Skip to content

सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाटतं की जो अजिबात तक्रार करत नाही, त्याचं छान चाललंय.

सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाटतं की जो अजिबात तक्रार करत नाही, त्याचं छान चाललंय.


चिरागला कोणीही बघितलं की त्यांना वाटायचं की किती भारी life आहे याची.. मस्त आनंदात असतो कधीही बघावं तेव्हा.. याच्याकडून कधी कोणत्याच गोष्टीची तक्रार नाही ऐकू आली.. म्हणजे याच्या आयुष्यात सुख आणि सुखच आहे.. नाहीतरी काय टेन्शन असेल याला.. चांगल घर आहे.. बायको श्रीमंत घरची.. दोन पोरं त्यांचही शिक्षण चालू आहे.. आणि आई वडील. नोकरी सुद्धा चांगलीच आहे याला..

असा त्याला वरवर बघणाऱ्या व्यक्तींचा समज व्हायचा.. आणि चिरागचा स्वभाव सुद्धा असा होता की जीवनाबद्दल कोणतीही तक्रार न करता.. कोणाकडेही न रडता.. जे समोर आहे त्याचा स्वीकार करून समाधानी राहण्याचा.. त्यामुळे सगळ्यांना त्याच्याबद्दल हेवा वाटायचा..

पण त्याच्या आयुष्यात मात्र काही वेगळं होत.. तो शिक्षण घेत असताना त्याच्या वडिलांना अपंगत्व आले त्यामुळे त्याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेता आले नाही.. त्याला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती पण वडिलांची आणि घराची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे त्याला शिक्षण सोडून नोकरी करावी लागली..

आणि नोकरी ही आज चांगली वाटत असली तरी सुरवातीला मात्र त्याने कमी पगार असलेली नोकरी करत लोकांच्या दारात वर्तमान पत्र टाकण्याचं काम सुद्धा त्याने केलं.. घराची जबाबदारी सांभाळताना मिळेल ती नोकरी तो करत होता.. घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती आणि त्यामुळे त्याच लग्न जमवण्याची जबाबदारी कोणतेच नातेवाईक घेत नव्हते..

पण त्याचा स्वभाव आणि वागणं चांगल असल्याने त्याच्या सरांनीच त्याच्यासाठी स्थळ शोधलं आणि उशिरा का होईना त्याच लग्न झालं.. आज त्याच स्वतःच घर आहे.. बायको मुल आहेत .. चांगली नोकरी सुद्धा आहे पण तरीसुद्धा त्याची बायको आईवडिलांची काळजी घेत नाही.. म्हणून तो स्वतः च नोकरी सांभाळत आईवडिलांची सेवा करतो.. पण कोणामध्ये वाद नको म्हणून शांत राहतो.. आलेला क्षण सुंदर घालवण्याचा त्याचा प्रयत्न असतो…

एकेकाचा स्वभावच असतो जे आहे त्यामध्ये कधीच समाधान न मानता सतत बघावं तेव्हा दुःखी .. निराश.. राहण्याचा. त्यांना नेहमीच दुसऱ्याकडून अपेक्षा असतात.. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की लगेच ते नकारार्थी विचार करण्याचं काम करतात.

जगण्याबद्दल त्यांचा आशावाद कमी असतो त्यामुळेच ते निरुत्साही असतात..आणि अशीच लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावतात.. आपणच सर्वात दुःखी अशी यांची भावना असते आणि मग ही लोक तक्रार न करता आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य हे छान चाललय असा समज करून अजून उदास होतात की मलाच सगळे त्रास कसे.. मलाच सगळे टेन्शन का असतात.. पण त्यांचा दृष्टिकोन चुकतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही.

आणि यांच्या उलट असतात ते उत्साही व्यक्तिमत्त्व असलेले व्यक्ती.. जे नेहमीच सकारात्मक विचार स्वतःजवळ बाळगतात.. त्यांचं वागणं इतरांना प्रेरणा देते.. त्यापैकीच एक व्यक्तिमत्त्व असेल तर ते चिरागच..त्याच्यासारखे लोक आपल्यासमोर जे आहे त्याचा स्वीकार करतात.

त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे ते जे आहे ते स्वीकारून आयुष्याचा आनंद घेतात.त्यांची कितीही दुःख आले तरीही एकही तक्रार न करता आलेल्या प्रसंगाना सामोरे जाण्याची तयारी असते… आणि म्हणूनच त्यांना बघून कोणालाही हेवा वाटतो.. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं छान चाललय तर प्रत्यक्षात मात्र ते त्यांचं आयुष्य छान चालवून घेत असतात.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!