प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही.
माणसाकडून ज्या चुका होतात त्यातून बरेचदा तो शिकतो, चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे त्याला समजत, यापुढे कसे वागले पाहिजे याची स्पष्टता येते. माणसाची व्याख्याच चुकू असणारा व गुंतागुंतीचा प्राणी अशी आहे. पण या सर्व गोष्टी कधी विचारात घेणं गरजेचं असतं जेव्हा व्यक्तीकडून एकदा चूक झाली की ती अपराधीपणाच्या गर्तेत खोल बुडून जाते.
आयुष्यात काही असे प्रसंग घडले, मनात नसताना काही गोष्टी कराव्या लागल्या, चुका झाल्या तर माणूस स्वतःला खूप दोषी मानू लागतो, अपराधी मानू लागतो. या अपराधीपणाची जाणीव कमी करण्यासाठी, त्याला तो चुकू शकतो, त्यातूनच तो शिकत पुढे जाणार आहे हे सांगणं गरजेचं असतं. तेव्हाच तो स्वतः ला स्वीकारून, स्वतः च्या चुका स्वीकारून पुढे जाऊ शकत असतो.
पण आधी म्हटल्याप्रमाणे ही या गोष्टीची एक बाजू झाली. एक असतं चूक झाल्यावर स्वतःच्याच नजरेतून उतरणं आणि एक असतं आपल्याकडून कितीही चुका झाल्या तरी त्याचं स्पष्टीकरण देत राहणं. दर वेळी माझी कशी चूक नव्हती, त्यावेळची परिस्थिती तशी होती म्हणून मला तसं वागणं भाग पडलं यासारखी अनेक कारण दिली जातात.
ही गोष्ट खरी आहे की काही चूक झाली तर इतर माणसं, परिस्थिती यासारख्या गोष्टींचा तितकाच सहभाग असतो. पण यातून हे सत्य बदलत नाही की की आपल्याकडून देखील चूक झाली आहे. जेव्हा व्यक्ती चूक झाल्याचं माणूस करते तेव्हा ती त्याची जबाबदारी घेते ज्यातून ती सुधारण्याची शक्यता वाढतात.
परंतु जेव्हा व्यक्ती दर वेळी चुकांचे स्पष्टीकरण देऊ लागते तेव्हा ती जबाबदारी झटकते. ज्यामुळे चुका सुधारण्याच्या शक्यता कमी होतात. अशी बरीच उदाहरण घेता येतील, मला ड्रिंक वैगरे करायचं नसतं, पण बाकीच्यांच्या दबावामुळे मला प्यावी लागते. मला तुझ्यावर रागवायचे नव्हते, पण माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्यादिवशी कामाच्या ताणामुळे मी अस वागले/वागलो.
काही प्रसंगी या गोष्टी खऱ्या असतीलही, पण प्रत्येक वेळी आपण आपल्या चुकांचे स्पष्टीकरण देत असू तर याचा अर्थ आपली काहीच चूक नाही असं होत नाही. घडलेल्या गोष्टीसाठी आपण देखील काही प्रमाणात जबाबदार असतो. याच कारण, कितीही काहीही झालं तरी जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत कोणीही आपल्यावर दबाव टाकू शकत नाही.
ती वेळ मारून नेण्यासाठी, नातं टिकवून ठेवण्यासाठी, पुढचे संघर्ष टाळण्यासाठी माणूस बरेचदा स्पष्टीकरण देतो, पण यातून त्या माणसाचं जास्त नुकसान असतं. समोरची व्यक्ती आपल्या चुका जास्तीत जास्त कितीवेळ सहन करू शकते? ती सीमा संपली की त्याचा नात्यावर परिणाम होतोच. म्हणून माणसाने चुका झाल्या तर त्याचं स्पष्टीकरण न देता त्याला मान्य करून ती सुधारता कशी येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यातच खरं शहाणपण आहे.
लेख कसा वाटला? फेसबुकच्या कमेंट सेक्शन मध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Good