आपण इतरांसाठी बदलण्याची तयारी ठेवतो, पण स्वतःसाठी बदलत नाही.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“नीला तू सांग ना मी कसा वागू, मी तसाच वागेन. तुला वाटतं ना मी उशिरापर्यंत बाहेर राहू नये, इकडे तिकडे जास्त वेळ घालवू नये. ठीक आहे मी तसच करेन. पण तू माझ्यावर रागावू नकोस ग! तुला माहित आहे ना, तू माझ्याही अबोला धरलास की मला नाही आवडत. तुला राग आला तर तुला बोल, बडबड पण अशी गप्प होऊ नकोस.
तुला माझ्या मधल्या ज्या गोष्टी आवडत नाहीत ना मी सर्व बंद करतो. पण ती माझ्याशी बोल. तू म्हणत असशील तर मी माझ्या मित्रांसोबत पण जास्त वेळ घालवत नाही. आपण दोघच कुठेतरी बाहेर जात जाऊ. अजून काय करू ते तू सांग. असं शांत बसून, काहीही न बोलता प्रश्न मिटतात का? मनात जे काही आहे ते बोललं तरच गोष्टी नीट होतात ना!
तुला जे खटकत ते तू बोल मी तुझ्यासाठी बदलायला तयार आहे. कारण माझ्यासाठी तुझ्याशिवाय महत्त्वाचं काही नाही. तुला जे वाटतं, जसं वाटत आपण तसच राहू.” विराज इतक्या कळकळीने बोलत होता पण नीला, तिच्यापर्यंत जणू हे सर्व पोहोचतच नव्हतं. तिने विराज बद्दल काही मतं तयार करून ठेवली होती. तिच्या मतांप्रमाणे तो वेळ न पाळणारा, तिला वेळ न देणारा, स्वतःच्याच आयुष्यात गुंग असलेला अस माणूस होता.
तिला जे वाटत होतं त्यातला सर्वच गोष्टी खोट्या किंवा घडल्याचं नव्हत्या असं नाही. पण त्यामागची बाकीची कारणं तिने कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. प्रसंगाच्या फक्त एका बाजूकडे ती लक्ष देत राहिली. आणि आता विराज जेव्हा तिला हे सर्व समजावू पाहत होता, तिच्यासाठी पूर्णपणे बदलू पाहत होता तर तेही तिला दिसत नव्हतं. एक भिंत जी त्या दोघांमध्ये तयार झाली होती ती काही केल्या तुटत नव्हती.
पण काय आश्चर्य आहे नाही? आपण इतरांसाठी, आपल्या माणसांसाठी बदलायला तयार होतो. त्यांना वाटतं म्हणून आपण आपल्या स्वभावात, आपल्या राहण्यात, आयुष्यात बदल करायला तयार होतो. पण अस कितीवेळा घडतं ज्यावेळी आपण इतर कोणासाठी नाही तर स्वतःसाठी, आपल्यासाठी बदलायला तयार होतो? इतर लोक म्हणतात म्हणून नाही, त्यांना आवडाव म्हणून नाही तर मला वाटत माझ्यात काही चांगले बदल व्हावे, मला वाटतं की माझ्या आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून मी बदलतो अस कितीवेळा होत? खूप कमी.
याच कारण आपल्याला स्वतः पेक्षा इतरांच्या मतांनी जास्त फरक पडत असतो. इतरांची मतं, ते आपल्याबद्दल काय विचार करतात याचा आपण जास्त विचार करतो. त्यांची समंती आपल्यासाठी जास्त महत्त्वाची असते. पण एक गोष्ट कधीही लक्षात घेतली पाहिजे की आपण चांगल राहिलो तरी लोक आपली मतं मांडणार, चुकीचं वाईट वागलो तरी मतं मांडणार. आपण प्रत्येक वेळी इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन स्वतःच आयुष्य बदलत राहिलो तर आपलं असं काही अस्तित्वच उरणार नाही.
आता इथे कोण आपल्याला काही चांगल सांगत असेल तर त्यांचं म्हणणं धुडकावून लावायचं असं नाही. त्याचा आदर करायचा. पण जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करायचा ठरवतो तेव्हा तिथे मला काय वाटतं? हा असा बदल करून मला स्वतःला त्याचा कसा फायदा होणार आहे? यात मी माझ्या मताचा विचार केला आहे का? या गोष्टी पण पहिल्या पाहिजेत. कारण आपण स्वतःच्या मनाने जेव्हा बदलत नाही; इतरांसाठी कितीही बदललं तरी तो कायम टिकत नाही. बदल जर खरचं दीर्घकालीन, सकारात्मक हवा असेल तर तो का स्वतःच्या मनाला आधी पटवून देता आला पाहिजे. बदल हा दुसऱ्याच्या समंतीसाठी नसून आपल्या दीर्घकालीन फायद्यासाठी पाहिजे तरच तो टिकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

