Skip to content

मनासारखं घडलं नाही की खूप त्रास होतो?

मनासारखं घडलं नाही की खूप त्रास होतो?


मला ती शेजारच्या बिट्टूकडे आहे नं अगदी तशीच बाहुली हवी. नाहीतर मग ती रिमोट कंट्रोलची कार नाहीतर व्हीडीओ गेम हवी पासून ते मुंबईत एखादं समुद्रकिनारी छोटसं का होईना पण हक्काचं घर असावं पर्यंतचा प्रवास कसा सरतो कळतही नाही. दिवस कसे भराभरा निघून जातात. हातातून वाळू निसटावी तसे हे दिवस सहजपणे निसटतात.

जन्माला आल्यापासूनच आपण किती आकांक्षा घेऊन आलेले असतो.खूप सारी छोटी मोठी स्वप्नं आपल्या डोळ्यात शांतपणे विहार करत असतात.प्रत्येकाला वाटत असतं सगळं पूर्ण व्हावं.जे जे हवय ते ते मिळावं.अगदी सगळं काही आपल्या मनासारखं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं.प्रत्येकजण गोष्टी मनासारख्या हव्या म्हणून जीव मुठीत घेऊन जगत असतो.

स्वप्नांचा पाठलाग करताना पैशाच्या मागे जीवाच्या आकांताने धावणारा माणूस सर्वांनीच पाहिला असेल नं ?

किती आणि काय काय करत असतो आपण…गोष्टी मनासारख्या व्हाव्या म्हणून. पण अनेकदा आपली झोळी रिकामी ती रिकामीच राहते.पदरी फक्त निराशा येते.गोष्टी काही मनासारख्या घडत नाहीत. आणि मग इवल्याशा मनाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. खरचं मनासारखं घडलं नाही की खूप त्रास होतो.

केवळ स्वप्नच नाही तर रोजच्या जगण्यात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. ज्या मनासारख्या घडत नाहीत. कधी मैत्रीत,रिलेशनशिपमध्ये मनासारखं घडत नाही. परिक्षेत मनासारखे गुण मिळत नाही. एखादं चित्र हवं तसं परफेक्ट येत नाही. एखादी रेसिपी मनापासून बनवायला गेलं की का कोण जाणे पण ती रेसिपी तितकीशी जमत नाही. मनासारखी भाजी मिळत नाही.मनासारखी नोकरी, व्यवसाय होत नाही. अगदी छोट्या छोट्या अशा गोष्टी अनेकदा मनाविरुद्ध घडत असतात. अशा वेळी खूप त्रास सहन करतो आपण.

आयुष्यात मनासारखं काही घडत नसलं की आपण फार चिडचिड करायला लागतो. जणू जगणंच निरस झालय असं आपण वागत असतो.याच गोष्टींचा कित्येकदा आपण दुसऱ्यावरही राग काढतो.हळुहळू मानसिक संतुलन बिघडत जातं.कुठे सहसा लक्षही लागत नाही.

एक गोष्ट मनासारखी झाली नाही तर अनेकदा आपण ते स्विकारतोही.पण हळुहळू एकामागोमाग एक अशा सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडेनाशा होतात.ते स्विकारणं मात्र आपल्याला अवघड जातं.चिडचिड, राग सगळं कसं एकवटून येतं.काय करू आणि काय नको अशी आपली अवस्था होत राहते.

तर मित्रांनो, आयुष्य असचं आहे. अशा गोष्टी आयुष्यात घडत असतात.त्यात नाकारण्यासारखं काहीही नाही. खरं तर अशा गोष्टी आपण सहजतेने स्वीकारण्याची गरज आहे. कधी कधी acceptance खूप महत्वाचा असतो.तो आपण अंगीकारायला हवा.तरच कुठेतरी मनाला होणारा त्रास कमी होऊ शकतो.नाहीतर मनासारखं घडत नाही म्हणून आपण रडत कुढत बसून राहिलो तर पुढचं आयुष्य कसं बेचव असेल याची कल्पना करून पहा.त्रास करून घेतला तर तो जास्त जाणवत राहतो.त्यापेक्षा कोणत्या गोष्टीचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवून पहा.गुंतलेल्या कितीतरी गोष्टी सहजपणे सुरळीत होतील.

बिंधास्त घडूद्यात मनाविरुद्ध….घाबरायचं नाही. एक पाकळी उमलली नाही म्हणून फुल हिरमुसतं का ? फुलपाखरू दुसऱ्या फुलावर जातं म्हणून बाकी फुलं रूसतात का ? अवेळी पडणाऱ्या पावसावर चातक रागावतो का ?

नाही….. नं ? मग आपण एक मनासारखं झालं नाही तर लगेच नाराज होतो.आपल्याच आयुष्यावर हिरमुसतो. दुसरं फुल उमलूही शकतं यावर आपण विश्वास ठेवायला हवा नं ?अगदीच निराश होऊन कसं बरं चालेल ?

थोडं आशेच्या हिंदोळ्यावरही जगून पाहूयात नं !

गोष्ट कोणतीही असूद्या,प्रयत्न करणं थांबवू नका.कधीतरी चांगलं होईल यावर विश्वास ठेवून चालायला शिका.एकाच रस्त्यावर थांबण्यापेक्षा नव्या वाटा धुंडाळायला शिका.होणारा त्रास नक्कीच कमी होईल.

थोडं हसायलाही शिका.मनासारखं घडत नाही म्हणून सतत रडत बसू नका.

विचार करा….आयुष्य खरचं खूप सुंदर आहे.

लेखिका – हर्षदा पिंपळे


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मनासारखं घडलं नाही की खूप त्रास होतो?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!