Skip to content

जगात शाश्वत असं काहीच नाही,अगदी तुमच्या सध्याच्या अडचणी सुद्धा !

जगात शाश्वत असं काहीच नाही,अगदी तुमच्या सध्याच्या अडचणी सुद्धा !


हर्षदा पिंपळे


Nothing is permanent….आपल्या रोजच्या जगण्यातील सवयीचं वाक्य. पण खरंच असं काही आहे का ?

तर,जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणून आपण आयुष्याकडे पाहतो.प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल असणाऱ्या कल्पना निश्चितच वेगवेगळ्या असतात. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे.कुणाला आयुष्य अगदी सहज सुंदर वाटतं तर कुणाला आयुष्य अगदी खडतर, अवघड वाटतं.कुणी अगदी सहजतेने आयुष्य जगत असतं तर कुणी एकदम रडतकुढत आयुष्य जगत असतं.आता आयुष्य सहजपणे जगताना साधं खरचटलेलं जाणवतही नाही.

पण कधी कधी आयुष्य अशा पद्धतीने जगलं जातं की,छोट्या छोट्या गोष्टीही खूप त्रासदायक वाटायला लागतात.इतकच नव्हे तर,कुणाला गोष्टी गमावून बसण्याची भीती वाटत असते तर कुणाला आयुष्यात असणारी दुःखं, अडचणी यांच्या सातत्याने असण्याची भीती वाटत असते.काही गोष्टी कायमस्वरूपी आपल्यासोबत असाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं.अगदी पैसा , सुखसुविधा या शाश्वत असाव्यात असं अनेकदा वाटत असतं.आणि अडीअडचणी क्षणभरही नकोशा असतात.

पण मित्रांनो, या जगात शाश्वत असं काहीच नाही. अगदी सध्याच्या अडचणीसुद्धा !

हो, अगदी बरोबर ऐकलत ! या जगात शाश्वत असं काही नाही. पण तरीही आपण उगाचच काळजी करत बसतो.घडलेल्या गोष्टीचा खूप विचार करत राहतो.काय होणार ? कसं होणार ? असा विचार तासनतास केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. एखादी गोष्ट निसटून गेली तर तिच्याविषयी कायम झुरत राहण्यात काहीच अर्थ नाही.

आणि आयुष्यात संकटं,दुःखं सगळ्यांना असतात. सुखामागून दुःखं येतच असतं.पण मग या अडचणींचा,संकटांचा सातत्याने विचार करणही काही बरोबर नाही. विचार करून करून ना गेलेल्या गोष्टी परत येणार आहेत ना की संकटं क्षणात दूर होणार आहेत.

सांगायचा उद्देश इतकाच की, या जगात शाश्वत असं काही नाही. आपलं आयुष्यच क्षणभंगुर आहे. मग ह्या दुःखाचा इतका विचार का करत बसायचा ? क्षणभर असलेलं आयुष्यही असचं निसटून गेलं तर ? त्यापेक्षा असणारे सगळे प्रॉब्लेम सुद्धा क्षणांचेच सोबती आहेत असं समजून आयुष्य जगलं तर किती छान !

मित्रांनो,आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा फार खोलात जाऊन विचार नाही करायचा.कधी कधी काही गोष्टी हसत हसत सोडून द्यायला शिका.एखादी भौतिक गोष्ट असूद्या किंवा एखादी भावनिक गोष्ट असूद्या.कशाचा आणि किती विचार करायचा याचाही जरा विचार करून बघा.

कधी संपणार माझी दुःखं, गेली यार ती ट्रेन… असा विचार करून काहीच होणार नाही.मान्य आहे की, रोज काहीतरी नवीन घडतं,कधी नको असलेल्या गोष्टी घडत राहतात. पण सुखामागून दुःखं येणार,दुःखामागून सुख येणार.

शाश्वत असं काहीच नसतं नं.म्हणून सुखदुःखाचा खेळ असाच चालू राहणार. सध्याच्या असलेल्या अडचणीसुद्धा काही जन्मभर सोबत राहणार नाहीत. एक ना एक दिवस त्याही संपून जाणार आहेत.

चुका होतील,
होऊदे…
माणसं बदलतील,
बदलू दे…
परिस्थिती शिकवेल,
शिकवूदे…
वाटा चुकतील,
चुकू दे…
येतील कित्येक खडतर अन् खिन्न करणारे प्रसंग,
त्यांना येऊदे…
वाटा पुन्हा गवसतील,
गवसुदे…
टोचतील व्यथा,
टोचुदे…
तुटेल हृदय,
तुटुदे…
आयुष्य आहे, कुठल्याही क्षणी संपेल, संपुदे ….
कारण…
Nothing is permanent,Even your life..!

असं काहीसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं.आपण अनेकदा अशा गोष्टींमुळे खचून जातो.पुन्हा नव्याने जगायचं धाडस लवकर करत नाही.या गोष्टी किती काळ आपल्याला कवटाळून राहणार ? किती दिवस अजून हेच चालणार ? असचं होत राहणार ? असा प्रश्न,अशा शंका आपल्या मनामध्ये सहजपणे निर्माण होतात.

पण खरं सांगायला गेलं तर, आयुष्यात पुढच्या सेकंदाला काय होणार आणि काय नाही… हे सांगता येत नाही. काहीही होऊ शकतं.चांगलं किंवा वाईट.त्यामुळे आहे ते आयुष्य जगून घ्यायला हवं.

मनमुरादपणे,क्षणाक्षणाला..!

आहे तोपर्यंत तरी….आनंदाने जगून घ्या.😊


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!