प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती चुकते,तेव्हा तिच्याकडे स्पष्टीकरण लगेच तयार असते.भले ती व्यक्ती ती चूक मान्य करो अथवा न करो,ती स्पष्टीकरण मात्र लगेच देते.असे प्रत्येक व्यक्तींबाबत असेलच असे नाही.काही व्यक्ती प्रामाणिकपणे चूक कबूल करतात आणि चूक सुधारतात.पण बऱ्याच व्यक्ती अशा देखील नसतात.ते ह्या अविर्भावात असतात की , मी जे काही केले ते चुकीचे नाही आणि जरी तुम्हाला ते चूक वाटत असेल तरी ते मी ह्या ह्या कारणास्तव केले आहे.आणि असे बोलून झाले की ,त्यांना वाटते की आपण चुकलोच नाही. पण वास्तविक पाहता, प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही.
अनेकदा काहींना हे असे वाटत असते कारण ते समोरच्या व्यक्तीला गृहीत धरत असतात.आणि त्यामुळे त्यांना त्यांची चूक कधी दिसतच नाही.एखादी व्यक्ती त्यांना सदैव समजून घेत असते,त्यांच्या चुका पाठीशी घालत असते त्यामुळे त्यांचा असा गैरसमज होतो की , ही व्यक्ती प्रत्येक वेळी आपल्याला ,आपल्या चुकांना समजून घेईल आणि मग आपण चुकलो तरी स्पष्टीकरण दिले की आपले काम झाले.असा त्यांचा दृष्टिकोन असतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार..Ego.एखाद्या व्यक्तीला अहंकार जर असेल तर ती व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करीत नाही.चूक जरी असेल तरी ते असे स्पष्टीकरण देतात की जणू समोरची व्यक्तीच आपल्यावर चुकीचे आरोप करीत आहे किंवा त्या व्यक्तीला कित्येकदा अहंकारी व्यक्ती वेड्यात काढते.आणि दुसऱ्यावर सर्व काही ढकलून मोकळी होते.
पण असे बिलकुल नाही.वरवर अशा काही व्यक्ती असे दाखवतात की, माझी काहीच चूक नाही आणि मी काही मुद्दाम चूक केली नाही.पण म्हणतात ना ,’दिसते तसे नसते’.कारण, प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही.
ज्या व्यक्तींना स्वतःच्या चुकांवर पांघरून घालायचे असते किंवा चूक लपवायची असते, ती मान्य करायची नसते, तेव्हा त्या व्यक्ती खूप स्पष्टीकरण देऊ लागतात.कित्येकदा भावनिक होऊन बोलतात.समोरच्या व्यक्तीची सहानुभूती मिळवतात आणि आपला डाव साधून घेतात. अशी मानसिकता असणाऱ्या व्यक्ती खूप स्वार्थी आणि घातक असतात.
जर स्वतःचे आणि इतरांचे मानसिक आरोग्य जपायचे असेल तर जेव्हा कधी आपल्याकडून चूक होते तेव्हा ती मोठ्या मनाने स्वीकारता आली पाहिजे.समोरच्या व्यक्तीला ‘Sorry’ म्हणता आले पाहिजे.माफी मागणे काही जणांना कमी पणाचे वाटते ,तेव्हा देखील जेव्हा त्यांची स्वतःची चूक असते.पण अशा व्यक्ती नकारात्मक मानसिकता असणाऱ्या असतात.या उलट काही १% अशा व्यक्ती असतात जे स्वतःची चूक लगेच मान्य करतात आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची देखील शाश्वती देतात.
पण आज जगात हा प्रामाणिकपणा कुठेतरी लोप पावत चालला आहे.विश्वास हरवत चालला आहे.माणूस आत्मकेंद्रित बनून स्वार्थीपणाकडे त्याची वाटचाल सुरू आहे.आणि हे खूप भयंकर आहे.वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात तुम्हाला देखील असे अनुभव येत असतील ,तुमच्या सानिध्यात लोक तुमच्याबरोबर असे वागत असतील किंवा कधी आपल्याकडून देखील असे होत असेल.
पण ह्या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ सांगायचा म्हणजे, चूक ही चूकच असते मग तुम्ही त्याचे कितीही गोड स्पष्टीकरण दिले तरी देखील. फक्त हे कळण्यासाठी मनाचा मोठेपणा,समजूतदारपणा ,शिस्त ,सद्सद्विवेकबुद्धी, इतरांबद्दल आदर ह्या गोष्टी अंगी असणे किंवा नसतील तर त्या अवलंबण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तुम्हाला आयुष्यात समाधानाने ,मानसिक शांततेने जगायचे असेल तर ,स्वतःची चूक स्वीकारता यायला हवी. आणि मग ती चूक सुधारून स्वतःवर काम करता आले पाहिजे.उगाच इतरांना दोष देऊन किंवा चुकांच निरासन करून आपण स्वतःचीच प्रगती रोखत असतो.
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.