सर्व काही १००% ठीक चालू असेल तर ते आयुष्य नव्हेच!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
जेवण म्हटल्यावर आपल्यासमोर कसे चित्र उभ राहते? फक्त एखादीच कोणती तरी विशिष्ट चव त्यात असते का? आणि फक्त समजा ती तेव्हढीच चव आपल्या ताटात असेल तर आपल्याला ते जेवण जेवायला आवडेल? फक्त भातच आहे. सोबत काहीही नाही. अस जेवण जेवू का आपण? नाही. जेवायला पण मजा कधी येते? जेव्हा त्यात विविध चवी, विविध पदार्थ मांडून ठेवलेले असतात, सजवलेले असतात. त्यात काही तिखट असतील, काही गोड, काही तुरट,आंबट, कुरकुरीत हे सर्व पदार्थ, या चवी जेवणाची लज्जत वाढवतात आणि म्हणून ते जेवण रुचकर होतं.
ही अशी विविधता असावी हे फक्त आपण जेवणापुरतच मान्य करतो. आयुष्याच्या बाबत मात्र करत नाही. बाकी कोणत्याही गोष्टीत आपल्याला वैविध्य हवं असतं, व्हरायटी हवी असते. पण आयुष्य, ते मात्र एकाच पद्धतीचं त्यातही चांगलच हवं असतं. अगदी सहज हे अनेकांच्या तोंडातून निघत की मला माझं आयुष्य १००टक्के चांगल हवं आहे. कोणतेही प्रॉब्लेम्स, कटकटी मला नको आहेत.
त्यासाठी मी वाट्टेल ते करीन, पण आयुष्य सुरळीत होऊदे. पण असं होतं का? नाही. कारण अस होणं शक्य नाही. आपलं आयुष्य कधीच एकसारखं असू शकतं नाही. कारण जरी ते आपलं असलं तरी आपण एकटेच त्याचा कधीच भाग असत नाही. मी एकटा जन्माला आलो आणि मरेपर्यंत मी एकटाच होतो अस फार क्वचित घडत असेल. लहान असल्यापासून अगदी उतारवयापर्यंत आपण वेगवेगळ्या नात्यांशी जोडले जातो, माणसांशी जोडले जातो.
समाज, परिस्थिती, निसर्ग या सर्वाचा आपण एक अविभाज्य भाग बनतो. आणि निसर्ग तर स्वतःची अनेक रूपं दाखवत असतो, परिस्थिती ती तर कधीच सारखी असत नाही. या सर्वाचा भाग असलेलं आपलं आयुष्य. ते तरी कसं एकसारखं असेल? ते ही सतत बदलत राहणार. आपल्याला त्रास होतो ते आपलं आयुष्य त्यातल्या घटना सारख्या बदलत राहतात म्हणून नाही.
आपल्याला त्रास होतो कारण हा बदल आपल्याला स्वीकारता येत नाही. आपल्याला हे मान्यच होत नाही की कधी काळी माझी परिस्थिती चांगली होती, सुरळीत होती. पण आता तशी ती नाही. हे स्वीकारता येत नाही आणि म्हणूनच त्यातून बाहेर देखील पडता येत नाही. कारण समस्येतून बाहेर पडायला आणि ती आहे हे मान्य करावं लागतं. आपण आपल्या स्वप्नवत आयुष्यात इतके गुंग झालेले असतो की खरं आयुष्य आपल्याला फार नंतर समजतं.
पण आपल्याला हे समजलं पाहिजे की सर्व काही अगदी १००टक्के ठीक असेल तर ते आयुष्य नव्हे. आयुष्य म्हणजे अनुभव, आव्हान, शिक्षण, चढ उतार. जसं वेगवेगळ्या चवींचे जेवण आपल्या तोंडाची चव वाढवतात तसेच ही आव्हान, नव नवीन अनपेक्षित गोष्टी आपल्याला आयुष्याची किंमत दाखवतात, त्याची जाणीव करून देतात.
यात आपण आपल्याच क्षमता पुन्हा नव्याने ओळखू लागतो. आपल्याला स्वतःबद्दल जास्त माहिती मिळते तसेच एक माणूस म्हणून आपण समृध्द होत जातो. आता आपण निवड करायची आहे, आपल्याला बिन चाविच निरस आयुष्य जगायचं आहे की स्वतःला आजमावायला लावणारं एक परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.