Skip to content

“कोणीही, कधीही आणि कसंही आपल्याला संपवू शकेल, इतकी कमजोर नसावी आपली मानसिकता..”

“कोणीही, कधीही आणि कसंही आपल्याला संपवू शकेल, इतकी कमजोर नसावी आपली मानसिकता..”


“जिंदगी की यहीं रीत हैं,
हार के बाद ही जीत हैं..
थोड़े आंसू हैं , थोड़ी हंसी,
थोड़े ग़म हैं तो कल हैं ख़ुशी….

नुकतीच नितीन चंद्रकांत देसाई या विख्यात कलादिग्दर्शकाने आत्महत्या केल्याचं आपण सगळ्यांनीच वाचलं. अतिशय दुःखद, धक्कादायक होती ही घटना..कारण काहीही असो. मनात अनेक विचार आले. त्यांना का वाटलं असेल असं करावसं?? एवढा मोठा माणूस! त्याला एकही जवळचा मित्र नसावा मनमोकळ करायला? एकही अशी व्यक्ती त्याला मदत करणारी नसावी? प्रत्येक व्यक्ती आजच्या वेगवान जगात आणि या अफाट गर्दीत एकटी आहे का बेटासारखी?? अजूनही मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं वाटत नाही आपल्याला? का?

असे अनेक बरे वाईट विचार अस्वस्थ करून गेले. या त्यांच्या आत्मघाती कृती मागे किती आधीपासून विचार, भावना असतील? आत्महत्येच्या निर्णयाप्रत येईपर्यंतचा त्यांचा प्रवास किती वेदनादायी असेल! एवढ्या मोठ्या लोकप्रिय कर्तृत्ववान माणसाला जगण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग सापडू नये? किती दुर्दैवी आहे हे!

तरीही कोणाच्याही आत्महत्येचं समर्थन होऊ शकत नाहीच. मिळालेलं आयुष्य समर्थपणे जगायला नक्कीच खूप सामर्थ्य लागतं. खूप तडजोडी कराव्या लागतात. आणि इतक्या सहजी आयुष्य उधळून नाही टाकता
येत.

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र वेगळी असते. तिची मानसिकता वेगळी असते. एकाच प्रसंगाकडे, अनुभवाकडे बघण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगळी असते. जीवन खूप सुंदर आहे पण तरीही ते जगणे मात्र सोपे नाही. “एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे” असंच हे जीवनाचे वस्त्र माणसाला विणावं लागतं.

कित्येक दुःखाचे, विवंचनेचे, कोलमडून पडण्याचे प्रसंग आयुष्यात येतात. पण त्यांना धीराने सामोर जायचं असतं. त्यापासून पळ काढायचा नसतो. प्रत्येक अडचणीवर मात करण्याची आपली सक्षम, समर्थ मानसिकता असायलाच हवी. “हे सांगणं सोपं आहे, निभावणं तेवढेच कठीण” हे माहित आहे. तरीही प्रत्येकाने आपली मानसिकता सक्षम करायला हवी, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच मानसशास्त्र महत्वाचे आहे. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य अत्यंत गरजेचे आहे.

आपली मानसिकता इतकी कमजोर असता कामा नये की कोणतीही वाईट वेळ, एखादी व्यक्ती आपल्याला संपवू शकेल. तुम्ही मनाने मजबूत, समर्थ, ठाम असाल तर तुम्हीं कोणत्याही असह्य दुःखातून, घटनेतून बाहेर येऊ शकता. शेवटी काय! “सर सलामत तो पगडी पचास” आज आपण अशा कित्येक व्यक्ती पाहतो, ज्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावर समर्थपणे, सकारात्मकतेने संपूर्ण मात पुन्हा आपलं आयुष्य सुंदर जगत आहेत.

आज आपण ठामपणे उभे राहिलो, स्वतःला जगवत ठेवलं तर कशावरही मार्ग काढू शकतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच. अशावेळी कमकुवत मनाची माणसं “सगळं संपलं” अशी गैरसमजुत करून घेतात. “आयुष्य संपलं, आता काही उरलं नाही.” अशा नैराश्याच्या गर्तेत जातात. आणि मग स्वतःला संपवतात.

