एखाद्या गोष्टीबाबत पूर्वग्रदूषित असल्याने काय होते पहा.
आपलं मानवी मन, त्यातील विचार हे आपल्याला आलेल्या अनुभवांच्या आधारे, आजूबाजूला घडलेल्या घटना, निरीक्षणाच्या आधारे प्रभावित झालेले असतात. आपली विचारपद्धती आजूबाजूचे अनुभव, संस्कार, जडणघडण याचा जणू परिपाक असते. आपल्या एकंदरीत आयुष्यात विचारांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्याच्या आधारे आपण आयुष्यातील अनेक छोटे मोठे निर्णय घेत असतो. आपलं वागणं, आपल्या प्रतिक्रिया त्यावर आधारलेल्या असतात.
पण इथे महत्त्वाची गोष्ट ही की मेंदू नवीन गोष्टीला सामोरे जाताना बऱ्याचदा जुन्या अनुभवांचा आधार घेत असतो. आणि हे जे अनुभव असतात ते दर वेळी बरोबर असतातच असे नाही. फक्त जुन्या अनुभवांच्या आधारे सखोल विचार न करता जेव्हा व्यक्ती काही गोष्टी करते किंवा आलेल्या नवीन अनुभवाला समजून घेते तेव्हा ज्या विचारांच्या चुका होतात त्याला आकलनात्त्मक पूर्वग्रह असे म्हणतात. थोडक्यात आधी जे घडलं आहे त्या आधारावर नवीन गोष्टीचं चुकीच्या पद्धतीने आकलन करून घेणे, समजून घेणे.
हे पूर्वग्रह अनेक गोष्टींबाबत ठेवले जातात ज्यामुळे त्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. उदा. एखाद्या व्यक्तीला खूप जास्त यश मिळालं असेल त्याने त्याबद्दलची कहाणी सांगितली तर ती गोष्ट खरीच आहे असं मानणे. बरेचदा व्यक्ती उच्च पदाला पोहोचली की त्यांची कथा जगासमोर येते आणि त्यात बरेचदा त्यांनी कसा खडतर प्रवास केलेला असतो, संकटांचा सामना केलेला असतो याची माहिती असते.
या दोन गोष्टींचं समीकरण आपल्या डोक्यात इतकं पक्क असतं की कोणीही अश्या प्रकारे काही सांगीतलं तर ते आपण खर मानून बसतो. पण प्रत्येकवेळी ही गोष्ट खरी असेलच असं नसतं. लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करून त्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो याच आधारावर असतो. या व्यतिरिक्त व्यक्तीच्या मनात बसलेला पूर्वग्रह म्हणजे जे आधी कधी कधी घडलेच नाही ते यापुढेही कधी घडणार नाही असं वाटणे.
यातून व्यक्ती वास्तव स्वीकारत नाही. जी गोष्ट आधी कधी घडली नाही ती आता कशी घडू शकते अस तिला वाटू लागतं आणि जरी तसं काही झालं तरी ते स्वीकारता येत नाही. जसं घटनांबाबत तसच माणसांबाबत देखील होतं. एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण आधी काही चुकीचं ऐकलं असेल तर आपण त्या व्यक्तीला त्याच नजरेने पाहू लागतो. जरी आपण स्वतः तसा अनुभव घेतला नसला तरी मनात हा पूर्वग्रह राहतो आणि त्यानुसार आपण वागू लागतो.
अश्या या पूर्वग्रदूषित वागण्याने आपल्या आताच्या गोष्टींवर चुकीचाच परिणाम होतो, नात्यांवर चुकीचं परिणाम होतो. याच कारण ज्या व्यक्तीला आपण वैयक्तिक ओळखत नाही, पण कोणा दुसऱ्याच्या बोलण्यावरून आपण तिला पारखत असू तर आपण त्या व्यक्तीला नव्याने समजून असमर्थ ठरतं आहोत. आपण चुकीच्या दृष्टीने तिच्याकडे पाहू लागतो. घटनांच्या बाबत देखील असच होतं. आधीच्या गोष्टींवर अवलंबून जर आपण आताचा अनुभव घेत असू तर त्यातून आपण स्वतःच नुकसान करून घेतो.
आपले अनुभव, आधीच्या घटना या आपल्या पुढे जायला मदत करतात, त्यातून आपल्याला कसं वागायचं, जगायचं हे जरी समजत असल तरी त्यातून आताच्या गोष्टींवर काय परिणाम होत आहे तो खरंच आपल्यासाठी योग्य आहे का? की या वेळी आपण नव्याने विचार केला पाहिजे, गोष्टींना एका तटस्थ नजरेने पाहिले पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच आपण नवीन मार्ग शोधू शकतो.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

