Skip to content

चुका करणाऱ्या लोकांना वारंवार समजून घ्याल तर तुम्हाला पुढे सरकता येणार नाही.

चुका करणाऱ्या लोकांना वारंवार समजून घ्याल तर तुम्हाला पुढे सरकता येणार नाही.


मेराज बागवान


चूक माणसाला खूप काही शिकविते. प्रत्येक माणसाच्या हातून छोट्या-मोठ्या चुका होतातच.चूक होणार नाही असा माणूस नाही.चुकतो तोच माणूस.पण फक्त चुकणे एवढेच नसते.तर ती चूक पुन्हा होऊ न देणे महत्वाचे असते.किंवा त्याच चुकीची पुनरावृत्ती न होणे महत्त्वाचे असते.नाहीतर ती चूक ,चूक नसते तर मुद्दाम ,जाणूनबुजून केलेली कृती असते.असेच चुकांसंबंधीत अनुभव तुम्हाला ही येत असतील.कधी तुम्ही चुकता तर कधी समोरची व्यक्ती चुकते.जेव्हा दुसरी व्यक्ती चुकते तेव्हा तुमच्यापैकी काही जणांचा असा स्वभाव असतो की ते त्या व्यक्तीला वारंवार समजून घेतात.पण ह्यामध्ये तुमचेच नुकसान असते. कारण….

घरात, काही ठिकाणी,आई-वडील बऱ्याचदा मुलांच्या चुका पाठीशी घालतात. सकाळी उशिरा उठत असेल तरी देखील ,’माझा मुलगा, माझी मुलगी’ असे लाड करीत बसतात.कधी कधी,मुलांनी उलट उत्तरे दिली तरी ते हसण्यावारी नेतात.खरे तर हे अत्यंत चुकीचे असते.पण प्रेमापोटी आई-वडील मुलांच्या चुकांकडे डोळेझाक करतात आणि मग स्वतःचे आणि मुलांचे देखील नुकसान करतात.पुढे जाऊन मुले तशीच बेभान पणे वागत राहतात आणि मग त्यावेळी पालक काहीच करू शकत नाही.त्यांना थांबवू शकत नाहीत.

नात्यांमध्ये देखील असेच होते. नवरा-बायकोच्या नात्यात देखील असे अनेकदा घडते.बायको नेहमी नवऱ्याच्या चुका पाठीशी घालत असते तर कधी नवरा बायकोच्या चुका झाकत असतो.नवरा निवांत राहतो नेहमी,घरच्या कामात काहीच मदत करीत नाही.तसेच बायकोला नेहमी गृहीत धरून चालतो तरी देखील बायको निमूटपणे सर्वकाही करीत राहते.दुसरीकडे,बायको खूप खर्च करणारी असते.तरी देखील नवरा तिला आवर घालत नाही.तर तिच्याकडून वारंवार अशा चुका होत राहतात.अशा प्रकारे दोघे नेहमीच एकमेकांच्या चुका समजून घेत राहतात.पण यामुळे त्या व्यक्तीला स्वतःची चूक कधी लक्षातच येत नाही.आपण जे करीत आहोत ते बरोबरच आहे असे तिला वाटत असते.यामुळे मग नवरा-बायको चे नाते आहे तसेच राहते,पुढे काही वेगळे घडतच नाही.

कार्यालयीन जीवनात देखील ,कामामध्ये काही कर्मचारी सतत चुका करीत असतात.पण वरिष्ठ त्यांना त्याबद्दल काहीच बोलत नाहीत.एक तर समजून घेतात नाहीतर मग स्वतःच त्या चुका निस्तरत बसतात.आणि ज्यांनी चुका केल्या आहेत ते मात्र निवांत राहतात.यामुळे चूक करणार्याना स्वतःची चूक कधी समजतच नाही.यामुळे संपूर्ण टीम च्या कामावर परिणाम होतो.वरिष्ठांनाचा वेळ जात राहतो.आणि पुढे गोष्टी सरकतच नाहीत.

