Skip to content

ज्या व्यक्तीत सामर्थ्य असतं, निसर्ग त्यांनाच समस्या देत राहतो.

ज्या व्यक्तीत सामर्थ्य असतं, निसर्ग त्यांनाच समस्या देत राहतो.


आज ऑफिस मध्ये एक कस्टमर आली होती. मला तीने घेतलेल्या लोन बद्दल विचारण्यासाठी. कामाच्या गडबडीत मी न बघताच तिच्या हातून तिचं पासबुक घेतलं आणि बॅलन्स सांगण्यासाठी जेव्हा तिच्या कडे बघितलं तेव्हा ती हसत माझ्या समोर उभी होती. दिसायला बऱ्यापैकी, हसरा चेहरा पण अंधळी!

तिला मी बसायला सांगितलं आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. मी सहज तिला विचारलं की तुम्ही जन्मता असे आहात का कुठल्या अपघातात असं काही झालं. तर ती बोलली की ती जन्मता अशी आहे. कुतूहल म्हणून मी तिची पुढची चौकशी केली तर तीने मला सांगितलं की ती एक छोटासा व्यवसाय करते आणि दर महा बऱ्यापैकी कमावते ज्याने तिचं वं तिच्या परिवाराचं भागतं.

मी तिला विचारलं की तुम्हाला वाटत असेल ना की निसर्गाने मला असं का बनवलं. इतरांसारखं मला का नाही डोळे दिले. तुम्हाला राग नाही येत निसर्गाचा? तर तीने हसऱ्या चेहऱ्याने मला उत्तर दिलं, मला निसर्गानी एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे, दोन हाथ दिले आहेत ज्याने मी काम करू शकते, दोन पाय दिले आहेत ज्याने मी चालू शकते, चांगली बुद्धी दिली आहे, एवढ्या चांगल्या गोष्टी निसर्गाने मला दिल्या आहेत मग डोळे ही एक गोष्ट त्याने मला नाही दिली त्यासाठी मी का रागावू.

तिचं हे उत्तर ऐकून मी खरंच निरुत्तर झाले आणि माझे डोळे पाणावले. कितीदा आपण आपल्याला कुठली गोष्ट नाही मिळाली म्हणून रागावते, चिडतो, हार मानतो, डिप्रेशन मध्ये जातो पण ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला निसर्गाने दिल्या आहेत त्याकडे आरामात दुर्लक्ष करतो. आपण अश्या गोष्टींच्या पाठीमागे धावत असतो ज्या आपल्यासाठी कदाचित निसर्गाने बनवल्याच नाही आहेत आणि जे मिळालं आहे ते सोडून रडत बसतो.

तिच्याशी बोलल्यावर तर मला वाटलं की अंधळी ती नाही तर मी आहे. एवढं सुंदर आयुष्य देऊन सुद्धा जे माझ्याकडे नाही आहे त्या साठी मी रडत बसतेय पण निसर्ग जो रोज मला जगण्याची नवीन संधी देतोय त्याकडे दुर्लक्ष करतेय.

खरंच आयुष्यात कुठलीच गोष्ट फोर्स नाही केली पाहिजे. आपल्या आयुष्याच्या लेखकाने (निसर्गाने) आपल्या आयुष्याची खूप सुंदर स्टोरी लिहिली आहे आणि त्याला फक्त आपली साथ हवी आहे. त्याच्या मर्जीप्रमाणे जर आपण वागलो, तो जे आपल्याला शिकवत आहे ते जर व्यवस्तीत शिकलो तर आपलं आयुष्य खरंच खूप सुंदर होईल.

रडत बसण्यापेक्षा जर आपण आपली कर्म केली तर त्याचं जे फळ आहे ते नक्कीच योग्यवेळी आपल्याला मिळणार. जो मानसिक रित्या प्रबळ नसतो तोच हार मानून मागे जातो आणि ज्याला आयुष्यात खरंच काही करायचं असतं तो कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा त्यातून यशस्वीरित्या मार्ग काढून पुढे जातो.

ज्या व्यक्तीत सामर्थ असतं निसर्ग त्यालाच प्रॉब्लेम्स देतो कारण एक तर निसर्गाला आपल्यावर भरवसा असतो आणि निसर्गाला त्या प्रॉब्लेम्स मधून आपल्याला खूप काही शिकवायचं असतं, घडवायचं असतं आणि आपलं आयुष्य सुरळीत करायचं असतं. जो काही त्रास असतो तो काही काळापुरता असतो आणि त्या वेळी खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायचा असतो. त्यात जर आपले निर्णय चुकले तर आयुष्य खराब होऊ शकतं. म्हणून म्हणतात ना रागात येऊन, घाबरून, भीतीने कुठलाही निर्णय घेऊ नये. आयुष्याचं चित्र थोडं झूम आऊट करून बघितलं तर आत्ता सध्या तुमच्या आयुष्यात चालू असलेले प्रॉब्लेम्स तुम्हाला खूप छोटे दिसतील.

तुमच्या आयुष्यात जो काही त्रास चालू आहे त्या मधून थोडे बाहेर या आणि तुम्हाला जे आयुष्य जगायचं आहे ते चित्र पहा आणि बघा निसर्ग कशी तुमची मदत करतो सगळं सुरळीत करण्यासाठी. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि भावनेत येऊन कुठलाही निर्णय आंधळेपणाने घेऊ नका. निसर्गाने दिलेल्या या देणगीचा योग्य वापर करा आणि आपलं आयुष्य योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे.

खरंच आज तिच्या हसऱ्या चेहऱ्यानी खूप मोठी जाणीव करून दिली. मी निसर्गाचे खरंच आभार मानते एवढी सुंदर शिकवण देण्यासाठी आणि आशा करते या लेखाने तुम्हाला थोडी तरी प्रेरणा मिळाली असेल. खुश रहा! मस्त रहा! हसत रहा!

लेखिका – पुजा सातपुते


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!