असे काही प्रभावी गुण जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे असल्याची अनुभूती देतात.
जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्यातील गुण हे नेहमीच वेगवेगळे असतात.. माणूस हा इतरांच्या तुलनेत सगळ्यात वेगळा हा फक्त दिसण्याने ठरत नसतो तर त्यासाठी गरजेचे असतात ते त्याला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवणारे त्याचे गुण..
१) हुशारी.
आता शिक्षण तर सर्वच घेतात पण फक्त शिक्षण नाही तर त्यासोबत गरजेची असते ती हुशारी.. काही जण पुस्तकी किडा असतात पण प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या प्रत्येक बाबतीत त्यांनी केलेल्या अभ्यासाचा.. त्यांच्या वाचनाचा त्यांना काही उपयोग करता येत नाही.. त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असते जे फक्त डिग्री दाखवते.. मात्र प्रत्यक्षात त्यांना त्यांच्या बुध्दीचा उपयोग मात्र करता येत नाही..
आणि त्यातच काही असे असतात जे भलेही कमी शिक्षण घेणारे असले तरी कधी कुठे डोकं वापरून काम करायचं हे त्यांना अचूक माहीत असते.. आणि त्यांची ही हुशारी त्यांना सगळ्यात वेगळं ठरवते.
२) चिडचिड न करणे.
कधी काही मनासारखं नाही झालं.. कोणी आपलं काही ऐकलं नाही.. की अनेक जण सहजच चिडचिड करतात.. वैतागतात.. मग अशावेळी त्यांची कोणाचंही स्पष्टीकरण ऐकण्याची तयारी नसते.. आणि असे लोक असले की नेहमी त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो.. पण असेही लोक आपल्या अवतीभवती असतात… ज्यांना चिडचिड न करता शांत राहण्याची सवय असते.. कितीही मनाविरुद्ध घडल.. काहीही झालं .. कोणी ऐकल अथवा नाही ऐकल तरी त्याचा परिणाम ते स्वतःवर करून घेत नाही.. त्यांच्यातील हा शांत स्वभाव त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतो.
३) स्वीकार करणे.
प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडेल अस नसते.. येणारा प्रत्येक दिवस.. येणारी प्रत्येक वेळ अगदीच प्रत्येक क्षण कोणती परिस्थिती निर्माण करेल सांगता येत नाही.. मग अशावेळी परिस्थिती कोणतीही असली तरी तिचा एक आव्हान म्हणून स्वीकार करणारे व्यक्ती कमीच असतात.. जरा कठीण प्रसंग समोर आला की त्यावेळी काय करावं हे अनेकांना सुचत नाही.. अनेक जण यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतात पण काही व्यक्ती आलेल्या वेळेचा .. प्रसंगांचा बेधडक सामना करतात.. आणि त्यावेळी स्वतःला सिद्ध करतात म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे आहेत याचा अनुभव सर्वांना येतो.
४) समजून घेणे.
आपल्या घरात.. आपल्या अवतीभवती.. कामाच्या ठिकाणी अगदीच काय तर आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं नेहमीच भेटतात.. कोणी अहंकारी असते तर कोणी रागीट.. कोणी चिडचिड करणार असते तर कोणी उद्धट पण अशा सर्वांना म्हणजेच आपल्यासमोर कोणीही आले तरी त्यावेळी त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणं बघून त्यांच्या चुकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना काहीही उलट उत्तर न देता त्यांना तिथे समजून घेणारी माणसं ही वेगळीच असतात..
५) निरर्थक बडबड न करणे.