मित्र-मैत्रिणींमध्ये देखील असे बरेचदा होते.मित्रांच्या,मैत्रिणींच्या काही वाईट सवयी,चुका दुर्लक्षित केल्या जातात.वेळीच त्यांना त्या लक्षात आणून दिल्या जात नाहीत.मग यामुळे सगळ्यांचेच नुकसान होते.मित्र आहे मैत्रीण आहे म्हणून नेहमी समजून घेतले जाते.पण चुका मात्र आहे तशाच राहतात आणि त्यांची पुनरावृत्ती होत राहते.तुम्हाला माहित असते हे चुकीचे आहे पण प्रत्येकवेळी तुम्ही समजून घेतात आणि आहे तिथेच राहतात.

तर अशा प्रकारे वारंवार चुका करणाऱ्या लोकांना समजून घेतले जाते आणि त्यामुळे तुम्हांला पुढे सरकता येत नाही.मनोमनी तुम्हाला माहित असते की,ही व्यक्ती चुका करीत आहे.मग ती चूक तुमच्या वैयक्तिक जीवनातील असू शकते किंवा मग व्यावहारिक जीवनातील.पण ती शेवटी चूकच असते.मात्र काही कारणांमुळे तुम्ही ती नेहमी समजून घेतात.जसे की ,त्या व्यक्तीवर तुमचे प्रेम असते,किंवा काही भावनिक नाते असते तर कधी त्या व्यक्तीने तुम्हाला अडचणीत मदत केलेली असते.कधी,उगाच वेळ जाईल म्हणुन,जे चालले आहे ते चालू दे असा दृष्टिकोन ठेवून देखील तुम्ही चुका समजून घेतात.कधी तुम्हाला त्या व्यक्तीला गमवायचे नसते म्हणून तर कधी चूक समजून घेतली नाही तर ती व्यक्ती तुमच्यावर रागावेल,निघून जाईल अशी काहीशी भीती देखील तुम्हाला वाटत असते.

पण यामुळे तुम्ही मात्र मनातून एकटे पडत राहतात. चूक आहे आणि आपण तरी देखील ती समजून घेत आहोत हे मनाला नेहमी तुमच्या लागत राहते.पण तुम्ही काहीच करु शकत नाही.कारण तुम्ही नेहमी समजून घेत राहतात. एखाद्या व्यक्तीला समजून घेणे ही चांगलीच गोष्ट आहे.पण वारंवार चुका एखाद्या कडून होत असतील तर किती आणि कुठपर्यंत समजुन घ्यायचे ही विचार करण्याची गोष्ट आहे.

वारंवार चुका समजून घेत राहिलात तर नुकसान तुमचे आणि त्याचे देखील असते.त्या व्यक्तीला स्वतःची चूक कधी दिसत च नाही.आपण जे करीत आहोत ते बरोबरच आहे असा खोटा अहंकार त्या व्यक्तीत बळावू शकतो.किंवा जरी त्या व्यक्तीच्या लक्षात आले की माझ्याकडून चूका होत आहेत तरी देखील एक प्रकारचा विश्वास त्याच्याकडे असेल की ,काहीही झाले तरी ही व्यक्ती मला समजूनच घेणार.पण असे होणे ही खूप सावध करणारी गोष्ट आहे.म्हणून वेळीच चुकांवर आवर घाला म्हणजे आयुष्य आपोआप पुढे जात राहील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “चुका करणाऱ्या लोकांना वारंवार समजून घ्याल तर तुम्हाला पुढे सरकता येणार नाही.”

  1. खुप छान,आपणही कुठेतरी,कधीतरी बोललच पाहिजे.नाहितर चुकीचे लोक आपल्याला च चुकिचे ठरवतात.आपल्यालाही बोलण्याचा हक्क आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!