“तुमच्या आयुष्यापेक्षा काहीही मोठं, महत्त्वाचं असूच शकत नाही.” कितीही मोठा, बांका प्रसंग उभा राहिला तरीही शांत, स्थिर मनाने विवेकी, सकारात्मक विचारसरणीने आपण निश्चित मार्ग काढू शकतो. योग्य वेळी योग्य माणसांशी संवाद साधून आपण कठीण प्रसंगातून बाहेर येऊ शकतो. थोडा काळ जाऊ दिला तरीही मार्ग निघू शकतो. काळ हे सर्वात प्रभावी औषध आहे. यासाठी मनाची ताकद मात्र फार मोठी असावी लागते.

आज प्रत्येक लहान मोठी व्यक्ती फक्त पैशाच्या मागे धावताना दिसते. व्यवहार्य आणि सकारात्मक निर्णय क्षमता कमी पडतेंय. मोठी स्वप्नं जरूर बघावीत पण इतकीही नाही की आपला जीव गमवावा लागेल. मग पैशांची अडचण आली किंवा एकदम शून्यावर यायला झालं की ही माणसं कोलमडून पडतात आणि आत्महत्या करतात. “अंथरूण पाहून पाय पसरावे.” ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.

आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद पाहूनच आपल्या आयुष्याचे, भविष्याचे निर्णय घ्यायला हवेत. आपल्या आयुष्याची, आपल्या जगण्याची प्राधान्यता ही आपणच ठरवायची. मित्राने मर्सिडीज घेतली म्हणून आपण कर्ज घेऊन मर्सिडीज नाही घ्यायची. आपल्याकडे तर “ऋण काढून सण साजरे” करायची पद्धतच आहे. आणि मग कर्ज फेडता आले नाही की नैराश्य येतं. कमजोर मानसिकतेमुळे दुसरा मार्ग दिसत नाही. प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे आपण कोणालाही काहीही सांगत नाही. मग मनात कुढत राहायचं. आणि एखाद्या बेसावधक्षणी आत्महत्या तरी करायची किंवा एखादा दुसरा चुकीचा मार्ग निवडायचा. हे सहज घडताना पाहतोयं आपण.

आपल्या आयुष्याची जबाबदारी ही आपलीच असते. आपण स्वतःवर सातत्याने काम करायला हवं. मी नेहमी सांगते, त्याप्रमाणे ध्यानधारणा तर आजची गरज आहे. मन स्थिर राहतं. जाणीवपूर्वक मनाला सकारात्मक विचारांची सवय लावायची. नकारात्मक विचार येणारच, पण त्यात अडकून पडायचं नाही. स्वतःचे बरे वाईट विचार लिहून काढायचे. त्याने भावनांचा निचरा होतो. आपले विचार स्पष्ट होत जातात. आपली निर्णय क्षमता वाढते.

कोणीही, कधीही आणि कसंही आपल्याला संपवू शकेल, इतकी कमजोर नसावीच आपली मानसिकता. तर मी स्वतः सोडून कोणीही, कधीही आणि कसंही माझ्या आयुष्याचे निर्णय घेणार नाही, इतकी प्रबल, समर्थ हवी आपली मानसिकता. आता प्रत्येकाने ठरवायचं की हे सुंदर आयुष्य भरभरून सकारात्मकतेने, समर्थपणे जगायचं की कमजोर होऊन परिस्थितीला शरण जायचं…. बस इतकंच……

ज़िंदगी प्यार का गीत हैं
इसे हर दिल को गाना पड़ेगा,
जिंदगी ग़म का सागर भी हैं
हंसके उस पार जाना पड़ेगा..
है अगर दूर मंज़िल तो क्या?
रास्ता भी है मुश्किल तो क्या?
रात तारों भरी ना मिले तो,
दिल का दीपक जलाना पड़ेगा……

लेखिका – मधुश्री देशपांडे गानू


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आ‌‏युष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““कोणीही, कधीही आणि कसंही आपल्याला संपवू शकेल, इतकी कमजोर नसावी आपली मानसिकता..””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!