चला शिकू…लेट गो !!
मनुष्य हा स्वभावतः च समाजप्रिय प्राणी आहे . ज्याला नेहमी माणसांच्या गराड्यात रमायला आवडते… कधी तो आपल्या सारख्याच समविचारी व्यक्तींशी विविध विषयांवर गप्पा मारतो .. चर्चा करतो . तर कधी इतरांचे , विचार किंवा दृष्टीकोन न पटल्यामुळे त्यांच्याशी चक्क भांडायला सुद्धा कमी करत नाही.
व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार काही व्यक्ती या बिनधास्तपणे , फक्त आजचा दिवस आपला , उद्याचे कोणी पहिले आहे असा विचार करून वर्तमानात जगत असतात तर काही व्यक्ती या त्यांच्या विचारसरणीमुळे ,भोवतालच्या परिस्थितीमुळे कायम स्वतःकडे जे आहे ते गमवण्याच्या भीतीमध्ये कधी भूतकाळातल्या आठवणींत तर कधी भविष्याची चिंता करत जगत असतात.
काही गोष्टी.. या कधी कधी काळावर सोडून द्यायच्या असतात हेच त्यांना पटत नसते. प्रत्येक बाबतीत आपल्याला हवे तसेच घडेल असे होत नाही हेच त्यांना मान्य नसते. आपण जर एकदा एखाद्याला आपले मानले की ती व्यक्ती कायम आपल्या सोबतच राहणार आहे असा काहीसा भाबडा गैरसमज या व्यक्तींचा झालेला असतो. आपण ज्या नात्याला / मैत्रीला एवढे बांधून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत , त्यांना खरेच या बंधनात राहण्याची इच्छा आहे का? हेच तपासायला या व्यक्ती विसरतात ,आणि मग काही कळायच्या आत एक दिवस त्या नात्याचे / मैत्री चे धागे अचानक तुटतात आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी!
म्हणूनच , या जराशा हट्टी पण भावूक स्वभावाच्या व्यक्तींनी , काही प्रसंग.. त्या संदर्भातील व्यक्ती यांच्या काही गोष्टी फारशा मनावर न घेता त्या वेळीच “लेट गो (शब्दशः अर्थ-सोडून देणे”) करायला शिकले पाहिजे . एखादे नाते ते जसे आहे तसे समजून घ्यायला हवे . त्या नात्याला/व्यक्तीला पण कधी कधी स्वतः ची स्पेस हवी असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जर कधी आपल्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या एखाद- दुसऱ्या शब्दाने म्हणा किंवा कृतीने म्हणा.. ती मैत्री , ते नाते कायमचे तुटत असेल तर काही वेळा ते जपण्यासाठी धडपड करण्यापेक्षा जे सत्य आहे ते स्विकारण्याची तयारी हवी
एखादी व्यक्ती आपलीच आहे म्हणल्यावर आपण तिला/त्याला तोंड टाकून वाट्टेल ते बोलू शकतो आणि आपल्याला तसे बोलण्याचा हक्क आहे असा गैरसमज तर मनातून पहिला दूर केला पाहिजे. जर अमुक अमुक ला त्या नात्याच्या.. मैत्रीच्या बंधनात अडकून राहण्याची इच्छा च नसेल तर मनात कोणताही क्लेश न ठेवता तिला/त्याला त्या नात्यातून.. मैत्रीतून सहजपणे मोकळे करण्याची (लेट गो ची ) तयारी असायला हवी .कधी कधी या व्यक्तींनी त्यांच्या भीतीयुक्त अती प्रेमामुळे एखादे नाते किंवा मैत्री हे प्रमाणापेक्षा घट्ट आवळून धरले की , त्या नात्याचा, मैत्रीचा जीव घाबरा होऊ शकतो.. त्यापेक्षा त्या नात्याला.. मैत्रीला खुल्या मनाने त्याच्या मार्गाने लेट गो केले तर काही वेळा तेच नाते/मैत्री नवीन उत्साहाने पुन्हा फुलण्याची शक्यता अधिक असते हे लक्षात घ्यायला पाहिजे.
