Skip to content

जवळची व्यक्ती जोपर्यंत चिडते, रागावते, हट्ट करते, तोपर्यंतच ती तुमची असते.

जवळची व्यक्ती जोपर्यंत चिडते, रागावते, हट्ट करते, तोपर्यंतच ती तुमची असते.


त्यादिवशी ती नेहमीपेक्षा वेगळी वागत होती… रोज कामावरून आल्यावर तिचा चेहरा पाहिला की असलेला सगळा थकवा कुठे पळून जातो कळत सुद्धा नाही.. मी तिला विचारलं काय झालं पण अहो काहीच नाही अस म्हणत तीने उत्तर देणं टाळलं..

एरवी अगदी छोटीशी गोष्ट आणली नाही म्हणून माझ्यावर वैतागणारी.. माझी सतत काळजी घेणारी..कुठे फिरायला जायचं ठरलं आणि मला कामावरून यायला उशीर झाला की झटक्यात रागवणारी.. आज मला शॉपिंग करायची.. मला हेच हवं तेच हवं असे हट्ट करणारी.. मनाविरुद्ध काही झालं की लगेच रुसणारी त्यादिवशी अचानक इतकी शांत पाहिल्यावर मी सुद्धा विचारात पडलो…

मी खूप प्रयत्न केले तिला विचारण्याचे पण ती टाळाटाळ करून दुसरच काही बोलून विषय तिथेच सोडून द्यायची… अस काही दिवस चालूच होत.. आमच्या दोघांमध्ये जवळ असून सुद्धा खूप अंतर पडलं अस मला जाणवू लागलं… जी माझ्यावर हक्क दाखवायची ती आज तिची तीच राहते अस तिच्या वागण्यात मला स्पष्ट दिसत होत..मी अगदीच काळजीत पडलो.. मी तिला काही बोललो का.. की माझं वागणं कुठे चुकलं आहे याचा मी चांगला विचार केला.. नंतर माझ्या लक्षात आले की मध्ये काही दिवस मी तिच्यावर सारखं वैतागत होतो.

खरं तर माझ्या कामाच्या ठिकाणी अनेकांची बदली झाली.. कोणाला कामावरून काढण्यात आल.. तर कोणाचे पगार कमी झाले.. आणि या सगळ्यात मी वरच्या पोस्ट वर असल्याने माझा ताण खूप वाढला होता.. येता जाता कोणाचं टेन्शन… कोणाच्या तक्रारी.. कोणाच्या विनवण्या.. आणि वरच्या अधिकाऱ्यांचे आमच्यावर असलेलं प्रेशर यामुळे मीच वैतागलो होतो.. आणि त्यात कधी उशीर झाला की ती रागवायची.. माझं त्यावेळी कशात मन नसल्याने तिचे त्यावेळी हट्ट नकोसे वाटत म्हणून अनेकदा मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं…

ती काही मस्ती करत असेल.. मस्करी करत असेल तर मी उलट तिच्यावर चिडायचो.. तिच्याशी फारस बोलत नव्हतो…

आणि माझी बायको जे वागते आहे हा त्याचाच परिणाम आहे हे माझ्या चांगलच लक्षात आले.. आणि यात मला माझीच चूक जाणवली..

मी एकतर तिला माझ्या कामाच्या ठिकाणी जे चाललं होत याची कल्पना द्यायला हवी होती.. ते तर मी केलं नाही आणि उलट तिच्याशीच वागताना विचीत्रपणा केला.. जर तिला मी सांगितलं असत तर तिने मला नक्कीच त्यावेळी सांभाळून घेतलं असत.

आणि जरी मी तिच्यावर चिडलो असतो तरी तिने मला समजून घेतल असत.. पण माझ्या अशा वागण्यामुळे तिला त्याचा अर्थ लागत नसेल..

मी तिच्याशी संवाद साधायला हवा होता.. पण मी शांत राहून तिला स्वतःपासून लांब केलं..

त्यादिवशी मला ती माझी वाटत नव्हती… अगदीच आमच्यात असलेलं नातं म्हणून ती माझ्यासोबत राहते अस वाटल.. पण यात तिचा काहीच दोष नव्हता.. माझं चुकल होत.

मी त्यावेळी तिची क्षमा मागितली.. त्यावेळी माझ्या कामाच्या ठिकाणी असलेल्या ताणाची तिला कल्पना दिली.. आणि यापुढे माझ्याकडुन कधीच अशी चूक होणार नाही याची तिला खात्री दिली..

ती दुखावली पण मला मात्र ती काहीच बोलली नाही.. तीच कर्तव्य तिच्या जबाबदाऱ्या आज सुद्धा ती अगदी नेटाने पर पाडत आहे..

तिच्यासाठी तेव्हा मी जे वागलो ते अनपेक्षित होत.. आणि त्यामुळे तिची माझ्यावर हक्क दाखवण्याची इच्छा तुटली असेल.. आणि म्हणूनच ती कोणतेच हट्ट करत नव्हती.. रुसत नव्हती.. चिडत नव्हती..

पण मी तिच्याशी मनमोकळ बोललो..आमच्यात छान संवाद झाला.. आणि आज पुन्हा तोच हक्क तिने माझ्यावर दाखवला..

बऱ्याचदा आपण आपल्या माणसांना गृहीत धरतो.. पण तीच चूक आपल्याला त्यांच्यापासून दूर करते.. म्हणून कधीच कोणाला गृहीत धरू नका.. संवाद साधा.. मनमोकळ बोला.. मनातले विचार एकमेकांना सांगा.. कोणतही टेन्शन असेल तर ते नक्कीच आपल्या माणसांना सांगा.. आणि त्यांच्या वागण्यात बदल जाणवला तर दुर्लक्ष न करता त्याची दखल घ्या त्यावर उपाय करा.. पण आपल्या माणसाला आपल्यापासून दूर जाण्याची संधी देऊ नका.. जे आपल्यावर हक्क दाखवतात.. आपली काळजी करतात.. आपल्यासाठी कायम उभे असतात.. आपली साथ देतात.. वेळ पडली तर आपल्यासाठी भांडतात आणि आपल्याशी सुद्धा हक्काने भांडतात.. त्यांना आपण असेच हक्काचे वाटलो पाहिजेत म्हणून नेहमीच आपल्या नात्याची काळजी घ्या..

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!