Skip to content

तुम्ही केलेल्या निश्चयावर कोणी अडथळा आणत असेल तरी तुम्ही ठाम रहा.

तुम्ही केलेल्या निश्चयावर कोणी अडथळा आणत असेल तरी तुम्ही ठाम रहा.


रोहित ने शाळेत असताना ठरवलं होत की मी science घेणार मला त्यामध्येच खूप आवड आहे.. पुढे जाऊन मला त्यामध्येच माझं भविष्य घडवायचं आहे..आणि दहावी होताच त्याने ठरवलेलं सर्वांना सांगितलं पण त्यावेळी मात्र सगळ्यांनीच त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध केला.. अरे तुला जमेल का.. झेपेल का.. दहावीचा अभ्यास सोपा असतो पण जे तू ठरवत आहेस ते काय इतकं सोपं नाही.. आणि घरात कोणी इतके शिकलेले आहेत का की तुला त्यांचं मार्गदर्शन मिळेल.. आणि पुढचा खरचं कमी नाहीये.. कस. जमेल पुढचं करिअर करायला.. उगाच तू वेळ आणि पैसा वाया घालवतोस असच तुला नंतर वाटेल..

तर कोणी म्हणायचं की बघ तुला जमलं तर ठीक नाहीतर हल्ली ऐकतोना आपण नको त्या बातम्या की नाही काही जमल की आत्महत्या करून मोकळं व्हायचं.. तशी वेळ येईल अस काही आता ठरवू नकोस.. आजचे निर्णय उद्यावर परिणाम करतात.. आणि तू जरी चुकलास तरी घरची परिस्थिती इतकी चांगली नाही की सगळ सहज सोडून दुसर तुला निवडता येईल…

रोज रोज हे ऐकून रोहित ला त्यांच्या बोलण्याचा कंटाळा आला होता अनेकदा त्याची चिडचिड व्हायची.. एकदा तर त्याला इतका सगळ्यांच्या बोलण्याचा त्रास झाला की तो घर सोडून कुठेतरी निघून जाण्याचा विचार करत होता पण त्याचवेळी त्याला त्याच्या आईने समजावलं..

त्याची आई त्याला बोलली की मला तुझी मनःस्थिती कळतेय पण यामध्ये तू कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस.. तू जे ठरवलं आहेस ते जर तुझ्या आवडीच आहे आणि तुझ भविष्य घडवणार आहे अस तुला वाटतेय तर तू तुझ्या मतावर ठाम रहा. आज तुला सगळे विरोध करतील.. तुला पाठिंबा देणार कोणी भेटेलच अस नाही…

पण तू कोणाचं कडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नकोस..आता फक्त तुला तुझीच साथ द्यायची आहे हे मनाशी पक्कं कर…जे ठरवलं आहे ते फक्त बोलून नको तर करून दाखव.. तुला कोण काय काय बोलत आहेत याच्याकडे लक्ष देऊन आणि इतर कोणत्याही कारणाने स्वतःला चुकीच्या दिशेने भरकटू नको देऊस..

जगात असे अनेक व्यक्तिमत्त्व तुला सापडतील ज्यांनी सगळ्यांचा विरोध पत्करून स्वतःला घडवलं आहे.. कोणाची परिस्थीती साथ देत नाही तर कोणाची घरची माणसं.. तर कोणाला समाज त्रास देतो पण तरीसुद्धा शून्यातून जग निर्माण करण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द ज्याच्याकडे आहे तो सगळं सहन करून ..जिथे गरज तिथे दुर्लक्ष करून स्वतःची वाट न बदलता आपल ध्येय गाठतो.

म्हणून आज तू सुद्धा तुझ्या मतावर ठाम रहा.. कोणाला तोंडाने उत्तर न देता कर्तुत्वाने उत्तर दे.. आणि ही जिद्द मनाशी ठेवलीस तर तुला अवघड अस काहीच नाही.. आणि जरी अपयश मिळालं तर मागे न बघता पुढे जाण्याचा अट्टाहास मनाशी बाळग…

हे सगळ ऐकून रोहितच्या मनातील आलेले चुकीचे विचार अगदी चटकन दूर झाले आणि त्याची गगनभरारी घेण्याची हिम्मत वाढली..

आज रोहित त्याने ठरवलेल्या क्षेत्रात त्या विभागाचा प्रमुख म्हणून काम करतोय आणि ज्याच्या भविष्यावर सर्वांना शंका होती ..ज्याच्या निर्णयावर सर्वांनी अविश्वास दाखवलेला त्यांना त्याने त्याच्या कर्तुत्वाने चांगलच उत्तर दिलं आहे..

म्हणून कधी हार नाही मानायची.. कायम स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि जिद्दीने जगायचं.लोक कुठेही आपल्याला त्रास देणारं.. कधी आपले विचार आपल्याला त्रास देणारं.. पण कोणत्याच त्रासामुळे आपल्या हिताचे निर्णय न बदलता घेतलेले निर्णय सत्यात उतरवायचे.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!