आयुष्याचा जोडीदार देखणा असण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारणारा असावा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
ज्योत्स्नाचं ते बोलणं राहून राहून गार्गीला आठवत होतं. ते बोलणं म्हणजे फक्त गप्पा नव्हत्या, साधासुधा संवाद नव्हता तो गर्गीला दाखवला गेलेला एकप्रकारचा आरसा होता, त्या बोलण्याला सत्याची किनार होती. गेले कित्येक दिवस गार्गीच्या लग्नाचा विषय घरात चालू होता.
आतापर्यंत बरीच स्थळ देखील येऊन गेली होती. त्यातली काही स्थळ नाव ठेवायला जागा नाही अशी होती. मुलगा नीट कमावता आहे, घर, माणसं चांगली आहेत अस सर्व असून देखील ती स्थळ गार्गी नाकारत होती. कारण काय तर तिच्या डोळ्यासमोर आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून एक चित्र तयार होत त्यात ही मुलं कुठेच बसत नव्हती.
लहान असताना परिकथा, राजा राणीच्या गोष्टी वाचून, पाहून प्रत्येकाच्या मनात हे चित्र कुठेतरी असतंच की आपलाही जोडीदार असाच असावा. सुंदर, रुबाबदार, देखणा. पण जसं जसं वय वाढतं, आपण जास्त लोकांमध्ये, खऱ्या परिस्थितीत वावरू लागतो तस् तशी आपण रंगवलेली ही चित्रं मागे पडतात.
आपल्याला वास्तविकतेची जाणीव होऊ लागते. पण हे सर्वांच्या बाबतीत होतं असं नाही. काही माणसं तिथेच राहतात. गार्गीचं काहीसं तसच झालं होतं. लग्नाच्या बाबतीत, जोडीदार निवडण्याच्या बाबतीत तिने स्वतःची काही ठाम मत बनवली होती. आतापर्यंत जी स्थळ आली त्यातले मुल दिसायला अजिबातच चांगली नव्हती, तिला साजेशी नव्हती असं नव्हतं. पण तिच्या मताप्रमाणे तिला हवा तसा जोडीदार मिळत नव्हता.
घरातले तिला सांगून समजावून थकले होते की फक्त चांगलं, सुंदर दिसणं म्हणजेच सर्वकाही नसतं. लग्न म्हणजे एक जबाबदारी देखील आहे. ती पण पेलवता आली पाहिजे. त्यासाठी माणसाने जबाबदार असलं पाहिजे. जबाबदारीची जाणीव नाही आणि फक्त दिसायला सुंदर असेल तर त्याचा काय फायदा? दोन्ही गोष्टी कश्या मिळतील? कुठेतरी कमी जास्त होणारच.
पण हे काही तिला पटत नव्हतं. तिच्या मनाप्रमाणे जोपर्यंत मुलगा मिळत तोपर्यंत ती लग्न करणार नव्हती हे तिने स्पष्ट सांगितलं होतं. हे सर्व चालू होतंच त्यावेळी ती ज्योत्स्नाला भेटली. इतक्यातच तिला बाळ झालं होत आणि गार्गीला देखील तिला भेटायची खूप इच्छा होती. तिच्या लग्नात देखील हिला जाता आलं नव्हतं. म्हणून यावेळी ती आवर्जून गेली.
तिथे गेल्यानंतर तिला जो काही अनुभव आला त्याने ती भारावून गेली. बाळ पूर्णवेळ तिच्या नवऱ्याकडे होतं. तो अगदी व्यवस्थित बाळाला सांभाळत होता. बाळामुळे ज्योत्स्नाला जागं राहावं लागतं असे. त्यामुळे तिला नंतर आराम मिळावा, विश्रांती मिळावी म्हणून गौरवने तिच्या नवऱ्याने आपल्या ड्युटी तश्या शिफ्ट करून घेतल्या होत्या. आज देखील तिची मैत्रीण भेटायला येणार, तिच्यासोबत चांगला वेळ घालवता यावा म्हणून तो मुद्दाम लवकर घरी आला होता व बाळाचा सर्व करत होता.
गार्गीच्या मते देखणेपणा म्हणून जो असतो तो त्यात नव्हता हे खरं. पण हसमुख चेहरा, प्रसन्न भाव आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब म्हणून असलेली जबाबदारीची जाणिव. आई म्हणून तूच बाळाला सांभाळलं पाहिजे असं तो कधीच ज्योत्स्नाला बोलला नाही. ही एकच गोष्ट नाही, अश्या अनेक गोष्टी होत्या ज्यामध्ये तो एक उत्तम नवरा थरा होता.
ज्योत्स्नाने हेच सर्व गार्गीला समजावून सांगितलं, त्याची जाणीव तिला करून दिली. तिला हे देखील सांगितलं की आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल आपल्या काही अपेक्षा असतात आणि त्यात काही चूक नाही. पण त्या अपेक्षा अवास्तव तर ठरतं नाहीत ना, त्यांचा अट्टाहास तर केला जातं नाहीये ना हे देखील पाहिलं पाहिजे. आपण ज्याला महत्त्व देतोय त्याहूनही अधिक काही महत्त्वाचं असू शकतं का हे देखील पाहणं आवश्यक आहे.
आपण काय चूक करत आहोत याची गार्गीला आता खऱ्या अर्थाने जाणीव झाली. तिने तिच्या आई बाबांकडे आपलं मन मोकळं केलं. आपण इतके दिवस काय चूक करत होतो हे देखील तिने मान्य केलं. आपल्याला आता नेमकं काय हवं आहे याची तिला आता स्पष्टता आली होती. मैत्रिणीने दाखवलेला हा आरसा आता तिच्या आयुष्यात चांगला बदल घडवून आणणार होता.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
समर्पक असा लेख, वास्तववादी , आज बर्याच विवाहयोग्य तरुणांना सुध्दा आपण कसेही दिसत असो पण मुलगी गोरीगोमटी देखणीच हवी या अपेक्षेणे स्थळे नाकारली जात आहेत. (काही अपवाद)