कोणा दुसऱ्याच्या मतावर आपण आपलं मुल्यमापन करावं का?
“मी खरंच खूप वाईट आहे, मला नाही जमत काही करायला, एक गोष्ट करायला गेले की चार गोष्टी बिघडवून ठेवते. म्हणून कोणी मला काही जबाबदारी देत नाही. मी ती घेऊही शकत नाही.” “रिया काय झालंय? आत एकटीच बसून काय बोलते आहेस? मला सांगणार आहेस का काय झालंय ते?” निधी, रियाची बहीण तिला बाहेरून हाक देत होती. आज कॉलेजमधून आल्यापासून रियाचा मूड बिघडला होता. आली तशीच कोणाशी काहीही न बोलता खोलीत जाऊन बसली.
निधीने आधी लक्ष दिलं नाही. पण आता तिला येऊन खूप वेळ झाला होता आणि अजूनही ती खोलीतच होती. तेही स्वतःशीच काहीतरी बडबडत होती. रिया घरात सर्वात जास्त कोणाच्या जवळ होती तर ती म्हणजे तिची ताई, निधी. काहीही झालं तर ती निधीकडे तिचं मन मोकळं करायची, दिवसभरात काय काय झालं ते सांगायची. पण आज तसं काहीच झालं नाही. म्हणून निधीला तिची काळजी वाटू लागली व ती तिला हाक देऊ लागली.
निधीची हाक ऐकून रियाने दार उघडलं व परत आत जाऊन रडू लागली. तशी निधी आत आली व तिच्यासमोर येऊन बसली. तिला माहित होत की आता जर तिने रियाला काही विचारलं तर ती अजूनच रडू लागेल, तिला नीट सांगताही येणार नाही. तिने थोडा वेळ जाऊ दिला व रियाच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत केलं.
आता रिया स्वतः हूनच निधीला सांगू लागली. “ताई, मी खूप वेंधळी आहे, काहीही करायला गेले तरी माझ्याकडुन चुका होतात. मला काहीच नीट करता येत नाही.” यावर निधीने तिच्याकडे शांतपणे पाहिलं व तिला विचारलं, “असं का वाटत तुला? कोणत्या आधारावर तू हे बोलते आहेस?” “कारण तसच आहे ताई! तुला माहित आहे आमच्या कॉलेजचा जो सांस्कृतिक विभाग आहे त्यात मला पण घेतलं होतं.
प्रत्येकाला काही ना काही काम वाटून दिलेले आहे. तसच माझ्याकडे पण काही गोष्टी होत्या. पण मी त्या करायला गेले की काहीतरी मागे पुढे होतच आहे. कोणाला काही निरोप द्यायचा असेल तर ते गडबडीत राहून जातं किंवा मग काही गोष्टी करायच्या राहतात. आणि आज तर मी स्वतः काही मुलींना ज्या या विभागात आहेत; त्यांना माझ्याविषयी बोलताना ऐकलं.
त्या आमच्या विभाग प्रमुखाला सांगत होत्या की या मुलीला अजून गोष्टी जमत नाही आहेत. आमचं अस मत आहे की आपण दुसऱ्या कोणालातरी ही जबाबदारी द्यावी. बरं त्यांनी ही गोष्ट मला देखील सांगितली की, तू अजून तेवढी सक्षम नाहीस, पुढच्या वेळी तू ही गोष्ट कर. मला इतकं वाईट वाटलं ताई. मी त्यांना काही बोलूही शकले नाही. त्यांचं म्हणणं कुठे चुकीचं होतं? मी करतेच अश्या गोष्टी की माझ्याविषयी बाकीची असच मत बनवणार.”
निधीने तिचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. रिया किती संवेदनशील मनाची आहे हे तिला माहीत होतं. तिला रियाला समजवायला सुरुवात केली. “मला सांग रिया, त्या मुलींनी तुझ्याविषयी एक मत बनवलं, ते त्यांची तुझ्या प्रमुखाला पण सांगितलं. त्या तुझ्याकडे येऊन बोलल्या. पण या सगळ्यात ते प्रमुख तुला येऊन काही बोलले का?” त्यावर रियाने नकारार्थी मान हलवली.
“बरं तू ही जी जबाबदारी घेतली आहेस ती या आधी कधी घेतली आहेस का? असं काम तू यापूर्वी कधी केलंस का?” त्यावर रिया म्हणाली, “नाही ना ताई, मी पहिल्यांदा अस काहीतरी करते आहे. त्यात पण इतक्या चुका.” “रिया जर तू पहिल्यांदा अस काही करत आहेस तर अशी अपेक्षाच कशी करू शकते की तुझ्याकडुन सर्व काही ठीक होईल? आणि राहिला प्रश्न त्यांच्या मताचा, तर प्रत्येक माणूस समोरच्या माणसाबद्दल काही ना काही मत हे बनवत असतो.
ही जी मतं असतात ती त्या त्या कृतीला धरून असतात किंवा त्या प्रसंगापुरती असतात. त्या मतांवर आपण आपलं पूर्ण मुल्यमापन करू शकत नाही. असे प्रसंग घडण्यामागे इतरही काही गोष्टी असू शकतात, त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती आपल्याला ओळखायला पण चुकलेली असते. मी तुला दुसऱ्यांच्या मतांचा आदर करू नको असं सांगत नाही.
आपण या मतांचा विचार आपल्यामध्ये कश्या पद्धतीने सुधारणा करता येईल यासाठी केला पाहिजे. समोरच्याने जर आपल्याविषयी काही मत बनवलं आहे तर ते कसं बदलता येईल, त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर त्यांच्या मताला घेऊन आपण स्वतःलाच नाव ठेवू लागलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही गोष्टीला जितकं गरजेचं आहे तितकच महत्त्व दिलं पाहिजे, मग ती इतरांची मत असली तरीही.”
आपल्या आयुष्यात माणसं येत राहतात, प्रत्येकाचं आपल्याविषयी काही ना काही मत हे बनत जात. पण यावरून आपलं माणूसपण ठरतं नाही. कारण जितके आपण स्वतः ला ओळखत असतो तितकं आपल्याला कोणीच ओळखत नसतं. त्यामुळे जर मुल्यमापन करायचं असेल तर स्वतः ला नीट चांगल्या पद्धतीने ओळखून करा. दुसऱ्या कोणाच्या तरी मतावर नाही.
लेखिका – काव्या गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

