Skip to content

आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस सुद्धा खूप पुरेशी असते.

आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस सुद्धा खूप पुरेशी असते.


मेराज बागवान


आपलं माणूस’ असं म्हटलं तरी किती हलकं वाटतं ना? खरंच जादूच आहे ह्या शब्दात.कारण आपल्या माणसाची गोष्टच निराळी असते.मोठ्यातल्या मोठ्या समस्यांचे निराकरण आपल्या माणसांमुळे होऊ शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात ‘आपला माणूस’ वेगवेगळा असू शकतो.कोणासाठी आई-वडील ,कोणासाठी भाऊ-बहीण,कोणासाठी मित्र-मैत्रिणी,कोणासाठी नवरा-बायको,कोणासाठी नातेवाईक-शेजारी तर कोणासाठी सामाजिक जीवनातील काही व्यक्ती इत्यादी. व्यक्तिपतत्वे माणसे वेगवेगळी असू शकतात.पण कोणीही असले तरी ,त्या आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस सुध्दा खूप पुरेशी असते.

आपण आयुष्यात अनेक समस्यांना,अडी-अडचणींना सामोरे जात असतो.अनेकदा आपण एकटे सर्व समस्या नाही सोडवू शकत आणि मदत ही घ्यावीच लागते.कधी कधी आपल्याला स्वतःलाच सर्व काही सोडवावे लागते.मग अशा वेळी ,कोणीतरी आपलं असेल जे फक्त आपली विचारपूस करेल ,तर मग त्याक्षणी खूप मोठा आधार वाटतो.प्रत्यक्षपणे जरी त्या व्यक्ती मदत करू शकत नसतील तरी फक्त विचारपूस केल्याने देखील खूप हलके वाटते.ताण मोकळा होतो.आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.

कधी कधी आपण आपल्या जवळच्या माणसांपासून दूर राहत असतो.कारण काहीही असो,जसे की नोकरी च्या निमित्ताने दुसऱ्या गावी राहावे लागत असेल,किंवा मग एकमेकांचे राहण्याचे ठिकाणच दूर असेल तर अशा वेळी,केवळ विचारपूस करण्यासाठी आलेला फोन खूप दिलासा देऊन जातो.कारण तो फोन आपल्या माणसाकडून आलेला असतो.त्यात कोणतीच अपेक्षा किंवा स्वार्थ नसतो.आपल्या काळजीपोटी ही माणसे आपली विचारपूस करीत असतात.आणि यामुळेच आपल्या माणसांकडून एवढीच गोष्ट पुरेशी असते.

जो माणूस आपल्या आयुष्यात आपल्यासाठी महत्वाचा असतो त्याने आपल्यासाठी केलेली लहानात लहान गोष्ट आपल्याला पुरेशी असते.मग तो मनमोकळेपणाने साधलेला संवाद असेल किंवा आपण कसे आहोत,तब्येत कशी आहे इतकंच विचारणं असेल.आपल्या माणसाकडून आपल्याला खूप मोठ्या गोष्टी नाही मिळाल्या तरी काही वाटत नाही.त्यांच फक्त आपल्या आयुष्यात असणंच पुरेसं असतं.

खरच ,’आपल्या माणसांच फक्त आपल्या आयुष्यात असंणच पुरेसं असतं’.त्यांच्याशी साधलेला साधा संवाद खूप काही देऊन जातो.आयुष्याला सामोरे जाण्यासाठी खूप मोठी ताकद देऊन जातो.जेव्हा आपलं माणूस आपल्या सहवासात असतं तेव्हा मन नेहमी प्रफुल्लित,उल्हसित असते.मनावरची मरगळ ह्यांच्याशी बोलल्याने दूर होते.ही माणसे आपली खूप मोठी ताकद असतात तेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि म्हणूनच ही माणसे खास असतात.

आज आपण समाजात पाहतो,जो तो एकमेकांचा वापर करून घेत असतो.मदत मागणे वेगळे आणि वापर करणे वेगळे.जेव्हा मदत मागितल्यावर ती मिळते आणि मग मदत मागणारी व्यक्ती त्याविषयी त्या व्यक्तीकडे कृतन्य असते,त्यावेळी ह्याला ‘मदत मागणे’ म्हणतात.पण जेव्हा,मदत मिळून सुद्धा,मदत करणाऱ्याला पूर्णपणे विसरले जाते,तेव्हा त्या गोष्टीला ‘वापर करून घेणे’ असे म्हणतात.आणि अशी माणसे ‘आपली’ कधीच नसतात.म्हणून,आपलं कोण आणि परकं कोण हे समजून घेता यायला हवं.कारण आज परिस्थितीच खूप भयंकर आहे.

आयुष्यात आपण काही व्यक्तींना आपलं आपलं मानत असतो. पण खूप उशीरा आपल्या लक्षात येत की ,ज्यांना आपण आपलं मानत होतो ती माणसे आपली कधी नव्हतीच.म्हणूनच आपली आणि परकी माणसे ओळखायला शिका.आणि जेव्हा ओळखायला लागाल तेव्हा मात्र आपली माणसे जपायला आणि परकी माणसे विसरायला शिका.हेच मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी आज गरजेचे आहे.

आपली माणसे आयुष्यात महत्वाची असतात.कित्येकदा आपण त्यांना गृहीत धरत असतो.पण ती ,तरी देखील आपल्या सोबत कायम उभी असतात.मानसिक पाठिंबा देत असतात.जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा आपल्यासाठी उपलबद्ध असतात.त्यांची कोणतीच तक्रार नसते.आणि अपेक्षा देखील नसते.आणि म्हणूनच ह्यांनी केलेली साधी विचारपूस देखील आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवत असते.

तणावग्रस्त असताना ,मन उदास होते.मग अशा वेळी ,आपल्या माणसाने करून दिलेला चहा देखील खूप मोठा ताण मोकळा करतो.समस्या असताना,आपल्या माणसाने आपल्या जवळ बसणं देखील खूप मोठा आधार देऊन जातं. काहीही न बोलता त्या व्यक्तीने आपली घेतलेली मानसिक काळजी दिलासादायक ठरते.

आज अनेकजण मानसिक आजारांनी ग्रासलेले आहेत.नैराश्य,वैफल्य,भीती ,एकाकीपण ह्यांसारख्या मानसिक समस्या माणसांना जडलेल्या आहेत.आणि त्याला कारण म्हणजे,नातेसंबंध योग्य नसणे.’नातेसंबंध’ जर योग्य,निरोगी असतील तर आयुष्यातील ९०% समस्यांना माणूस निधड्या छातीने सामोरे जाऊ शकतो असे माझे वैयक्तिक मत आहे.जेव्हा आपली माणसे सोबत असतात,तेव्हा कसलीच भीती वाटत नाही.आपली माणसे हक्काचा पाठिंबा आयुष्यभर देत असतात.

म्हणूनच आयुष्यात पैसा, यश, कीर्ती एकवेळ कमी मिळाली तरी चालेल ,पण आपली माणसे कमावता आली पाहिजेत आणि ती आयुष्यात कायम टिकवून ठेवता आली पाहिजेत.कारण जर आपली माणसेच आपल्या सोबत नसतील तर ,त्या यशाला,पैशाला,किर्तीला काहीच अर्थ उरत नाही.

आपल्या माणसांपेक्षा दुसरे काहीच मौल्यवान नसते.म्हणून, ‘आपलं माणूस’ आयुष्यात कायम जपा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!