आनंदी राहण्यासाठी स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवणे आवश्यक आहे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
ओ मेरे जीवनसाथी,
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं
हो जहाँ भी ले जाए राहे हम संग हैं
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी आयुष्यभरासाठी जोडली जाते तेव्हा ती पूर्णपणे स्वंतत्र व्यक्ती अशी राहत नाही. ती आपली साथीदार बनून जाते. साथीदार म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्टीत सोबत असणारा/असणारी, साथ देणारी, सोबत करणारी. पार्टनर म्हणतात ते याच साठी. इथे फक्त माझं, फक्त तुझं असं राहत नाही तर जे काही असेल ते आपलं अशी एक भावना जन्माला येते.
ही अशी भावना, अशी जाणीव असणं का गरजेचं आहे? कारण जेव्हा आपण त्या माणसाशी जोडले जातो, तेव्हा एका अर्थाने आपलं आयुष्य त्याच्याशी जोडलं जातं. दोघांचीही आयुष्य एक होतात, अश्या वेळी जर फक्त माझं माझं अस केलं तर नात्यात जवळीकता येत नाहीच, उलट दुरावा निर्माण होतो. बऱ्याच नात्यांमध्ये असं होतं.
लग्नाला खुप वर्ष झालेली असूनही कुटुंब म्हणून जे म्हणतात ते त्यात दिसून येत नाही. अशी माणसं फक्त एकत्र राहत असतात. परंतु ती एक नसतात. दोघांचही आयुष्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालू असतं. दिसताना दोन माणसं नवरा बायको या नात्याने एकत्र, एका छताखाली राहत असली तरी त्यांचं विश्व मात्र वेगळी असतात.
अश्या परिस्थितीत नात्यामध्ये असलेला ओलावा, हे माझं माणूस आहे ही जाणीव, आपण दोघं एक आहोत, आपली एक टीम आहे काहीही झालं तरी आपल्यामध्ये दुरावा येणार नाही असा जो एक अप्रत्यक्ष करार झालेला असतो, जो या नात्याला बांधून ठेवतो तो होतच नाही. सध्याच्या काळात बहुतांश नवरा बायको, दोघेही कमावणारे असतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात.
एका दृष्टीने जरी हे बरोबर असलं तरी ही स्वतंत्रता मला कोणाचंही तशी गरज नाही अशी भावना देखील निर्माण करते. पण नवरा बायको म्हणून एकत्र राहत असताना फक्त आर्थिक अवलंबित्व असावं लागतं अस नसतं. तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्याव्यतिरिक्त एक माणूस म्हणून आपल्याला मानसिक, शारीरिक, भावनिक आधार हा लागतोच. त्यासाठी आपली कोणतरी हक्काची व्यक्ती आपल्याला हवी असते. ती ही व्यक्ती असते.
म्हणूनच तर सर्व काही मिळवत असताना देखील पाहिजे ते करता येत असण्याचे स्वातंत्र्य असूनदेखील बरीच जोडपी खुश नसतात. काहीतरी चुकल्याची, राहून गेल्याची भावना मनात येत असते. याचं कारण या बाकीच्या गोष्टी आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून करत असतो. लग्न झाल्यावर आपण कोणाच्यातरी आयुष्याचा भाग झालेलो असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचं सुख दुःख, त्याचा आनंद आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतो.
म्हणूनच जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, तर स्वतःचा आनंद आपल्याला शोधायचा आहेच, पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या जोडीदाराला देखील आनंदात ठेवायचे आहे. बऱ्याच जणांना हा गैरसमज असतो की खूप सारे पैसे आले म्हणजे पाहिजे जे घेता येईल आणि त्यातून ही व्यक्ती खुश होईल. पण हे चुकीचे आहेत. पैसा गरजेचा आहे पण तो आपल्याला पूर्ण पणे आनंद देऊ शकत नाही.
काहीवेळा आपल्या जोडीदाराला फक्त काही वेळ हवा असतो, आपल्यासोबत काही क्षण घालवायचे असतात. आपल्याशी बोलायचं असतं. हे क्षण आपण तयार केले पाहिजेत, आपल्या जोडी दाराला जास्तीत जास्त समजून घेण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पैसा परत मिळवतो येतो पण हे क्षण, ही वेळ परत येत नसते.
आनंद मिळवण्यासाठी फार काही मोठ्या गोष्टी कराव्या लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या गोष्टी पण माणसाला आनंद देऊन जातात. फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे आणि घेता आला पाहिजे. फक्त माझं माझं न करता हे आपलं आयुष्य आहे, आपण जोडीने एकमेकांच्या आनंदाने जगुयात अस विचार करून, ही भावना मनात ठेवून संसार केला, जगलो तर खरा आनंद मिळेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.