समोरचा आपल्याला काय समजतो हे माहीत असणं फार महत्त्वाचं असतं, पुढील सर्व प्रकारचे भ्रम टाळण्यासाठी..
मेराज बागवान
एखादी गोष्ट जाणून ,समजून कशी घ्यायची हे प्रत्येकावर अवलंबून असते.कोणाला काही गोष्टी लगेच समजतात,लक्षात येतात तर काहींना त्या लवकर समजत नाहीत किंवा खूप उशीरा समजतात.काही गोष्टी समजण्यासाठी सांगितल्या जातात तर काही गोष्टी आपण स्वतः कोणीही काहीही न सांगता समजून घ्याव्या लागतात. ह्या लेखात आपण हेच पाहणार आहोत की, इतरजण तुमच्याविषयी काय विचार करतात किंवा तुमच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात काय स्थान असते.आणि हे सर्व तुम्ही का जाणून घेतले पाहिजे.कारण समोरचा आपल्याला काय समजतो हे समजून घेणं,जाणून घेणं फार फार महत्त्वाचं असतं पुढचे सर्व भ्रम टाळण्यासाठी.
नाती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असतात.घरात,तुम्ही जिथे काम करतात तिथे ,तुमचे मित्र-मैत्रीणआणि सर्वाजनिक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्ती भेटत राहतात. काहींशी कमी वेळात इतकी छान गट्टी जमते तर काही जण तुमच्यासोबत वर्षानुवर्षे असतील तरी देखील सूर जुळत नाहीत.हे असे का बरे होत असेल? तर ह्याला मुख्य कारण म्हणजे,समोरच्या व्यक्तीची तुमच्या विषयीची मानसिकता.एखाद्या व्यक्तीला तुम्ही खूप चांगला मित्र समजत असतात पण तो मात्र तुमच्याशी जेवढयाच तेवढे ठेवत असतो.याचाच अर्थ त्याच्या मनात तुमच्याविषयी ती प्रतिमा नसते जी तुमच्या मनात त्याच्याविषयी असते.जर तुम्ही वेळीच हे ओळखू शकलात तर पुढच्या सर्व समस्या टाळता येतात आणि कोणाच्या आयुष्यात आपण किती राहायचे याचे भान येते.म्हणून समोरच्या व्यक्तीला समजून घेता आले पाहिजे.
एकतर्फी प्रेमात किंवा प्रेम प्रकरणात देखील असे बरेचदा घडते.जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला खूप किंमत देत असते.प्रथम प्राधान्य देत असते.आयुष्यातिला जास्तीत जास्त वेळ ती त्या व्यक्तीला देत असते.तिला भरभरून प्रेम देत असते.स्वतः आधी त्या व्यक्तीचा विचार करत असते.त्या व्यक्तीला काय हवे नको ते पाहत असते.पण अगदी उलट दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असते.तिच्या मनात ह्या सर्व भावना इतक्या वर पातळीच्या नसतात.कारण तिचा दृष्टिकोन त्या व्यक्तिविषयी तसा नसतो.आणि म्हणूनच ती त्या व्यक्तीला तितकी जागा स्वतःच्या आयुष्यात देऊ शकत नाही.अशा प्रकारे,त्या पहिल्या व्यक्तीने हे वेळीच ओळखून जगले पाहिजे. नाहीतर भ्रमात राहून काहीच साध्य होत नाही.
जेव्हा आपण एखाद्या नात्यात असतो तेव्हा तुम्ही अनेकदा समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे गृहीत धरत असतात.तुमचा हेतू त्या व्यक्तीवर हक्क गाजविणे किंवा स्वतःच्या मालकीची आहे असे दाखविणे असा मुळीच नसतो.पण भावनांमुळे,प्रेमामुळे तुम्ही त्या व्यक्तीशी खुओ जास्त कनेक्ट होतात.आणि तुम्हाला वाटत राहते की समोरचा देखील आपल्याविषयी तसाच विचार करतो जसा मी करत आहे.पण असे अजिबात नसते.कारण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते.प्रत्येकाला स्वतःचे विचार,मत आणि दृष्टिकोन असतो.तुम्ही कितीही चांगले असलात, सज्जन असलात,निर्मळ आणि निःस्वार्थी असलात तरी देखील समोरचा व्यक्ती तुम्हाला तसे समजत असतोच असे नाही.तुम्ही किती जरी त्या व्यक्तीसाठी करीत असलात तरी देखील तो त्याच्या आयुष्यात तुम्हाला तेवढीच जागा देतो जेवढी त्याला द्यायची असते.म्हणून तुम्ही वेळीच ओळखायला शिका की समोरची व्यक्ती तुम्हाला काय समजते.म्हणजे पुढी सर्व भ्रम टाळता येतील.