उगाच काहीही गरज नसताना विषय सोडून बोलणे.. बडबड करण्यात वेळ वाया घालवणे.. कामाशिवाय बोलत राहणे अशा स्वभावाचे व्यक्ती आजूबाजूला असले की त्यांना जास्त महत्त्व दिले जात नाही.. याउलट असे व्यक्ती असतात जे वायफळ बडबड करत बसत नाही… गरजेपुरते बोलतात.. निरर्थक बोलण्यात त्यांना रस नसतो आणि खासकरून हे व्यक्ती आपल्या बोलण्यातून नाही तर कामातून व्यक्त होतात.. आणि हेच व्यक्ती त्यांच्या अशा वागण्यातून अगदी सहजच स्वतःच महत्त्व वाढवतात.
६) नम्रता.
आलेल्या प्रसंग जे खूप अवघड असेल तर एकेकाची त्यामध्ये तारांबळ उडते आणि त्यावेळी आपण काय वागतो.. कोणाशी काय बोलतोय याच भान न ठेवता समोर.. मलाच खूप मोठं संकट आहे अस त्यांना वाटल्याने अवतीभवती असणाऱ्या व्यक्तींशी चुकीच्या पद्धतीने अनेकजण वागतात..
कोणी काही सांगायला गेलं की अनेकांचा स्वभाव असतो की ऐकून घ्यायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीचा त्याच्या वयाचा मान न ठेवता मोठ्या आवाजात त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलणे.. अरेराविने उत्तर देणे.. मीच योग्य माझंच खरं अस वागणे..
असा स्वभाव इतरांना त्रास देतो आणि अशा व्यक्तींना काही चांगल सांगण्याची सुद्धा कोणाची काही इच्छा राहत नाही.. आणि याउलट असे व्यक्ती असतात जे नेहमीच समोरच्याच म्हणणं ऐकून घेतात.. चुकीचं कोण आणि बरोबर कोण यामध्ये न वाद न घालता छान संवाद साधून त्या विषयावर बोलतात.. आणि त्यांच्यातील हीच नम्रता त्यांचा ठसा इतरांवर उमटवते.
७) नियोजन
कोणतीही गोष्ट करताना समोर आली आहे आणि मग ती करायची म्हणून न करता एक सुयोग्य नियोजन केल्याने आपला वेळ आणि आपली ऊर्जा वाचते.. आणि हे तेच व्यक्ती करतात ज्यांना वेळेचं आणि उर्जेच महत्त्व कळते.. आणि असे व्यक्ती त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन करतात..आणि नियोजनबध्द पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीचं कुठेही स्वागतच असते.
८) जगण्याचा वेगळा दृष्टिकोन
काही जणांचा स्वभाव खूप विनोदी असतो.. म्हणजेच ही लोक कोणत्याही वेळी घडणाऱ्या प्रसंगाकडे पाहताना गंभीर होत नाही.. प्रसंग कोणताही असो त्यांचा दृष्टिकोन मात्र त्या प्रसंगाला गंभीरतेने बघून अजून त्याच गांभीर्य वाढविण्यापेक्षा तो प्रसंग हसतखेळत हाताळण्याचा असतो.. कुठेही गेल्यावर हे व्यक्ती जिथे असतात तिथलं वातावरण खेळीमेळीचे असते.. त्यांच्या या स्वभावामुळे सर्वांनाच उत्साह मिळतो.. कितीही नाराज असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडे बघून आनंदी होतात..
आपल्याला जेव्हा आजच्या युगात चाललेल्या स्पर्धेत टिकायच असेल तर फक्त शिक्षण.. पैसा.. प्रॉपर्टी यामध्ये वर्चस्व वाढवून उपयोग नाही तर हे सगळं तेव्हाच कामी येईल जेव्हा या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याकडे एक उत्तम व्यक्तिमत्त्व असेल.. आणि उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणजे आपला सर्वांगीण विकास.. आणि जेव्हा आपल्याकडे इतरांवर प्रभाव पाडणारे हे सर्व गुण असतील तर नक्कीच आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करता येईल आणि आपण मिळवलेल्या सगळ्याच गोष्टींचा आनंद सुद्धा घेता येईल.
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


नौकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या व उपाय यावर देखील लेख लिहावं…. कृपया