Skip to content

आनंदी राहता येणे, हा परिस्थितीचा नव्हे तर मानसिकतेचा जास्त भाग आहे.

आनंदी राहता येणे, हा परिस्थितीचा नव्हे तर मानसिकतेचा जास्त भाग आहे.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“अगं जाई कुठे आहे? दिसत नाही, अजून आली नाही का?” गौरव राखीला विचारत होता. गौरव, राखी, जाई ही सर्व एकाच ऑफिसमध्ये कामाला होती. अजून बरीच जण ऑफिसमध्ये होती. पण ही तिघं कमी अधिक फरकाने एकाच वयाची. त्यामुळे यांचं जास्त जमायचं. त्यात जाईचं तर सर्वांशीच जमायचं. तिचा स्वभावच तसा होता. सर्वांनी मिळून मिसळून, हसत खेळत राहायचा.

आजूबाजूला जे काही घडत आहे त्याचा तिच्यावर फार वेळ परिणाम होत नसे. आता कोण ओरडलं, रागावलं तर ती तेवढ्या पुरतच हिरमुसल्यासारखे करी. पण तेही खूप कमी वेळ टिके. तिला पुन्हा नॉर्मल व्हायला वेळ लागत नसे. अगदी समोरच्याला आश्चर्य वाटत इतक्या लगेच ती पहिल्यासारखी होई.

पण याचा अर्थ तिला कोणत्याच गोष्टीची काही फरक पडत नव्हता किंवा त्याचं काही महत्त्व नव्हतं अस नाही. तिची मानसिकता मुळातच आनंदी राहण्याची होती. त्यामुळे त्रासदायक, नको वाटणाऱ्या गोष्टी तिच्यामध्ये फार काळ टिकत नसत. पाणी घातलं नाही तर रोप कोमेजत. मान टाकतं. पण त्याला जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा ते लगेच मान वर पण करत, लगेच तजेलदार होतं.

जाई पण अशीच होती. आपल्याला आनंदी करण्याऱ्या काही ठराविक गोष्टी असतात. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. पण ती तशी नव्हती. तिचा आनंद मर्यादित नव्हता. ती तो स्वतः मिळवायची, तयार करायची. स्वतःच आनंद कसा शोधायचा हे तिला पक्क माहीत होत. त्यामुळेच दुःख फार वेळ राहत नसे. अगदी साध्या साध्य बोलण्यातून ती इतरांना हसावयाची. अगदी गंभीर, कंटाळवाण्या प्रसंगाला देखील कसं हलकं फुलकं करायचं हे तिला माहीत होत.

तिच्या या स्वभावामुळे ती सर्वांना हवी हवीशी वाटायची. तिच्यामुळे वातावरण मस्त, खेळीमेळीच व्हायचं. त्यामुळे आज ती नव्हती तर लगेच गौरव तिच्याबद्दल विचारत होता. आपल्या दुःखी होण्यासाठी, चिडचिड करण्यासाठी, एकंदरीतच नकारात्मक होण्यासाठी फारशी कारणं लागत नाहीत. आपल्याला काहीही पुरतं.

पण आनंद मिळवण्यासाठी, घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, जगण्यासाठी मात्र आपण स्वतःला फार मर्यादा घालून घेतो. अमुक एक गोष्टच मला आनंद देऊ शकते, अमुक एक घटनाच मला सुख देऊ शकते, अशी परिस्थिती झाली तरच मी सुखी, समाधानी राहू शकेन. आपण स्वतःच्याच आयुष्याला इतक्या अटी घालतो की समोरचं चांगल असलेलं पण आपल्याला दिसत नाही.

या अटी पूर्ण करण्याच्या नादात आपण इतके वाहवत जातो की निसर्ग, हे आयुष्य आपल्याला जे भरभरून देत असतं ते घ्यायचं राहून जातं. ते निसटून जात ज्याची जाणीव आपल्याला नंतर होते. आपल्या आत जो आनंद असतो, जे समाधान असत ते आपल्याला कधी दिसतच नाही. त्याची जाणीवच आपल्याला होत नाही आणि जेव्हा होते तेव्हा उशीर झालेला असतो.

म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही आनंद, सुख हे आपल्या मानसिकतेमध्ये आहे, आपल्या दृष्टीमध्ये आहे. आपल्यामध्ये आनंद निर्माण करण्याची क्षमता आहे, आनंद निवडायचं स्वातंत्र्य आपल्यामध्ये आहे. फक्त याची जाणीव होण गरजेचं आहे. जर आपण या साठी परिस्थितीवर अवलंबून राहिलो तर आपण स्वतःलाच कुंपण घालून घेऊ, ज्याची काही गरज नाही. हे अटींचे कुंपण जेव्हा तोडले जाईल तेव्हा आपल्याला खराखुरा आनंद मिळेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!