Skip to content

“एका स्त्रीला इतकच हवंय की, तिला काय हवंय हे त्याला कळावं.”

“एका स्त्रीला इतकच हवंय की, तिला काय हवंय हे त्याला कळावं.”


मधुश्री देशपांडे गानू


“आपकी नजरोंने समझा..
प्यार के काबिल मुझे..
दिल की ऐ धड़कन ठहर जा..
मिल गई मंजिल मुझे….”

“शरीरा पलीकडे खूप खूप काही असतं हो! ते जे पलीकडचं आपण मानतो ते ज्या पुरुषापर्यंत पोहोचतं, तो पुरुष बाईला कधीही फसवत नाही. नेव्हर इन लाईफ टाईम.” व. पु. काळे.

थोर लेखक व. पु. काळे यांनी स्त्री-पुरुष नात्याबद्दल इतकं काही सुरेख, अचूक लिहून ठेवले आहे ना! पण हे जो आचरणात आणेल तो खरा..

आजचा विषय हा पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी यांच्यासाठीच आहे. मुळात स्त्री आणि पुरुष यांची नैसर्गिक जडणघडण वेगळी असते. शारीरिक, मानसिक, भावनिक भिन्न, तरीही स्त्री पुरुष एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यांच्या एकत्र येण्यानेच या नात्याला पूर्णत्व येतं. आजचा विषय स्त्री धार्जिणा असला तरीही एकांगी नाही. आणि पुरुषद्वेष्टा तर नाहीच नाही. स्त्री पुरुष हे परस्पर पूरक आहेत. समान पातळीवर आहेत.

फक्त स्त्री सुलभ, नाजूक भावना प्रत्येक स्त्री मोकळेपणाने, मुक्तपणे व्यक्त करू शकत नाही. तिला वाटतं तिच्या जोडीदाराने समजून घ्यावं की तिला काय हवंय. अगदी शारीरिक गरजेचा विचार केला तर पुरुषाचे प्रेम हे शरीरापासून निर्माण होऊन मनापर्यंत पोहोचतं. पण स्त्रीचे प्रेम मात्र मनात उत्पन्न होऊन शेवटी शरीरापर्यंत पोहोचतं. या नाजूक विषयावर आजही आपल्या समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. पण पती-पत्नींनी मात्र याबद्दल स्पष्ट, योग्य व्यक्त होणे खूपच महत्त्वाचं आहे. कारण या नात्याचा पायाच शारिरीक संबंध हा आहे. इथे पूर्ण समाधान असेल तर संसार सुखाचा होतो.

पती-पत्नी, प्रियकर प्रेयसी हे खरंतर चिकटवलेलं नातं. जन्माने रक्ताची नाती मिळतात तसे या नात्याचं नाही. लग्न झाल्यानंतर एकदा नव्या नवलाईचे दिवस संपले की खऱ्या संसाराला सुरुवात होते. 24 तास एकत्र राहिल्यामुळे एकमेकांचे गुणदोष ठळकपणे नीट दिसू लागतात. अशावेळी जिथे एक जण कमी पडतो तिथे जोडीदाराने निभावून नेणे हेच खरं संसाराचं रहस्य.

पण संसार निभावणं आणि हे नातं ही आयुष्यभर निगुतीने जपणं सोपं मात्र अजिबातच नाही. अगदी भिन्न परिस्थितीत वाढलेले, भिन्न प्रकृतीचे, स्वभावाचे, भिन्न भावभावनांचे, वैचारिक पातळ्यांचे, भिन्न व्यक्तता असलेले दोन जीव कायमस्वरूपी एकत्र येतात. त्यामुळे मतभिन्नता, वाद, भांडणं होणारच. पण या सगळ्यांसकट आपल्या जोडीदाराला त्याच्या गुणदोषांसकट पूर्ण स्वीकारणे म्हणजे संसार करणे होय.

आता एका स्त्रीला पत्नीला, प्रेयसीला काय हवं असतं हो जोडीदाराकडून?? त्याने भरभरून तिच्यावर प्रेम करावे. तिच्या सलज्ज भावना जाणून घ्याव्यात. तिचं, तिच्या सौंदर्याचं, गुणांचं कौतुक करावं. त्याला तिचा अभिमान वाटावा. त्याने तिच्या यशात आनंद मानावा. तिच्या सर्व भावभावनांच्या, यशा अपयशाच्या आंदोलनात त्याने कायम तिची साथ द्यावी. त्याचा तिच्या वर पूर्ण विश्वास असावा. तिची काळजी घ्यावी. इत्यादी. इत्यादी.

एखाद्या स्त्रीचे आपल्या पतीवर कितीही प्रेम असले तरीही, तिने “ओळखा पाहू, माझ्या मनात काय आहे??” असे खेळ आपल्या जोडीदाराबरोबर खेळू नयेत. योग्य ठिकाणी, योग्य वेळी स्वतःच्या भावना या योग्य शब्दात मांडायला हव्यात. बहुतेक स्त्रियांना सवय असते, मनातलं काही सांगायचं नाही. आणि नुसती चिडचिड, धूसफूस करत राहायचं. बिचाऱ्या नवऱ्याला कळतच नाही की नक्की काय झाले?? काही कारण नसता ते स्वतःला दोषी समजू लागतात. अशावेळी योग्य संवाद फार महत्त्वाचा असतो. पुरुषांना फार आढेवेढे घेत बोललेले नाही समजत. अगदी कोणतीही शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक गरजही स्त्रीने नीट स्पष्ट समजावून सांगावी. हळूहळू संसारात छान मुरलेल्या नवरा-बायकोला अगदी न सांगताही नुसत्या नजरेने कळतं एकमेकांना काय हवंय ते! पण त्यासाठी हे नातं तसं फुलवावं, खुलवावं लागतं.

प्रत्येक स्त्रीला असंच वाटत असतं की मला नेमकं काय हवंय हे माझ्या जोडीदाराला कळावं. पण त्यासाठी त्या नात्याची जबाबदारी ही नीट पार पाडायला हवी. पतीच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, भावना यांची नीट जपणूक करायला हवी. त्याच्या माणसांचा आदर करायला हवा. पत्नीची वागणूक पतीला ठाम साथ देणारी हवी. मग पती ही पूर्ण साथ देणारच.

मान्य आहे स्त्रीला जास्त तडजोडी कराव्या लागतात. पण मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या स्त्री पुरुषापेक्षा जास्त सक्षम, समर्थ, चिवट असते. एकदा पतीच्या मनात अढळ स्थान आपल्या वागणुकीने तिने मिळवले की तिला काय हवंय हे त्याला आपसूक कळणारच. न सांगता.. हेच सुखी संसाराचे गुपित आहे. हो ना!!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on ““एका स्त्रीला इतकच हवंय की, तिला काय हवंय हे त्याला कळावं.””

  1. खूप छान.मी या विषयावर थोडंफार काम करते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!