Skip to content

काहीवेळेस आपण चुकीचे नसतो पण ते शब्दच आपल्याजवळ नसतात जे आपल्याला खरे सिद्ध करतील.

काहीवेळेस आपण चुकीचे नसतो पण ते शब्दच आपल्याजवळ नसतात जे आपल्याला खरे सिद्ध करतील.


रिमा आणि सीमा जीवाभावाच्या मैत्रिणी. सगळं एकमेकींमध्ये नेहमीच वाटून घ्यायच्या. नवीन वस्तू आणली तर लगेच एकमेकींना सांगून मोकळ्या व्हायच्या. इतकच नाही तर दोघींमध्ये बरेच काही सिक्रेट्स असायचे.दोघीही हुशार होत्या. अभ्यासात, खेळात अगदी सगळ्याच बाबतीत. एक दिवस अचानक रिमाचं वागणं रिमाच्या आईला खटकलं.आपली मुलगी भरकटतेय असं त्यांना वाटत होतं.

अभ्यासातही तिला आधीपेक्षा जरा कमीच गुण मिळाले. शाळेतूनही बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या होत्या.आणि या सगळ्यामुळे रिमाच्या आईने सीमाला नाही नाही ते सुनावलं.या सगळ्याला तुच जबाबदार आहे असं म्हणत तिला रागे भरले.खूप आरडाओरड केली.सीमाने रिमाच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.सीमाचं म्हणणं रिमाच्या आईला पटत नव्हतं.

इतरांच्या संगतीत राहून रिमा बिघडत चालली होती.सीमाची यामध्ये काहीही चुक नव्हती.परंतु तिच्याकडे स्वतःला खरं सिद्ध करणारे शब्दच नव्हते.

शेवटी कंटाळून तिने स्वतःला सिद्ध करणं थांबवलं.

एक दिवस मात्र रिमाच्या आईला सीमा खरी होती हे कळून चुकलं.

ही झाली रिमा सीमाची गोष्ट….
पण आपणही आपल्या जीवनात अशाच घटना अनुभवत असतो.

“अगं मी खरच काहीही चुकीचं वागलेले नाही. माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव गं…तुला वाटतय का मी असं काही करू शकते.प्लीझ्…..ऐक ना माझं.एकदा तरी ऐक.मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेन ? ”

” ताई,अहो मी काहीही केलेलं नाही. मी चोरी केली नाही. कसं सांगू तुम्हाला ? माझ्या घरी सगळं आहे. मला चोरीचं आणायची सवय नाही हो.हवं तर तिला विचारा.मला चोरी करायची सवय नाही. माझ्याकडे काही पुरावे नाहीत पण खरचं मी काहीही केलेलं नाही. एकदा विश्वास ठेवा माझ्यावर.”

“तु चुकीचं वागली नसशीलही. पण मग मी यावर विश्वास कसा ठेवायचा? काहीतरी असेन नं ? जे की तुझी खरी बाजू
मांडू शकेन…मला पटवून दे.मग मी ठरवेन विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा.काय येतय का लक्षात ?”

असे संवाद आपल्याला काही नवीन नाहीत. आपल्या रोजच्या जीवनात असे संवाद आपण नेहमीच ऐकत असतो.कारण हे सर्व आपल्या बाबतीत अगदी सहजतेने घडत असतं.पहा,प्रत्येकाच्या बाबतीत असं काहीतरी नक्कीच घडलेलं असेन.स्वतःला सिद्ध करता करता जीव थकला असेल.”मी चुकीचा नाही/चुकीची नाही .” असं सांगून सांगून प्रत्येकजण नक्कीच वैतागला असेल यात शंकाच नाही.

तर मित्रांनो, चुकत कोण नाही ? इथे असणारा प्रत्येकजण कधीतरी चुकत असतो.फरक इतकाच की कुणी जाणूनबुजून चुका करतं तर कुणाकडून अनावधानाने चुका होतात.तर काहीजण केलेल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करतात. त्यावर नम्रपणे माफीही मागतात. पण काहीजण असे असतात की ते कधीही लवकर त्यांच्या चुका मान्य करत नाहीत.काहीजण चुका करून नामानिराळे होतात. आणि दुसरे मात्र त्याचा त्रास सहन करत बसतात. चुक एक करतो आणि शिक्षा दुसऱ्याला मिळते.

चुक न करणारा जीव तोडून सांगत असतो,” मी चुक केली नाही, माझा यात काही दोष नाही.” परंतु याच काही फारसा उपयोग होत नाही. खरचं कित्येकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खरे असतो.आपण काहीच केलेलं नसतं.परंतु आपल्याकडे ते सिद्ध करण्यासाठी ते शब्दच नसतात.आणि अशावेळेस आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

अनेकदा सगळा त्रास सहन करून झाल्यावर आपण निर्दोष सापडतो.त्यावेळी मनावरचं ओझं , मनावरचा गिल्ट निघूनही जातो.परंतु झालेला त्रास मात्र विसरता येत नाही.

तर अशा गोष्टी घडत असतात. अनेकदा खरेपणा सिद्ध करताना शब्द अपुरे पडतात. पण खरेपणा हा एक दिवस सिद्ध होत असतो.सत्य सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही.

त्यामुळे अशा प्रसंगामध्ये आपला संयम खूप महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून थोडाफार संयम ठेवणं आवश्यक आहे.

So..संयम ठेवून अशा परिस्थितीला बिंधास्त सामोरं जा.आयुष्य सुंदर आहे ते रडतकुढत जगू नका.

लेखिका – हर्षदा पिंपळे


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!