आयुष्य बदलायच असेल तर आपण आपले प्राधान्य सुद्धा बदलायला हवे !!
काल सकाळी मी खूप छान नियोजन केलं होत पूर्ण दिवसाचं.. प्रत्येक वेळ एका विशिष्ट कामासाठी निश्चित केली.. आणि त्याप्रमाणे जर सगळं करता आले तर नक्कीच माझी सगळी कामं वेळच्या वेळी पूर्ण होऊन मिळालेल्या वेळेचा अजून काही उपयोग करून माझा दिनक्रम अगदीच पद्धतशीर जाणार होता..
पण.. हा पण आला की समजून जायचे की नक्कीच काहीतरी वेगळं घडल असणार.. आणि अगदी तेच झालं.. माझं काम लिखाणाचं.. घरातील सगळ्या कामांना त्यांची वेळ देऊन माझं लिखाण पूर्ण करून अजून काही नविन लिखाण करेन या माझ्या नियोजनावर माझीच एक चूक महागात पडली..
दिवसाची सुरुवात तर एकदम उत्तम झाली.. काही काम केली आणि नंतर लिखाण करायला घेणार इतक्यात माझा फोन वाजला.. मग काय तर.. फोन हल्ली इतका महत्वाचा झालाय की बाकी सगळं त्या वेळी तरी नक्कीच आपल्या दृष्टीआड जाते..
मी सुद्धा तेच केलं.. मैत्रिणीचा फोन आला.. तस पाहिलं तर काही बऱ्याच काळानंतर तो फोन आला अस सुद्धा नव्हतं पण फोन आला आहे तर घेतला तर पाहिजे.. उचलताना ठरवलं की जास्त गप्पा न करता थोडक्यात बोलून फोन ठेवायचा म्हणजे माझी सगळी कामं सुरळीत होतील पण गप्पांचा ओघ इतका होता की वेळेकडे आणि माझ्या नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं.
आणि एकदा फोन हातात आल्यावर तिचा फोन कट झाल्यावर मी बसली आपल वॉट्स ॲप आणि फेसबुक वर अपडेट्स बघायला म्हणून तो एक वेगळा वेळ गेला आणि गप्पा सुद्धा इतक्या महत्वाच्या नव्हत्या हे मला फोन ठेवल्यावर ज्यावेळी कामांची गडबड झाली त्यावेळी जाणवलं..
मग काय जे ठरल ते करायचं तर बाजूलाच राहील.. सगळं schedule गडबडून गेलं.. घरची कामं तर काहीही करून होतात पण माझ्या लिखाणाचं मात्र बोंबलल… कारण घरात शांतता असते त्यावेळी नाही केलं की नंतर गोंधळ इतका असतो घरात की लिखाण तर काय साधा विचार सुद्धा करता येत नाही..
त्यानंतर मात्र माझ्याच लक्षात आले की मीच माझ्या नियोजनाची वाट चुकवली आणि त्यासोबत माझ्या पूर्ण दिवसाची.. मला कळायला हवं होत की मी कशाला महत्त्व द्यायला हवं.. माझ्या कामांना .. माझ्या लिखाणाला.. की त्या फोनला… कारण आज मिळालेली वेळ वारंवार मिळत नाही.. आणि कळत नकळत का असेना आपण आपल्या चुकीच्या दिशेने गेल्यावर आपल्याला मिळालेल्या वेळेचा..त्या क्षणाचा आनंद सुद्धा घेता येत नाही.. कारण त्यावेळी आपण भलतचं काही करत बसतो.
हे तर अगदी लहान उदाहरण झालं पण आपण आपल्या आयुष्याचा मार्ग सुद्धा असाच चुकवतो.. जे हातात आहे त्याकडे आपल लक्ष नसते आणि नको असलेल्या वेगळ्याच गोष्टींमध्ये आपल लक्ष घालतो आणि जे आपल्या हातात आहे ते सुद्धा आपल्याकडून निसटून जाते..
आपण आपल्या कामांना.. आपल्या आवडींना .. आपल्या माणसांना.. आपल्या सगळ्याच गोष्टींना नक्कीच महत्व द्यायचं आहे.. पण आपण ते सोडून नको असलेल्या बिन कामाच्या चौकशा.. याच काय चाललय त्याच काय चालू आहे.. हा असा वागतो.. ती तशी बोलते.. यांचं बघा कस राहणं बदललं आहे..
दुसऱ्याच्या गाडी बंगल्याकडे सेक्युरिटी ची गरज नाही इतकं आपण लक्ष देतो.. कोण कधी आले आहे.. कोण कुठे जाते.. दुसऱ्याच्या आयुष्याच्या उठाठेवी करायच्या की आपल आयुष्य सुंदर कस करता येईल याकडे लक्ष द्यायचं… यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे..
आता आपण जर दुसऱ्याच्या आयुष्यात शिरकाव करत नसलो तरीही आपण आपल्या आयुष्यात आपल्या घडून गेलेल्या गोष्टींना.. दुःखांना.. चुकीच्या विचारांना.. हातातून निसटून गेलेल्या संधी यांना महत्त्व द्यायचं की आपल्यासमोर उभे असणाऱ्या आव्हानांना.. नव्याने मिळणाऱ्या संधीना..
आजच्या चांगल्या विचारांना.. यांना प्राधान्य द्यायचं हे आपण ठरवायचं.. आणि आयुष्य बदलायच असेल तर नक्कीच त्यालाच प्राधान्य द्या जे आपल्याला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देईल.. आणि आपल आयुष्य एका सुंदर वळणावर येईल..
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Super.