Skip to content

काही गोष्टींना, व्यक्तींना दुर्लक्ष करायचं शिका, तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या तिथेच संपतील.

काही गोष्टींना, व्यक्तींना दुर्लक्ष करायचं शिका, तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या तिथेच संपतील.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


Weak people revenge
Strong people forgive
Intelligent people ignore

अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो, कमकुवत लोकं बदला घेतात, भक्कम लोकं क्षमा करतात आणि जी बुद्धिमान लोकं असतात ती दुर्लक्ष करतात. आपल्यासोबत काही चुकीचं घडलं तर आपण पण त्या माणसासोबत तसच वागायचं, आपल्याला त्रास झाला ना मग त्यालाही व्हावा असा भाव आपल्या मनात येतो आणि बरेचदा आपण त्याप्रमाणे वागतो देखील.

परिस्थिती माझ्या बाजूने नाही ना, मग मी देखील आता कश्याची फिकीर करणार नाही अस म्हणून बरेच जण चुकीची पावलं उचलतात. जी माणसं मनाने भक्कम असतात, स्ट्रॉंग असतात ती समोरच्याला माफ करून टाकतात. जाऊदे माणूस आहे, चूक होऊ शकते अस म्हणून विसरून जातात आणि माफ करतात.

या दोन्ही गोष्टी आपल्याला करायला जमतात. आपण बदला घेतो मग तो कोणत्याही मार्गाने असेना. नातं, माणूस पाहून माफ देखील करतो. पण इग्नोर करणं, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ते काही आपल्याला जमत नाही.
आपल्यासोबत प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टी घडतील, आपल्या मनाप्रमाणे सर्व होईल अस होत नाही.

गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडतात, माणसं वेगवेगळ्या तऱ्हेची भेटतात, ज्यातली बऱ्याचदा त्रास देणारी, मनस्ताप देणारी असतात. पण त्यांचं हे जे वागणं असतं, या गोष्टी असतात त्या आपल्याला इतक्या त्रास यासाठी देतात कारण आपण मनात कुठेतरी या सर्व गोष्टींना नियंत्रित करायला पाहत असतो.

परिस्थिती, माणसं सर्व माझ्या नियंत्रणात असलं पाहिजे हा आपला जो अट्टाहास असतो तो आपला त्रास अजून वाढवतो. आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्या आपल्याला व्ह्यायला हव्या असतात. जेव्हा अस होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो. गोष्टींकडे, माणसांकडे दुर्लक्ष करता न येण्याचं कारणही हेच आहे.

जर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की आपण कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही तर आपल्या पुढच्या समस्या देखील कमी होतात. त्या कश्या? तर जेव्हा आपल्याला समजत की जे काही होत आहे ते माझ्या हातात नाहीये. या सर्व बाहेरच्या गोष्टी आहे. त्यावर मी काही करू शकत नाही.

पण मी कसं वागायचं, मी घडणाऱ्या गोष्टींना, माणसांना कसा प्रतिसाद द्यायचा हे माझ्या हातात आहे. त्यासाठी माझ्याकडे विविध पर्याय आहेत. मला कोणता पर्याय निवडायचा आहे? ज्याने माझा त्रास कमी होईल, तो वाढणार नाही किंबहुना तो जाणवणार नाही.

दुर्लक्ष करणं म्हणजे दर वेळी बेफिकीर राहणं नव्हे. आपल्याला कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे ज्या आपल्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करत आहेत. जेव्हा अश्या काही गोष्टी घडतात, काही माणसं भेटतात तेव्हा आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. ही व्यक्ती, हिचं वागणं माझ्या आयुष्यात काही चांगल घडवून आणत आहे का? काही योगदान देत आहे का? जर अस नसेल तर अश्या माणसांकडे, गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले चांगल असतं.

आपण नको त्या गोष्टींना अती महत्त्व देऊन आपल्यासाठीच समस्या निर्माण करत असतो, ज्याची काही गरज नसते. काही गोष्टींकडे दुर्लक्ष पण करता आलं पाहिजे. तरच आपण बराचसा त्रास कमी होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!