Skip to content

आईला तुम्ही कितीही दुखावलं तरीही ती तुमच्यावर नाराज होत नाही याचा गैरफायदा घेऊ नका.

आईला तुम्ही कितीही दुखावलं तरीही ती तुमच्यावर नाराज होत नाही याचा गैरफायदा घेऊ नका.


खरंच किती वाईट आई आहे ही …

आई… हा शब्द समोर आला कि आपल्या मनात काळजी,प्रेम,माया, मैत्री,गुरु ,धीर,आधार,प्रोत्साहन, उत्साह,हिम्मत,घर,आशीर्वाद, सहनशीलता आणि त्याग हे शब्द आपोआप जुळले जातात.

का होत असेल असं?

बाकी जगातल्या कुठल्याही व्यक्तींसाठी हे शब्द का आठवत नाहीत?

एवढी महान आहे का ही ‘आई’?

जर या प्रश्नाचं उत्तर ‘हो’असेल तर तिचे मुल सोडून सर्वांच्या नजरेत ती वाईट का असते?

आता समाज म्हणा नातेवाईक म्हणा किंवा आपल्याच घरचे म्हणा..
या सर्वांनाच एका आईवर विशेष टिपणी तर करायचीच असते…
खरंतर हे टिपणी करणारे स्वतः त्यांचे मुल कसे वाढले…या संगोपणात किती आपण स्वतः चुकलो हे बघत नाहीत…

पण ती आई तिच्याच पोटी जन्मलेल्या लेकरांचे कसे हाल करते…
वाईट बोलायला वागायला, शिकवते हा समज असतो काही लोकांचा…

अरे ९ महिने ती बाळाला आपल्या पोटात वाढवते, त्या बाळाला काही होऊ नये म्हणून सर्व प्रकारची काळजी घेते…
पथ्य पाणी सर्व सांभाळते… आणि त्या आईला बाळ सांभाळायचं कळत नाही?

त्या आईला किती मानसिक त्रासाला समोर जावं लागतं आणि एकतर्फी बंधन कसे लावण्यात येतात ते बघूया….

काही ठरलेले डायलॉग 😂😂😂
आणि त्यावर सुचले तसे उत्तर….

१. तु आता मुलगी नाहीये आई आहे असे कपडे घातले तर काय म्हणतील लोकं?

— आई ने कुठले कपडे घालावे हे कुठे लिहिले आहे.

खरंतर आई झाल्यावर तीच स्वतःला मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करत असते कि आपल्या वागण्यामुळे आपल्या मुलांना कोणी बरं वाईट बोलू नये.

२. तूच बाहेरचं खाशील तर काय शिकतील तुझे मुलं?

— अगदी खरं आहे बाहेरचं खाणं बरोबर नाहीच, पण कधीतरी चव बदल म्हणून खाल्लं तर नाही का चालत ? कि कधीतरी ला रोजच हा शब्द जोडून बोललं पाहिजे? तिला एक दिवस काही मनासारखं बाहेरचं खावं वाटलं कि बस हिला तर ना बाहेरचच आवडतं… सारखीच बाहेरचं खाते….

–हे लोकं स्वतः या लहान मुलांना बाहेरचं खाऊ घालतील पण तेच आईने आणलं कि ही मुलांना चुकीच्या सवयी लावते

३.तूच सारखा मोबाईल बघशील तर मुलं तर बघणारच ना…?

–हे सांगणारे नुकताच स्वतःचा मोबाईल चार्जिंग ला लावून आले असतात 😂

कळतं तिलाही हे. ती ही थकते, कंटाळते, कुठेतरी एकटी पडते, मग थोडा वेळ करमणूक म्हणून बघायला काय हरकत (अगदी लिमिटेड )

४. खूपच बारीक झालीये /झालाय….

— आई सांभाळते म्हणून बारीक म्हणजे आई स्वतः खातेय आणि मुलांना उपाशी ठेवते का?

५.खूपच हट्टी आहे बाबा, आम्ही 4 पोरं मोठे केले पण असं नाही बघितलं कोणाचंच.

— हो हट्टी आहे मान्य,त्याला कारणीभूत सर्वांनी केलेला लाड, प्रेम आणि वयासोबत मुलंही बदलतात.

त्यांच्या सोबत सोबत जवाबदारीही मोठीच होत असते.
शाळा, अभ्यास, क्लासेस. हळूहळू हे लहानशे खेळकर मुलं कसे शांत होतात कळतही नाही…

शेवटी मुलं म्हणजेच देवाघरची फुलं.

६.आम्ही तर सर्व काम करून लेकरं सांभाळायचो. आजकालच्या आयांना तर एकच जीवावर येतं.

— मान्य आहे वेळ बदलली, काळ बदलला कुठेतरी त्या काळासोबत आपल्यातही बदल झाला…

आपले आईवडिल सांगायचे आमच्या वेळेस ही सुविधा नव्हती, ते नव्हतं फक्त परिस्थिती शी जुळवून आनंद मानत होतो.

