Skip to content

मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.


हर्षदा पिंपळे


क्षमाचं बालपण खूप हलाखीचं होतं.लहान वयातही तिला परिस्थितीची जाणीव होती.आईला दिसत नव्हतं तर वडील खूप दारू प्यायचे.त्यामुळे क्षमाला लहानपणापासून चांगलं वाईट काय असतं कळायला लागलं.ती जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्यात परिस्थितीची जाणीव अधिक समृद्ध होऊ लागली.रडून काहीच होणार नव्हतं हे क्षमाला माहिती होतं.त्यामुळे तीने फारसे अश्रू गाळले नाही.तीला त्रास होत होता.परंतु तिने असलेलं वास्तव स्विकारलं होतं.तिने तिची मनस्थिती बदलली होती.तिने छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत पैसे कमाविण्याचे चांगले मार्ग शोधले.शाळेत कॉलेजमध्ये चांगला अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवली. पैसे साठवून साठवून आईची दृष्टी परत आणली.वडिलांना सुधरवलं.एक एक गोष्ट करत करत ती वाईट परिस्थितीमधून बाहेर पडू लागली.

आजुबाजुला असणाऱ्या सगळ्यांना क्षमाच्या वागण्याचं कौतुक वाटायचं. क्षमाचं मन किती कणखर आहे हे सगळ्यांना कळून चुकलं होतं.तिने तिच्या वागण्यातून सगळ्यांना हीच शिकवण दिली.”

मित्रांनो,

वाईट परिस्थिती आजपर्यंत कुणाला चुकली आहे का ?

तर नाही. आयुष्यात वाईट परिस्थिती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही.प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्याप्रमाणे वाईट परिस्थिती सुद्धा येत असते.कितीतरी असे प्रसंग आयुष्यात येतात ज्यामुळे पुढचं जगणं धुसर दिसायला लागतं.प्रत्येकाला काय करावं कळत नाही.आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं की त्या परिस्थितीपासून पळ काढायचा काहीही कळेनासं होतं. मनाचा गोंधळ उडायला लागतो.कुठल्याही परिस्थितीला हाताळणं तर गरजेचं असतं.पण ती परिस्थिती हाताळताना मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.कुठल्याही परिस्थितीत मनस्थिती खंबीर असेल तर ती परिस्थिती हसतहसत हाताळता येते.

आपण काही रिमोट कंट्रोलवर चालणारी कार किंवा बाहुली नाही. बटण दाबलं की हसायचं,बटण दाबलं की रडायचं.असं बिलकूल नाही. आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो.आजुबाजुला असणारी परिस्थिती कधी कधी आपलं मानसिक संतुलन बिघडवू शकते.आणि अशा परिस्थितीत जर मनस्थिती खंबीर नसेल तर सगळच अवघड होऊन बसतं.

काही आघात हे सहन होण्यासारखे नसतात. मनावर त्यांचा खोलवर परिणाम होत असतो.कधी कुणाचा अचानक अपघात होतो.कुणी अचानकपणे घर सोडून निघून जातं.कुणाच्या आयुष्यात पैशाची चणचण भासते.कुणी कर्जबाजारी असतं.कुणाच्या घरात सतत वादविवाद चालू असतात.

अशा अनेक गोष्टी घडत असतात. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये खचून जाऊन चालत नाही. असे प्रसंग येत राहणारच.आपण ते स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी.परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदलायला हवी.परिस्थिती तेव्हाच बदलेल जेव्हा आपली मनस्थिती बदललेली असेल.

तर,आयुष्यात कितीही बिकट परिस्थिती येऊद्या, त्या परिस्थितीत मनस्थिती खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करा.कारण मनस्थिती खंबीर असणारा मनुष्य आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाला सामोरा जाऊ शकतो.कितीही बिकट परिस्थिती उद्भवली असली तरी मनस्थितीने खंबीर असणारा मनुष्य सहजासहजी खचून जात नाही. तो मनुष्य वास्तव स्वीकारून बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग शोधायचा प्रयत्न करतो.परिस्थितीशी पळ काढून तो निघून जात नाही.

अशी कित्येक उदाहरणं आपण रोजच्या जीवनात पाहतो.रघुनाथ माशेलकर, अब्दुल कलाम यांच्यासारखी कित्येक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. यांची परिस्थिती सुद्धा अत्यंत बिकट होती.परंतु, जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले. अशा परिस्थितीतही मनस्थिती खंबीर ठेऊन त्यांनी यशाची शिखरं गाठली.

मग आपणही कोणत्याही परिस्थितीत मनस्थिती खंबीर ठेवून आयुष्यात येणारं प्रत्येक वादळ हसतहसत पेलू शकतो.आपण आपल्या मनाशी ठरवायला हवं.वादळात रडत बसायचं की हसतहसत ते वादळ झेलायचं हे आपण ठरवायला हवं.आपल्या मनाला आपण कणखर करायला हवं.

कायम एक लक्षात असूद्या,

परिस्थिती बदलत नसेल तर मनस्थिती बदला,परिस्थिती नक्कीच बदलेल.

वास्तव स्विकारा,परिस्थीतीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधा, मनाला कणखर करा.परिस्थिती नक्कीच सुधारेल यात शंका नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!