आयुष्य आहे, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत राहतील, पण त्यांना डोक्यात जाऊ देऊ नका..
दिव्याचा मुड खूप खराब झाला होता, तिचं कामात देखील लक्ष लागत नव्हतं. सकाळी मीटिंगमध्ये जे काही झालं ते तिच्या डोक्यातून काही केल्या जाईना. माझी अशी काय चूक झाली होती म्हणून मला इतकं बोलून घ्यावं लागलं? कामाप्रती इतकं प्रामाणिक राहायचं, मेहनत करायची आणि तरी देखील सर्वांसमोर आपल्यालाच बोलणं खावं लागतं. डोक्यात चालू असलेले हे प्रश्न आणि विचार तिला हैराण करत होते.
दिव्याला जॉबला लागून काही महिनेच झाले होते. अजूनही ती शिकण्याच्या प्रक्रियेतच होती. रोज नव्याने गोष्टी शिकत होती, त्यानुसार काम करत होती. सर्व अनुभवच तिच्यासाठी नवीन होता. तिला जस जसं समजत जाईल तश्या पद्धतीने ती काम करत होती. त्यामुळे चुका होत होत्या. अश्या परिस्थितीमध्ये तिच्याकडून खूप जास्त अपेक्षा करून तिला ओरडणं हे तिच्या मनाला पटेना. तिला याचा त्रास होऊ लागला होता.
कामावरचे रोजचेच दिवस तिला अगदी वाईट जात किंवा रोज तिच्या मनाविरुद्ध काही घडतं होत अश्यातला भाग नव्हता. पण तरी सर्व गोष्टीसाठी कळत नकळत तिला जबाबदार धरलं जाणं हे तिला मान्य नव्हतं. खूप वेळ झाला दिव्या याच विचारात बसली होती. जानकीने तिला पाहिलं. एरवी दिव्या काही ना काही बोलत बसायची, बडबड करायची. आज मात्र मीटिंग झाल्यापासून ती शांत बसली होती.
तिच्या अश्या शांत बसण्याच कारण काही प्रमाणात जानकीला माहीत होतं. तरी ती दिव्याशी बोलायला गेली. “काय झालं दिव्या? अशी शांत का बसली आहेस? काहीच बोलत नाहीस. मीटिंगमध्ये काय झालं मी पाहिलं पण जे झालं ते झालं, कितीवेळ तेच घेऊन बसणार. सोडून दे ग.” त्यावर दिव्या रडवेली होऊन म्हणाली, “जानकी तुम्ही पाहिलं ना, तिथे काय झालं. जानकी तिची सिनियर होती, त्यामुळे ती अस बोलत असे. माझी सर्व काम मी वेळेवर करून देखील मला बोलणं ऐकावं लागलं. कसा मुड चांगला राहील माझा?”
“तू म्हणतेस ते सर्व बरोबर आहे, तुझी काही चूक नाही. पण रोजचा दिवस सारखा असतो का? आज आपल्या मनासारखं झालं म्हणून गरजेचं नाही ना दुसरा दिवस पण तसाच जाईल. आपल्या मनाविरुद्ध पण काही गोष्टी घडतात. त्यांना पण आपण सामोरं गेलं पाहिजे.” तिचं बोलणं ऐकून दिव्या म्हणाली, “तुम्हाला पण इतकं बोलतात, तरी तुम्ही शांत कश्या राहता? तुम्हाला वाईट वाटत नाही का?”
जानकी हसून म्हणाली, “अगं तेवढ्यापुरतं वाटणारच, पण मी त्या गोष्टी माझ्या डोक्यात जाऊच देत नाही. तिथेच सोडून देते. एखाद्या गोष्टीचा किती त्रास करून घ्यायचा, त्याला कितीवेळ धरून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हातात आहे ना! गरम पेला हातात घेतला की चटका लागणार, म्हणून तर आपण तो लगेच सोडतो. तो धरून ठेवण्यात कसलं शहाणपण आहे. तुला पण ही गोष्ट लक्षात येईल.”
दिव्याने जानकीच्या या बोलण्यावर विचार केला. फक्त विचारच नाही तर तसं वागायला देखील सुरुवात केली. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची, खूप विचार करायचा तिचा जो स्वभाव होता तो तिने हळू हळू कमी केला. कामात जिथे सुधारणा गरजेच्या होत्या तिथे ती करतच होती, त्याबद्दल तिला काही ऐकून घ्यावं लागलं तर ती ऐकत होती. पण त्याचा त्रास करून घेत नव्हती. आधी सारखं सर्व अंगावर ओढवून घेत नव्हती. याचा परिणाम तिला जाणवू लागला जो खूप चांगला होता. तिचा त्रास देखील कमी झाला आणि कामातदेखील तिचं लक्ष लागू लागलं.
जानकीने सांगितलेली ही गोष्ट फक्त कामाच्या ठिकाणी नाही तर सर्वच ठिकाणी लागू होते. कारण परिस्थिती दर वेळी आपल्या हातात असत नाही. त्यामुळे आपल्या हातात जे आहे ते आपण करावं आणि योग्य पद्धतीने ती परिस्थिती हाताळावी.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


All time Best