माणसे ओळखायला शिकणे खूप महत्वाचे असते.हे लगेच एका दिवसात जमत नाही. परिस्थिती, रोजचे जगणे,समाजात रोज वावरणे,वेगवेगळ्या माणसांशी भेटणे यामुळे हे हळूहळू समजू लागते.इथे आपल्याला कोणाला ‘जज’ नाही करायचे.जसे की, ‘हा ,मी हिला मदत केली, आता ही नेहमी मला धरून राहिल,मला तिच्या आयुष्यात जागा देईल’.असे आपल्याला अजिबात करायचे नाही.तर समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना,जगत असताना,वावरत असताना त्या व्यक्तीचे वागणे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे असते.त्याचे थोडे फार निरीक्षण करणे देखील आवश्यक असते.कधी कधी शब्दांपेक्षा माणूस कसा वागतो बोलतो ह्यावरून देखील ती व्यक्ती ओळखता येते, समजून घेता येते.म्हणून नेहमी दुसऱ्या व्यक्तीला फक्त आणि फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा,म्हणजे सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि कोणताही भ्रम राहणार नाही.
आजकाल माणसे एकमेकांना खूप फसवत आहेत.कधी व्यवहारात तर कधी नात्यात.मग अशा वेळी माणसे कशी ओळखायची.माणसे ओळखायची असतील तर कमी बोलणे आणि समोरच्याचे जास्त ऐकणे ,भावनांच्या आहारी न जाता शांतपणे विचार करून बोलणे आणि काहीही झाले तरी संयम तुटू न देणे अशा काही गोष्टी तुम्ही करू शकतात.
प्रत्येक व्यक्तीला आयुष्य कसे जगायचे याचा पूर्ण अधिकार असतो.तुम्हाला वाटते की समोरच्याने तुमच्या म्हणण्याप्रणेच वागले पाहिजे. तर हे अत्यंत चुकीचे आहे.उगाच जोर जबरदस्तीने गोष्टी साध्य होत नाहीत.म्हणून कधीच कोणालाच तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी फोर्स करू नका.तुमचा उद्देश किती जरी निःस्वार्थी आणि सकारात्मक असला तरी देखील समोरचा तुम्हाला अगदी तसेच समजतो असे नाही.म्हणून वास्तव स्वीकारून जगत राहा.मृगजळाप्रमाणे काही गोष्टी असतात त्या वेळीच ओळखा,समजुन घ्या आणि पुढे चालत राहा.
कित्येकदा खूप उशिरा काही गोष्टी लक्षात येतात.कारण आपण फक्त भावनीकरित्या विचार करीत असतो.आणि काही वास्तव गोष्टींकडे बघून न बघितल्यासारखे करीत असतो.एक गोष्ट कायम स्वीकारायला शिका,”जे तुमचे नाही, ते धरून काय उपयोग? जे तुमचे आहे त्या कडे लक्ष केंद्रित करा आणि जे तुमचे नाही त्या गोष्टी सोडायला शिका.
ज्या दोन व्यक्तींच्या भावना एकमेकांप्रति सारख्या असतात तिथेच नाते टिकते.एकतर्फी भावना,विचार असतील तर त्याला काहीच भविष्य नसते,किंबहुना ते नाते सोडून देणेच हिताचे असते.त्यामुळे माणसे समजून घ्यायला शिका,तुमच्याविषयी त्यांच्या मनात काहीच जागा नसेल तर ते तुम्हाला बोलून दाखवीणार नाहीत.तर तुम्हाला स्वतःलाच ते समजून घ्यावे लागेल.आणि एकदा का तुम्ही हे ओळखायला शिकलात की भावनिक गुंता होणार नाही,गैरसमज निर्माण होणार नाही.
म्हणून स्वतःचे मानसिक आरोग्य जपायचे असेल तर, समोरचा आपल्याला काय समजतो हे माहीत असणं फार महत्त्वाचं असतं, पुढील सर्व प्रकारचे भ्रम टाळण्यासाठी….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Nice khup advancing ….🤗🤗👍
Perfect
Very good, now I am fell better to understand how people behave in society. ..