Skip to content

आपण सहज इतरांना जज करतो, तसं करू नका. कारण अशाने समोरच्याचे खूप नुकसान होते.

आपण सहज इतरांना जज करतो, तसं करू नका. कारण अशाने समोरच्याचे खूप नुकसान होते.


काहीही माहीत नसताना उगाच आपण एखाद्या व्यक्तीला अगदी क्षणाचा विलंब न करता सहज हसतो.. एखाद्याची खिल्ली उडवतो… एखाद्याला नावे ठेवतो.. सर्वांचं नसेल कदाचित पण कित्येक व्यक्तीचं नक्कीच झालं असेल अस वागून..

आता विषय कोणता तर आजच्या युगात जे चाललय त्याच्याशी ताळमेळ साधण्याचा प्रत्येकाचा एक प्रयत्न असतो … तो जसा राहतो तसं मलासुद्धा राहायचं आहे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा..पण बघणारे मात्र त्यांची वेगळीच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात अर्थात त्यांना कोणी विचारले नसताना सुद्धा… अरे ती तर किती साधी राहायची.. पण आज बघ तिला बघून कोणी ओळखेल का ?? किती बदल झालाय तीच्यात.. आणि मग सुरू होते चर्चा..

असाच एक किस्सा त्यादिवशी कानी पडला.. शाळा शिकत असताना आमच्या वर्गात अपर्णा नावाची मुलगी होती.. ती एकदम साधी राहायची ही म्हणजे शाळेत असताना प्रत्येकाला साधं सरळ राहावच लागते कारण तेव्हा मेक अप.. ड्रेसिंग असा काही पर्याय नसतोच पण कधी कोणत्या कार्यक्रमात म्हणा किंवा कॉलेज मध्ये गेल्यावर सुद्धा तीच राहणं हे खूप साधं सरळच.. कधी कोणती नवीन फॅशन नाही.. केसांची वेगवेगळी स्टाईल सुद्धा नाही.. ना कधी सगळ्यात उठून दिसण्याचा आगळावेगळा प्रयत्न..

आणि आज मात्र तिला पाहिल्यावर मी सुद्धा ओळखलं नाही तेव्हा मी काही बोलणार इतक्यात माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की अग ही अपर्णा जशी शाळा कॉलेज करताना साधी राहायची तसच ती जॉब करताना सुद्धा साधीच राहायची पण आज माहीत आहेना कोणती स्पर्धा चालू आहे..

आपल्याकडे असलेले कला गुण.. यांच्यापेक्षा आपल राहणीमान.. काळानुसार बदलणारी फॅशन हे जास्त महत्त्वाचे झाले आहे.. आणि अपर्णाच्या बाबतीत सुद्धा असच घडल.. तिच्या साध्या राहण्याने तिला सगळे हसायचे.. नाव ठेवायचे.. तिला कोणत्याही कामात महत्त्व देत नव्हते.. कुठेही कार्यक्रम असेल.. फिरायला जाणं असेल तरी तिला कोणीही विचारत नव्हते.. तिला या अशा सर्वांच्या वागण्याचा त्रास झाला.. तिला एकटेपणा जाणवायचा.. मानसिकरित्या ती खचली होती..

पण काम सोडू शकत नव्हती कारण ते काम तिला खूप प्रयत्नांनी मिळालं होत.. आणि एक नोकरी सोडून तशीच दुसरी नोकरी मिळणं आजच्या काळात काही सोपी गोष्ट नाही.. पण तिच्या त्रासाचा तिच्या कामावर सुद्धा वाईट परिणाम तिलाच जाणवत होता.. मग तिने तिच्यामध्ये बदल केला.. हळू हळू का होईना पण ती स्वतःमध्ये काळानुसार शक्य ते बदल करू लागली.. आणि त्यामुळे तिच्या कामाच्या ठिकाणी सर्वांची तिच्याबद्दल विचार करण्याची पद्धत सुद्धा बदलली..

तेव्हा जाणवलं की खरच आपल्याला काही माहिती नसताना आपण उगाच नको असलेल्या बिनकामाच्या चर्चेत सहभागी होतो आणि स्वतःचा वेळ.. ऊर्जा हे ते वाया घालवतोच पण त्यासोबतच त्या व्यक्तीची मानसिकता बिघडवण्याच काम सुद्धा आपण करतो.

आज आपण सहज बोलतो की बघ ही किती साधी होती आणि आज बघ कशी राहते पण यामागे जे काही कारण असतील त्यांची आपल्याला कल्पना सुद्धा नसते.. अपर्णाने तिचा त्रास कमी व्हावा म्हणून स्वतःमध्ये बदल घडवले.. आता ते किती चांगले आणि किती वाईट हे ठरवणारे आपण कोण.. ज्याचं आयुष्य त्याला माहीत असते..

आपण फक्त वरवर बघून कोणाला ठरवू नये.. हे फक्त अपर्णा साठी नाही तर असे कित्येक व्यक्ती आहेत जे आधी असतात तसे आज दिसत नाहीत.. त्यांच्यातील बदल हा जर त्यांना आनंद देत असेल.. समाधान देत असेल.. तर त्यांना काही बोलून.. त्यांच्याबद्दल चर्चा करून आपण उगाच त्यांना का त्रास द्यायचा.. एखाद्याला जर आपण पाठिंबा देऊ शकत नाही तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करू नये.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आ‌‏युष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!