Skip to content

निसर्गाकडून आपल्याला आपली स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्याची संधी ही मिळतेच !!

निसर्गाकडून आपल्याला आपली स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्याची संधी ही मिळतेच !!


आज बऱ्याच दिवसांनी लहानपणी मी जिथे राहायचे तिथे शेजारी राहणारी माझ्या मैत्रिणीची अचानक भेट झाली. आम्हाला एकमेकांना भेटून खूप आनंद झाला आणि कुठून बोलायला सुरुवात करायची कळेनाच!

थोड्यावेळ एकमेकींची घट्ट मिठी घेऊन झाल्यावर आम्ही कॉफी शॉप मध्ये आलो आणि मग काय सुरु झाल्या आमच्या गप्पा आणि लहानपणीच्या आठवणी!

कधीच न विसरणारे ते दिवस, अगदी लहान सहान गोष्टी सुद्धा एकमेकींना सांगणारे आम्ही, कधी एकमेकींपासून दूर गेलो कळलंच नाही.

माझ्या वडिलांची बदली होणार म्हणून आम्हाला दुसऱ्या शहरात जावं लागलं. पन्नास वर्षांपूर्वी शेवटचं भेटले होते तिला आणि मग कुठलाच कॉन्टॅक्ट नाही. पण आज खरंच खूप बरं वाटलं. नुकताच पाऊसही सुरु झाला होता आणि पावसाच्या धारांबरोबर आमच्याही आठवनींच्या धारांनी वेग घेतला.

इतकी वर्ष कामामध्ये आणि संसारात इतके गुंतलो होतो की कोणाकडे, अगदी स्वतःकडेही लक्ष द्यायला जमलंच नाही. पण आज बालमैत्रीण भेटल्यामुळे आणि लहानपण आठवल्यामुळे खूप बरं वाटलं. गप्पा गोष्टी मध्ये कळलं की तिने मागच्या महिन्यात CA केलं. मी जरा शॉकच झाले. CA आणि या वयात. आम्हा दोघींनाही रिटायर्ड होऊन जवळ जवळ सहा वर्ष झाली असतील. मी तिला कुतूहलाने विचारलं इतक्या वर्षानंतर आणि या वयात CA करायचं तुला कसं सुचलं? तर तिने हसतच उत्तर दिलं, “आयुष्यभर तर इतरांचं ऐकलं आता रिटायरमेंट नंतर तरी स्वतःचं आयुष्य जगावं असं वाटलं म्हणून केलं”.

मला आठवलं बालपणी तिने मला सांगितलेलं की तिला CA व्हायचं आहे. पुढे ती म्हणाली, तुला तर माहिती आहे माझ्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. घरी पाच भावंड, त्यांची शिक्षण, घराचा खर्च यात वडिलांची कसरतच व्हाईची आणि त्यात मी जर माझं स्वप्न सांगितलं असतं तरी काहीच उपयोग नव्हता.

काही वर्षांनी शिक्षण झाल्यावर माझं लग्न झालं आणि कामात, संसारात कसा वेळ निघून गेला कळलंच नाही. रिटायर्ड झाल्यावर बघितलं की आपल्यासाठी कोणाकडे वेळच नाही आहे. सगळे स्वतःच्या लाईफ मध्ये बीझी आहेत. मग एक दिवस वृत्तपत्रात माहिती बघितली CA च्या क्लासची आणि अचानक लहानपणचं स्वप्न डोळ्यासमोर उभं राहिलं. सुरुवातीला जरा कठीणच वाटलं पण हिम्मत करून मी चौकशी करायला गेले आणि आज तु बगतच आहे. वयाच्या पासशटीला तरी नावाच्या पुढे CA लावायला मिळतंय, अजून काय हवं आहे.

तिचं ऐकून खरंच माझ्या अंगावर शहारा आला. आयुष्य ढकलण्यात कधी कधी आपला एवढा वेळ निघून जातो की कुठेतरी आपलं आयुष्य आपल्या मर्जी प्रमाणे जगणं राहूनच जातं. आपली स्वप्न जी आपल्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये असायची ती कधी त्यातनं पुसली जातात कळतच नाही.

आयुष्यात कधी कधी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो पण निसर्ग पुन्हा आपल्याला आपलं स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याची संधी देतो. ती संधी ओळखून वेळेत फायदा घेणं हे आपल्या हातात असतं. आपल्या पैकी बऱ्याच जणांची काहीना काहीतरी स्वप्न असतील आणि काही कारणाने ती पूर्ण झाली नसतील आणि मनात जर ते स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल तर हा लेख खास त्यांच्यासाठी आहे.

तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं कारण अजूनही वेळ गेली नाही आहे कारण जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. कठीण वेळेतूनही आपल्याला बरंच काही शिकायला मिळत असतं. आज जरी तुमच्या मनाप्रमाणे नाही झालं तरी सुद्धा हार न मानता आपण पुढे चालत राहिलो तर योग्य वेळी आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं. गरज असते ती फक्त संयमाची, नियोजनाची, सुसंगतेची, विश्वासाची आणि मेहनतीची. या गोष्टी जर असल्या तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं.

लेखिका – पुजा सातपुते


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!