Skip to content

तुमचं असणं आणि नसणं यात काहीच फरक नसेल तेव्हा तुमचं नसणंच उत्तम!

तुमचं असणं आणि नसणं यात काहीच फरक नसेल तेव्हा तुमचं नसणंच उत्तम!


हर्षदा पिंपळे


उदाहरण क्रमांक -१

अगं काही उपयोग आहे का तुझा ? असून नसल्यासारखी आहेस बघ…म्हणजे असून नसून सगळं सारखच म्हणायचं. मला वाटलं चांगलं शिकवलं तर त्याचा काहीतरी उपयोग होईल. पण कसलं काय ? नुसता टाईमपास चालू आहे तुझा. अगं तुला शिकवलं त्याचा थोडा तरी उपयोग कर.उगाचच शिकवायचं म्हणून तुला शिकवलं नव्हतं.माझ्याकडे पैसे काही झाडाला लागलेले नव्हते. पै पै कमवून तुला शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तुला त्याची काहीच पडलेली नाही. अशी कशी म्हणायची पोर…?

अगदीच लाखभर पैसे घरात आणत जा असं अजिबात नाही. पण थोडेफार पोटापाण्यासाठी तरी चार पैसे आणत जा.पैशाचं जाऊदे,तु तर साधी मला घरातही मदत करत नाही.वय झालं गं आता माझं.चोवीस तास स्वयंपाकघरात राबणं आता कठीण आहे.

माझ्याने होत नाही. तुझी आई गेल्यापासून तुला अगदीच फुलपाखरासारखं सांभाळलं. काय हवं काय नको सगळं दिलं.कधी तुझ्यावर आवाज चढवला नाही की तुला मारलंही नाही. खायला प्यायला सगळं आणून दिलं.पण तु साधी छोट्या छोट्या कामातही मला मदत करत नाहीस गं…

वाईट वाटतं कधी कधी. एवढी चांगली धडधाकट पोर किंचितही माझ्यासारख्या म्हातारीवर दया दाखवत नाही. किती कौतुकाने बघत असतात माझ्याकडे लोकं…”तुमची नात छान आहे. हुशार आहे.” असं सारखं म्हणत असतात.तुच सांग आता काय बोलायचं यावर ? कुठल्या तोंडाने सांगू की माझी पोर मला काहीच मदत करत नाही. नुसता देखणा दिवा आहे.असून उपयोग शून्य आहे.

जिच्यासाठी एवढं जीवाचं रान केलं तिला या आजीची काहीच पर्वा नाही.असं असणं किंवा असून नसण्यापेक्षा नसलेलं केव्हाही बरं !

व्हरांड्यात बसून आजी तिच्या नातीशी हे सगळं बोलत होती.

“मला शिकव म्हणून मी बोलले नव्हते. आणि नाही आवडत गं मला असलं काम करायला बिरायला. तु करतेस नं मग तुच करत जा.मला नको ऐकवू हे सगळं.बोर होतं मला.”

शितल (नात) आजीला म्हणाली.

आजीला शितल जे काही बोलली ते अजिबात आवडलं नव्हतं. शेवटी आजीने शितलचा नाद सोडला. आपलं आयुष्य आपणच बघायला हवं असं म्हणत आजी स्वतःच्या कामात पुन्हा गुंतून गेली.

उदाहरण क्रमांक – २

आम्ही कोण आहोत ? घरातले नसलो म्हणून काय झालं ? एवढं सगळं झालं आणि तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही.कमाल आहे हं तुमची. इतके परके वाटायला लागलो का आम्ही ? जवळच्या माणसांना आपली दुःखं नाही सांगायची मग कुणाला सांगायची ? अजिबात पटलं नाही मला तुमचं वागणं. आमचा असून काय उपयोग ताई ?आम्ही असून नसल्यासारखेच आहोत नं ? मग त्यापेक्षा आमचं नसणं केव्हाही उत्तम ! नाही का ?

प्रतिभा वहिनींच्या आयुष्यात मधल्या काळात बरीच वादळं येऊन गेली.पण त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांनाही याची खबर लागू दिली नाही. सगळं दुःख एकट्याच पेलत बसल्या.

खूप दिवस हा लपंडाव प्रतिभाताईंनी चालूच ठेवला होता. पण एक दिवस मात्र हा लपंडाव संपला. त्यांच्या माणसांना सगळ्या गोष्टी कळाल्या.त्यावेळी त्यांच्या मनातही आपण का आहोत ? हाच प्रश्न घोळत राहिला. प्रतिभाताईचं हे वागणं त्यांना थोडं खटकलं.

तर मित्रांनो, ही दोन्ही उदाहरणं वेगवेगळी आहेत.

आपल्या आयुष्यात अशाच घटना घडत असतात. एखाद्याचं असणं आणि नसणं आपल्या आयुष्यात सारखंच असतं.किंवा आपणही कधी कधी यामध्येच मोडतो.अगदी साहजिक आहे. असून नसल्यासारखं असेन तर त्याचा काय उपयोग ? वेळेला असून जर कुणी मदत करत नसेल तर त्याचं असणं नसणं सारखंच म्हणावं लागेल.उगाचच असणारी गर्दी काही कामाची नाही.

म्हणूनच, एकतर असून नसल्यासारखं कधीच वागू नका.आहात तर ते कृतीतून दाखवून द्यायला शिका.नाहीतर असणं आणि नसणं यात काहीच फरक नसेल तेव्हा आपलं नसणंच उत्तम!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!