पती पत्नीच्या नात्याला शरीरसुखा पलीकडे गरज असते ती… एकमेकांच्या सहवासाची !!
प्रेमविवाह केलेला स्वाती आणि दिनेश ने.. लग्नाला दोन वर्ष झाली पण या जॉब च्या धावपळीत दोघांनाही लक्षात सुद्धा आल नाही इतके दिवस भराभर उलटले.. लग्नाआधीच दोघांनीही ठरवलं होत की लग्न झालं की दोन तीन वर्षानंतर आपण मुलाबाळाचा विचार करूयात.. कारण पहिले दोघंही स्थिरस्थावर होण गरजेचं आहे.. आणि त्याशिवाय प्रेमविवाह करतोय पण तरीसुद्धा लग्नानंतर आधी नवरा बायको म्हणून आपल नात सुंदर करूयात.. एकमेकांना समजून घेणं.. काळजी घेणे.. जोडीदाराला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणं.. एकमेकांना गरजेच्या वेळी सांभाळून घेणं .. एकमेकांवरील घट्ट विश्वास.. असा हा नवरा बायको या नात्याचा पाया आपण इतका भक्कम करूयात की त्यानंतर आपण प्रत्येक नात्यात कुठे कमी पडणार नाही… आणि पालक होणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही..
जर आपण नवरा बायको म्हणून उत्तम नाही वागलो तर आई वडील म्हणून आपण काय आदर्श ठेवणार.. आपल्या मुलासमोर भांडण.. एकमेकांच्या चुका काढणे.. एकमेकांना समजून न घेणे..सतत तक्रारी करणे अशा चुकीच्या वागण्याने मुलावर वाईट परिणाम होतील त्यापेक्षा आधी आपण एकमेकांना वेळ देऊन छान समजून घेऊयात.. आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक जबाबदाऱ्या आपण दोघे मिळून छान नियोजन करून पार पाडूयात..
आपले जॉब सांभाळत… घर सांभाळणं..सर्वांशी असलेले आपले नाते जपणे ते नाते टिकवणे…यासाठी आपण आपलं नात आधी छान करूयात.. असा छान विचार या दोघांचा होता.. आणि त्यानुसार ते चालले होते..
पण त्यादिवशी अचानक स्वातीच पोट दुखू लागलं आणि तिला दवाखान्यात नेल्यावर कळलं की तिला अपेंडिक्स झाला आहे आणि तिला ऑपरेशन ची गरज आहे.. त्यामुळे स्वातीच ऑपरेशन करण्यात आल.. त्यानंतर तिला आरामाची गरज होती..
काही दिवस तिने माहेरी आराम केला.. पण त्यानंतर सासरी आल्यावर मात्र तिला काम न करू देता दिनेश ने जास्तीत जास्त तिला सांभाळून घेतलं.. त्याने घरच्यांना कामात मदत केली.. स्वातीला सासरचे नेहमी बोलायचे की लग्न झालं अजून मूलबाळ नाही आणि हे दुखणं घेऊन आली.. आमचा पोरगा बिचारा काय काय सहन करणार.. पण दिनेश नेहमीच सर्वांना गप्प करून स्वातीला समजवायचा..
जॉब करत..स्वातीची पूर्ण काळजी घेऊन.. तिला कोणताच त्रास होणार नाही याकडे दिनेश च नेहमीच लक्ष असायचं.. ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्यात कोणतेच शारीरिक संबंध सुद्धा नव्हते पण तरीसुद्धा दिनेश ने काहीच कधीच तक्रार केली नाही..
एक दिवस स्वाती दिनेशला बोलली.. की सगळे मला बोलतात वाईट वाटते पण खर सुद्धा आहेना.. माझं आजारपण.. आपल्याला मूलबाळ नाही.. आपल्यात कोणतेच संबंध सुद्धा नाहीत… पण एवढं असून तू इतका समजून कस घेतोस..
यावर दिनेश ने दिलेलं उत्तर स्वाती ऐकतच राहिली.. अग लग्न झाल्यावर आपण आपल नात पक्क करायचं ठरवलं होत.. मग नात पक्क हे येणाऱ्या अडचणी आणि संकटांनीच होते.. प्रत्येक दिवस आपल्याला पाहिजे तसा नसतो आणि आपण ज्या अडचणी विचारात घेतो त्यापेक्षा अजून वेगळे challange आपल्यासमोर येतीलच.. मग आज जर आपल्या नात्यावर छोटीशी वेळ आली आहे तर मी का माघार घेऊ.. ही वेळ सुद्धा एकमेकांच्या साथीने सहज निघून जाईल.. पुढे सर्व ठीक होईल..
नात हे काय फक्त आनंदासाठी असते का.. दुःखात सुद्धा एकमेकांची साथ दिली तर ते नात अजून घट्ट होते.. आणि राहिला प्रश्न तो शरीर संबंधाचा तर पती पत्नीच्या नात्यात शरीर संबधापेक्षा सहवासाची जास्त गरज असते.. एकमेकांचा सहवास खूप जास्त महत्वाचा असतो.. जो आपल्याला मिळतोय.. अजून काय हवं या नात्यात..
खरचं नात हे फक्त दिखाऊ नसावं.. पती पत्नी हे नात आयुष्यभराच असते… या नात्यात जशी विश्वासाची.. काळजीची.. प्रेमाची गरज असते तशीच गरजेच्या ठिकाणी सहानुभूतीची आणि सहवासाची तर असतेच.. मग शरीरसंबंध यांना प्राधान्य देण्याची गरज उरत नाही..ते नक्कीच महत्वाचे आणि गरजेचे असले तरी सहवासापेक्षा नाही..
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
👉🏽 क्लिक करा 👈🏽
“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
लेख आवडला