समोरच्याने आपल्याला दुखावले.. म्हणजे आपण पण त्याला दुखवायला पाहिजे किंवा त्याचे वागणे आयुष्यभर लक्षात ठेवलेच पाहिजे . असा कोणताच अधोरेखित नियम नाही. त्याने माझ्याशी असा व्यवहार केला ना आता मी त्याला सोडणार नाही.. तिने मला नाकारले ना , आता मी तिचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.. माझे त्याच्यावर प्रेम आहे म्हणजे त्याचे माझ्यावर प्रेम असलेच पाहिजे .. आम्ही त्याला एवढा जवळचा मित्र / मैत्रीण काय अगदी कुटुंबातील सदस्य मानले पण त्याने/तिने अचानक आमच्याशी सगळे संबंधच तोडले हो , मग आता पुन्हा आम्ही त्याचे तोंड सुद्धा पाहणार नाही.. तसे तर आम्ही सगळे एकाच कुटुंबातले पण अमुक अमुकने २ वर्षांपूर्वी नवीन घर घेताना आम्हाला सांगितले नाही ना.. आता आम्ही पण यावर्षी त्यांना आमच्या नवीन घरी बोलावणार नाही .. असे आणि यासारखे अनेक किस्से आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत आधीही घडले असतील किंवा अजूनही घडत असतील….
पण यांसारख्या प्रत्येक छोट्या,मोठ्या घटना.. त्या संदर्भातील व्यक्ती , आपण नक्की किती दिवस.. वर्षे आपल्या मनात धरून ठेवणार आहोत? आणि कशासाठी?आपण असे प्रसंग.. त्या संदर्भातील व्यक्ती.. यांच्याबद्दल मनात एक अढी ठेऊन नक्की काय साध्य करू पाहत असतो माहित आहे का ? तर केवळ मनस्ताप !!आपण त्या ठराविक घटनेचा.. माणसांचा नको इतका विचार करून आपल्या मानसिक आरोग्यापेक्षा त्या गोष्टींना आयुष्यात अनन्य साधारण महत्व देत असतो आणि या शब्दशः फुकटच्या मनस्तापापेक्षा आपण या गोष्टी वेळच्या वेळी “लेट गो” (सोडून देणे) करायला शिकलो ना तर आपल्या आयुष्यातील बराचसा ताण हा वेळीच निवळायला लागेल .
प्रत्येक वेळी बदला घेणे हाच एकमेव पर्याय असू शकत नाही. कधी कधी नकारसुद्धा पचवता यायला हवा.. कारण एखाद्याशी मुद्दाम ठरवून वाईट वागणे यासाठी ताकद आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी गरज नसताना खर्ची होत असतात , पण त्याच गोष्टी लेट गो करायला अंगी फक्त “मनापासून क्षमा करणे” हाच गुण लागतो…ज्याच्यामुळे आपण अनेक कडवट प्रसंग विसरायला शिकतो . तसेच ज्या व्यक्ती एका छोट्या वा मोठ्या कारणाने आपली साथ अर्ध्यातच सोडून देण्याचा निर्णय घेत असतील , त्यांना सुद्धा आपण खूप सहजरीत्या मनातून लेट गो करायला लागतो…
ज्यावेळी आपण अहंकारापेक्षा स्वतः च्या मानसिक स्वास्थ्याचा विचार अधिक करायला शिकू , त्याचवेळी अगदी नकळतपणे आपल्या सगळ्यांकडूनच “लेट गो” ही कृती घडू लागेल . कारण वर उल्लेखलेल्या सर्वच प्रसंगांमध्ये कमी-अधिक प्रमाणात का असेना आपला अहमपणा .. (अहंकार /इगो) हा प्रामुख्याने सतत डोक वर काढताना दिसतो. इथेच जर आपण तो/ती ..त्यांचे वागणे.. या सगळ्यांच्यापलीकडे जाऊन स्वतःच्या मानसिक शांततेला अगदी क्षणभर जरी महत्व दिले तर , आपल्याला असे जाणवेल की आपण दिवसातला बराचसा वेळ हा स्वतः पेक्षा इतरांचा/त्यांच्या वागण्याचाच विचार करण्यात अधिक घालवतो. आणि मग विनाकारणच ते ओझे काही काळासाठी आपण मनात घेऊन वावरत असतो.
याऐवजी जर आपण सर्वच जण कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे आणि कोणती गोष्ट मनाला लावून घ्यायची .. हे हळूहळू का असेना पण शिकायला लागलो ना तर लेट गो च्या विचारसरणीतून आपण ज्या कटू आठवणींची जळमटे मनात कित्येक काळापासून साठवून ठेवली आहेत ती वेळच्या वेळी झटकली जातील आणि आपले मन स्थिर होण्यास मदत होईल.
लेखिका – मेघना कुलकर्णी – रानडे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

