Skip to content

जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला त्रास होत नाही.

जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला त्रास होत नाही.


जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला स्वतःला आणि आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना आपल्या माणसांना सुद्धा त्यामुळे त्रास होत नाही…

कालच माझी मैत्रीण मला सांगत होती अग लग्न झालंय सर्व माणसं खूप चांगली आहेत मी खुश आहे पण… आता तिच्या या एका पण शब्दाने तिच्या आनंदी जगण्यावर काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण केला होता… मी विचारलं काय झालं.. पुढे काय.. त्यावर ती बोलली की अग बघणा सगळेच माणसं सारखी नसतात हे खरं.. माझ्या सासरी सर्व चांगले असले तरी म्हणतात ना पैसा हा माणसाला माणुसकी पासून दूर ठेवतो.. मधल्या काळात माझ्या माहेरची परिस्थिती काहीशी ठीक नव्हती आणि त्यावेळी त्यांना आर्थिक गरज होती पण त्यावेळी माझ्या सासरच्या माणसांनी दुर्लक्ष केलं.. माझा नवरा त्यांची मदत करायला जाणार तर त्याला सुद्धा त्यांनी अडवल.. पण त्याने त्यांच्या नकळत माझ्या माहेरी मदत केली…

त्या दिवसापासून मला माझ्या सासरच्या माणसांबद्दल काहीसा का असेना पण राग येतोय.. मी त्यांना काही बोलत नाही.. पण माझ्या नवऱ्याला मात्र मी नेहमी म्हणते की आपलं लग्न झालं तेव्हापासून माझ्या माहेरच्या माणसांनी कधी आपल्या संसारात ढवळाढवळ केली नाही.. त्यांनी त्यांची कर्तव्य अगदी चोख पार पाडली.. मुलीला सासरी कोणी काही सूनावेल अस कोणतंच वागणं त्यांनी ठेवलं नाही.. त्यांचं आणि आपलं नातं त्यांनी अगदी मनापासून जपलं.. आणि एवढं सगळ असताना जर त्यांना एकावेळी मदतीची गरज वाटली तेव्हा मात्र आपल्या घरच्यांनी त्यांना अगदीच दुर्लक्षित केलं..

माझ्या मनातून हे सगळं कधीच जाणार नाही.. यावर मी तीला एवढच बोलली.. की मला सांग त्यावेळी तुझ्या माहेरच्या माणसांना मदत कोणी केली..तुझ्याच नवऱ्याने ना.. म्हणजे त्याने तर दुर्लक्ष नाहीना केलं.. त्याने तुझ्या माहेरच्या माणसांना साथ दिली आणि तुला कुठे दुखावलं नाहीना..

त्यावेळी तुझ्या घरच्यांना मदतीची गरज होती आणि ती मदत त्यांना मिळाली यातच तू आनंद मानून घेतलास तर पुढचे विचार तुझ्या डोक्यात आलेच नसते…

एकेकाचा स्वभाव अस समजून जर तू दुर्लक्ष केलं तर त्याचा त्रास तुला होणार नाही.. आणि खरं सांगायचं तर तुझ्या विचार करण्याने किंवा अगदीच जरी तू त्यांच्याशी वाईट वागली तरी त्यांच्या स्वभावात बदल तर घडणार नाही.. उलट अजून तुमचे संबंध बिघडतील.. याचा त्रास मात्र तुझ्याशी कायम चांगल वागणाऱ्या तुझ्या नवऱ्याला आणि तुला होईल..

हे झालं ते झालं.. त्यामधे तुझ काही नुकसान तर नाहीना झालं.. कोणीतरी आलेना मदतीला.. मग बस झालं.. आज तू हे मला सांगतेस उद्या अजून बरेच अनुभव तुला मिळतील.. अजून चांगले वाईट स्वभाव तुला कळतील.. कोणाचं वागणं बघुन तुला आनंद मिळेल तर कोणाचं वागणं बघुन तुला धक्काच बसेल..

पण हे सगळं तिथेच सोडलं तर बरं नाहीतर विचारांचं ओझ मनात ठेवून तू कधीच आनंदी राहणार नाहीस.. मनसोक्त आयुष्य जगणार नाहीस… प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात.. ते स्वभाव बदलावेत .. ही व्यक्ती चांगली कधी वागेल.. या व्यक्तीचे विचार का असे असतील.. ही व्यक्ती अशीच नेहमी वागते .. ही व्यक्ती कधी सुधारणार.. या सगळ्या अपेक्षांचं ओझ सोबत घेतलं तर पुढचा प्रवास कधीच सरळ सोपा होणार नाही..

त्यापेक्षा त्यावेळी जे जाणवलं ते तिथेच सोडून पुढे सरकता आल पाहिजे.. आज जर तू त्यांचा विचार केला तर तुला तुमच्या दोघांच्या सुंदर नात्याचा आनंद घेता येणार नाही.. आणि जे चांगल चाललय ते सुद्धा तुझ्या विचारांनी बिघडणार.. आपण स्वतःमध्ये बदल नक्की घडवू शकतो..

पण सगळ्यांचे स्वभाव आपल्याला बदलता येतीलच याची खात्री नाही.. प्रयत्न करावेत पण यात अडकु नये . नाहीतर आपण जे आता चांगल आहे ते सुद्धा गमावून बसू.. म्हणून जे आहे ते आहे याचा स्वीकार करून पुढे जाण्यातच शहाणपणा असतो…

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!