त्यानंतर आपल्याला जे मिळालं ते भरपूर होतं…

तीच गोष्ट आपल्या मुलांसोबत पण घडतेय…
पिढ्या नं पिढ्या हे बदल होतच असतील… पण खात्रीने सांगते मुलांवरचा जीव आणि प्रेम हे आई वडिलांचं कधीही बदलत नाही.

७.काय सारखं अभ्यास अभ्यास करून मागे लागते कि लेकरांच्या. आमचे लेकरं काय शिकलेच नाही का?

— आधी भावंड भरपूर होती तेव्हा मित्र मैत्रिणींची गरजच नव्हती.

खरंतर मोठा भाऊ अभ्यास बघायचा, मोठी ताई सुद्धा शिकवायची…

त्यांचीच पुस्तकं लहान भावंडाणा मिळायची..
आता आई वडिलांना लक्ष द्यावं लागतं…

८.मुलांना असं उलटे उत्तरं द्यायला आईनेच शिकवलं असेल.. तीच म्हणत असेल कि बेटा तू असं बोल उद्धट पणे वाग..

— जगात कुठलेच आई वडील मुलांना वाईट शिकवत नाही.
कधी आईवडिलांच काही चुकलं असेल तर ते बघून नक्कीच शिकू शकतात

९. मार्क्स कमी आले कि लगेच तुझं लक्ष कुठे होत असा प्रश्न तयार…

— अभ्यास घेत असेल तर लहानशा पोराला काय सारखं त्रास द्यायचा म्हणून बोलणार…

मुलं कशात कमी आहेत, काय त्यांना जमतंय हे बघायला कोणाला वेळ नसतो…

जेवढा वेळ त्या आईला टोमणे मारण्यात देता तेवढा त्या लेकराकडे दिला तर बरं होईल…

१०.दिवसभर त्या फालतू सिरिअल्स बघण्यापेक्षा मुलांकडे जरा लक्ष द्यावं

— घरातील इतर व्यक्ती दिवसभर मोबाईल मध्ये, मित्रांमध्ये टाईमपास करतात ते चालतं.

बाई सतत सर्व काम करते ते दिसत नाही आणि टीव्ही लावला कि बस ही दिवसरात्र टीव्ही बघते?

११.सगळ्या कामाला तर बायका आहेत मग साधं मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही ही बाई?

–शक्य तेवढं देतेच ती, घरात मुलांना आई सोडली कि सर्व लोकं आवडतात.

कारण बाकी लोकांना फक्त लाड करायचा असतो, आणि मागितलं ते घेऊन द्यायचं असतं…

आई हे सर्व करत नाही कारण तिला मुलांना शिस्त लावायची असते, चांगल्या सवयी लावायच्या असतात, म्हणून ती टोकते. म्हणूनच मुलांच्या नाराजीला समोर जावं लागतं तिला.

१२.लहानशा लेकरांना उगीचच ओरडत बसते ही….

— मुलं चुकले कि त्या आईलाच बोलायचं आणि मध्ये पडून त्या मुलांना

‘ये बेटा ही आई तशीच आहे, ए का रागावते गं माझ्या बाळाला?’

त्या बाळाचा साधा टाइमटेबल तरी माहितीये त्या आईशिवाय कोणाला..?

चालले मोठे शिकवायला…

मग त्या मुलांना मोठ्यांनी साथ दिली कि तेही आईवर ओरडायला शिकतात.. हे कळणार नाही कोणाला….

ती आई स्वतः बदनाम होऊन मुलांना दुसऱ्यांना आदर द्यायला शिकवते आणि तेच लोकं मुलांच्या मनात आईविषयी राग भारतात….

अरे ती आई काय प्रेशर मध्ये असते हे जाणतं का कोणी?

साधं माहेरी जरी गेली असेल थोडया दिवसांसाठी तरीही सतत टेन्शन मध्ये असते…

सतत मुलांकडे लक्ष असतं कि खेळताना पडू नये, कुठे लागू नये, नाहीतर काय म्हणतील सर्व कि माहेरी नेलं आणि लक्ष नाही दिलं….

जेव्हा कि राहत्या घरात मुलं दिवसातून 10 वेळेस पडत असतात…

मुलांचे मामा मावशी icecream घेऊन आले कि नको देऊ सर्दी झाली ताप आला तर काय म्हणतील, माहेरी जाऊन काळजीच घेतली नाही…..
असं तर वर्षात कित्येकदा सर्दी खोकला होत असतो….

मला सांगा मुलांना सांभाळणं घडवणं हे आईचंच कर्तव्य आहे का?

मान्य आहे कि जे आई शिकवू शकते आपल्या मुलांना, जी काळजी घेऊ शकते आपल्या मुलांची.

पण कधीतरी तिला ही कोणाची साथ हवी असेल हा विचार नाही का येत कोणाच्या मनात?

मुलांनो आईला तुम्ही कितीही दुखावलं तरीही ती तुमच्यावर नाराज होत नाही याचा गैरफायदा घेऊ नका….

काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🏻🙏🏻🙏🏻

लेखिका – सौ. वैष्णवी कळसे


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!