‘ करावंच लागेल ‘ हा एकच पर्याय समोर असला की सगळी ताकद पणाला लागते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
काही दिवसांपूर्वी एक सुंदर गोष्ट कानावर पडली. एक मुलगा असतो, शाळेत जाण्याच्या वयाचा. शाळेत जात असला तरी अभ्यासाबाबत कधी आस्था नाही. प्रत्येक वेळी काही ना काही पळवाटा शोधायच्या. त्या त्या वेळी तो गोष्ट नीट, मनापासून न करता त्यातून पटकन कसं बाजूला होता येईल, शक्य तितकं त्यातून लगेच बाहेर कसं पडता येईल हे तो पाहायचा. मग तो अभ्यास असेल किंवा मग परीक्षा. कॉपी करणे, शॉर्ट कट वापरणे अस करून तो कसातरी पास झाला. त्याने पदवी मिळवली. इतके दिवस त्याने प्रत्येक गोष्टीत पळवाटच काढली होती.
पण आता तो इंटरव्ह्यूला चालला होता. इथे त्याला समोर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणं भाग होतं. इथे त्याच्यासमोर कोणतीच पळवाट नव्हती. जे काय होत त्याला सामोरं जायचं होतं त्यातच त्याचं भलं होतं. ज्या मुलाने इतक्या वर्षांत सर्व गोष्टीपासून त्याला सरतेशेवटी परिस्थितीला सामोरं जावंच लागलं. हेच या गोष्टीचं तात्पर्य आहे.
आपल्या आयुष्यात जे प्रसंग येत असतात, जी आव्हानं येत असतात त्याच्यापासून बरेचदा आपण पळायचा प्रयत्न करीत असतो, कसंही करून या प्रसंगापासून लांब कसं जाता येईल हे पाहत असतो. आपल्याला त्याचा सामना करायचा नसतो याच एक कारण म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपली तेवढी क्षमताच नाही. आपण त्या परिस्थितीला सामोरं जाऊच शकत नाही.
हे चक्र आता नाही तर अगदी आदिम काळापासून चालत आलेले आहे. लढा किंवा पळा या मध्ये माणूस सर्वात आधी पळायचाच प्रयत्न करतो. पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण गोष्टींना कितीही नाकारलं, त्यापासून दूर जायचा प्रयत्न केला तरीही सत्य हेच आहे की आपल्याला त्याचा कधी ना कधी सामना करावाच लागतो आणि आता आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे हा एकच पर्याय जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपली सर्व शक्ती पणाला लागते.
ही शक्ती आपल्यामध्ये पूर्वीपासूनच असते. हे सामर्थ्य, कोणतेही काम पूर्णत्वास नेण्याची क्षमता माणसामध्ये मुळातच असते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते, किंबहुना ती जाणीव आपल्याला व्हावी ही संधीच आपण कधी स्वतःला देत नाही. आपल्याला सर्व गोष्टी सरळ, साध्या लगेच व्हायला हव्या असतात. कोणालाही कसल्याही प्रकारचा अडथळा नको असतो. त्याची जाणीव देखील नको असते.
पण हे कसोटीचे क्षणच आपल्याला आपली खरी ओळख करून देत असतात. आपल्या खऱ्या क्षमता काय आहेत हे यातूनच समजत असतं. आणि खरी गोष्ट हीच आहे की आपण जितकं एखाद्या गोष्टीला लवकरात लवकर सामोरं जाऊ तितकं लवकर आपली समस्या कमी होते. तात्पुरत्या समाधानासाठी आपण त्या गोष्टीपासून दूर पळायचं म्हणजे आपली समस्या अधिक वाढवण्यासारखं आहे.
यासाठीच गरजेचं आहे की आहे त्या प्रसंगाला धीराने सामोरे जाणे. आपली शक्ती एकवटून त्याचा सामना करणे. त्यात एखादवेळी हार पण होईल, पण काहीच न करता निघून जाण्याहुन ती श्रेष्ठ असेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

