Skip to content

‘टाटा’ करताना आपल्या मनात नेमके कोणते विचार असतात!!

‘टाटा’ करताना आपल्या मनात नेमके कोणते विचार असतात!!


नेहमी प्रमाणे सगळयांना टाटा बाय बाय करुन आपआपल्या उद्योगाला रवाना केले. सहज एक विचार मनात आला. खरच ! किती सहज अंगवळणी पडलेलं असतं हे टाटा करणं आपल्या !

दारातून हसत निरोप घेतला तरी खिडकी किंवा गॅलरीतून टाटा असतोच. अगदी लहानपणापासून
रुजलेले असते. एक छोटीशी हात हलवण्याची क्रिया ,ज्याची सुरुवात होते आपल्या बालपणीच. पण काय हे एवढंच असतं? रुक्ष? भावनाहीन? मला वाटते हया टाटा करण्यात विलक्षण सामर्थ्य असतं! खूप भावना दडलेल्या असतात.

3-4 वर्षाचं मूल शाळेच्या पायरी जवळ येउन आपल्या सोडायला आलेल्या आई/ बाबांना वळून टाटा करतो , हा टाटा असतो विश्वासाचा! विश्वास हा की शाळेतून
बाहेर आल्यावर आई-बाबा इथेच उभे असतील त्याला घ्यायला!

बाळाच्या इवल्याशा मिठीतून स्वतःला सोडवणारी एक ऑफिसला जाणारी माऊली ! डोळ्यात अश्रू , ह्रदयात कालवाकालव आणि मनात प्रचंड अपराधी भावना. वळून आपल्या बाळाला टाटा करते. हा असतो अगतिक टाटा. त्याच बाळाला अलगद त्याची आजी उचलून घेते आणि त्याचा हात हातात घेऊन टाटा करते.
हा असतो हया माऊलीने त्या माऊलीला दिलेला दिलासा ! ओठावर पुसट हसू आणि पुन्हा एकदा टाटा. हा असतो कृतज्ञतेचा! टाटा असतं एक वचन.

दूर देशी चाललेल्या पतीला टाटा करताना त्याच्या पत्नीने दिलेलं !! मूलांना सांभाळेन, कुटुंबाला सांभाळेन, घराची काळजी घेईन! टाटा असतं एक आश्वासन
मी लवकर परत येईन!

विमानतळावर आपल्या लाडक्या लेकाला/ लेकिला
घ्यायला गेलेले आई-बाबा, ते दुरून येताना दिसताच आनंदाने जोर जोरात हात हलवून त्याचं स्वागत करतात , पण हेच आई-बाबा परत सोडायला जातात तेव्हां? हात हलवण्याची क्रिया तीच असते पण भावना किती वेगळ्या ! त्यात असतं वियोगाचे दुखः

सासराहून पहिल्यांदा माहेरी जात असलेली एखादी मुलगी , हात हलवते टाटा करायला त्यात असते थोडी हूरहूर थोडी लाज आणि माहेरचे परत भेटणार म्हणून होणारा थोडा आनंद.

हेच ती परत सासरी यायला निघाली की हात करते तो संमिश्र भावनांनी. सासरी जाण्याचा आनंद आणि माहेर मागे पडतं आहे हे दुखः

पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी जाणारी सून (तो पर्यंत ती सासरी चांगलीच रुळलेली असते) घरच्यांचा निरोप घेते तेव्हा असते भिती, उत्कंठा आणि काळजी.
सासरचे हात करतात तो असतो मायेचा प्रेमाचा! बाळाला घेऊन लवकर ये ग आपल्या हक्काचा घरी ! हे घर गृहलक्ष्मीची वाट बघतय!

बाळंतपणासाठी आलेली ,बाळाला घेऊन परत सासरी निघालेली मुलगी आईला हात करते! तो असतो शाशंक
मनाने केलेला टाटा. जमेल ना ग आई मला सगळं?
तिकडंन तिची माऊली प्रेमाने हात करते. जमेल ग, बाळच शिकवेल तुला सारं !! हा असतो टाटा धिराचा.
लेकूरवाळी माहेरपणाला आलेली मुलगी निघाली की वृद्ध आई वडिल हात करतात. येत जा ग वरचेवर, आता आम्ही पिकली पानं.

मुलगी हात करते पण त्यात जीव नसतो प्रश्न असतो, मिळेल ना माहेरच सुख अजुन पुष्कळ वर्ष?
भाऊ-भावजय गाडीत बसवून देतात. बरं झालं आलीस, खूप छान गप्पा झाल्या. हे टाटा म्हणजे निमंत्रण असतं परत माहेरपणाला यायचं!

मित्र-मैत्रिणीचा टाटा असते एक पोचपावती- आनंद दिला आणि घेतल्याची ! आणि वचन असतं परत भेटण्याचे.

घरची स्त्री जेव्हा हसत सगळ्याना टाटा करते ती आठवण असते की घरी आपली कुणीतरी वाट बघतय.
हया टाटा मुळे सगळयांची पावले तिन्हीसांजेला आपोआप घराकडे वळतात. हे असतं टाटा करण्याचं सामर्थ्य !!

एक टाटा असतो प्रोत्साहनाचा ! परीक्षेला निघालेल्या मुलाला करतो तो ! झालाय रे तुझा अभ्यास , मस्त लिही पेपर.

एकच टाटा असा आहे ज्याला सगळे शब्द अपुरे पडतील. तो म्हणजे सीमा रेषेवर लढाईला निघालेल्या सैनिक आणि त्याच्या कुटुंबियांचा. सगळ्याच भावना तर असतात त्यात , पण सगळ्यात तीव्र भावना असते ती देशसेवेची !!! त्यांच्या त्या भावनेला आणि त्यांना आमचा मानाचा मुजरा ??

अशी ही टाटा बाय बाय ची कहाणी !
धन्य आहेत ते ज्याना टाटा करणारी आणि करवून घेणारी आपली माणसं आहेत ! टाटा करत रहा.
आपल्या भावना पोचवत रहा !!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “‘टाटा’ करताना आपल्या मनात नेमके कोणते विचार असतात!!”

  1. Sudhir Gajanan Aphale

    टाटा करण्यामागच्या किती भावना संवेदनशील असतात हे समजले लेख खूप छान वाटलं आपले सर्वच लेख उपयुक्त व वाचनीय असतात धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!