठेवायच्या हे मात्र आपल्या हातात आहे. ते जमलं तरच आपली अस्वस्थता कमी होईल.

लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अस्वस्थता ही मुळात मनाची नसते, ती आधी बाहेरून आत शिरते आणि मग मनाची होते.”

  1. खूप छान जगत असताना विचार करण्याची क्षमता मिळते
    प्रसंग घडत असतील तर बळ मिळते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!