अजूनही आपल्याला आपलं आयुष्य बदलता का येत नाहीये, याची १० कारणे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
समजा आपण एकाच पद्धतीचं जेवण कित्येक दिवस, कित्येक महिने जेवत असू तर आपल्याला कसं वाटेल? बाहेर शिकण्यासाठी गेलेली, नोकरीसाठी गेलेली जी लोक असतात त्यांना याचा चांगला अनुभव असेल. ना कोणती वेगळी चव, ना वेगळा असा काही पदार्थ. एका वेळेनंतर आपल्याला त्या जेवणाचा कंटाळा येऊ लागतो. अस का होत?
कारण आपल्याला वेगवेगळ्या चवी हव्या असतात, वेगवेगळे पदार्थ हवे असतात. तोचतोच पणा नको असतो. या वेगळ्या चवीच्या शोधात माणसं मग बाहेरचं खायला सुरू करतात. म्हणजेच काय तर ते एकसारखं त्याच चवीच खाण त्यांना नको असत म्हणून ते स्वतःच बाहेर जाऊन खातात. हा माणसाने स्वतःहून केलेला बदल आहे. का? कारण त्याला सुरुवातीची परिस्थिती नको आहे.
जेवणाच जसं असत ना, तसच आपल्या आयुष्याचं असत. आपलं हे आयुष्य वेगवेगळ्या अनुभवांनी, घटनांनी, माणसांनी, आपल्या स्वतःच्या एका विशिष्ट जीवनशैलीने तयार झालेलं असत. ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरत असतात. जेवणात जसं विविध पदार्थ त्यांच्या चवीने लज्जत वाढवतात तसच आयुष्याचं आहे. यात जितकं वैविध्य असेल, वेगळेपणा असेल तितकं ते आपल्याला छान वाटत. अस आयुष्य जगायला आपल्याला मजा येते. पण सर्वांचं आयुष्य अस नसत.
बऱ्याच जणांचं आयुष्य हे एकसुरी झालेलं असत. तसच माणसाने स्वतः लाच अश्या काही सवयी लावून घेतलेल्या असतात ज्या त्याच नुकसान करत असतात. ज्या बदलण्याची आवश्यकता असते. एकप्रकारे चुकीच्या पद्धतीने माणूस आपलं आयुष्य जगत असतो. काही जणांना याची जाणीव होते तर काही जणांना होतच नाही. दोन्ही बाबतीत आयुष्य बदलायची, त्यात बदल घडवून आणण्याची गरज असताना देखील माणसाला ते बदलता येत नाही. याची काही कारणे आहेत. ती कोणती ते पाहू,
१. अनिश्चिततेची भीती: जेव्हा आपण एका ठराविक पद्धतीचं आयुष्य जगत असतो, जरी ते योग्य नसल तरी त्यात ज्या काही घटना घडत असतात किंवा त्यांचा जो क्रम असतो त्याची आपल्याला माहिती असते. उदा. आपली दिनचर्या. आपल्याला अंदाज असतो की आपण दिवसभरात काय काय करणार आहोत. जेव्हा आपण बदल करायचा म्हणतो तेव्हा आधीच्या गोष्टी ज्या मनावर खूप काळापासून ठसल्या आहेत त्या काढाव्या लागतात. हे सोपं नसत. तसच जो काही बदल करायचा असतो तो देखील नवीन असतो. अनोळखी असतो. त्यात काही निश्चित नसत. आणि याचीच आपल्याला भीती असते.
२. ही वेळ घेणारी प्रक्रिया असते: कोणतीही गोष्ट लगेच घडत नाही. त्याला वेळ हा लागतोच. मग ती बदल का असेना. आपली स्वतःची एखादी सवय बदलायला आपल्याला किती वेळ लागतो, कष्ट घ्यावे लागतात. हे तर आयुष्य असत. यामध्ये या सर्वच गोष्टी येतात. हे कष्ट, हा वेळ घ्यायची आपली तयारी नसते. त्यासाठी थांबायची आपली तयारी नसते.
३. प्रेरणा कमी असते: जसं आधी म्हटल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल करण गरजेचं आहे याची जाणीव सर्वांना होत नाही. ज्यांना होते ते काही ना काही प्रयत्न करतात. पण ज्यांना ही जाणीवच नाही की कुठेतरी काहीतरी चुकत आहे, आपण ते बदललं पाहिजे ते यासाठी तयारी तरी कशी दाखवणार? अश्या माणसांची प्रेरणाच कमी असते. त्यामुळे आयुष्य बदलता येत नाही.
४. संयम नसतो: आपलं आयुष्य आता गतिमान झालं आहे. अश्या आयुष्याची आपल्याला सवय झाली आहे. सर्व गोष्टी लगेच, तत्काळ झाल्या पाहिजेत अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे. यातून आपल्यामध्ये जो संयम असावा लागतो तोच कमी होत चाललाय, कोणत्याही गोष्टीसाठी काही काळ थांबलं पाहिजे हेच आपल्याला मुळी पटत नाही. त्यामुळे बदल होण्यासाठी जो वेळ घ्यावा लागतो तो घ्यायला आपण तयार नाही. तितका संयम आपल्यात नाही.
५. ध्येय नसणे: आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे याचीच जर स्पष्टता नसेल तर आपल्या वाटा या चुकणारच आहेत. म्हणजे मला जायचं तर आहे पण कुठे, कसं, कधी काहीच माहीत नाही. तसंच बदल तर करायचा आहे पण त्याची सुरुवात कुठून करायची? त्यासाठी काय बेत आखायचा?बदल करायचा असला तरी आधी कोणत्या गोष्टीत करायचा? हे काहीच स्पष्ट नसल्याने तो करता येत नाही.
६. अपयशाची भीती: माणसाची एक प्रवृती आहे. जी गोष्ट अजून घडलीच नाही त्यासाठी तो चिंतित होतो आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या देखील करत नाही. स्वतःला मागे खेचतो, अडकवून ठेवतो. इथे देखील हेच होत. बदल करताना सर्व नव्याने घडणार असत. त्यात यश येईल का नाही याची खात्री नसते. समजा अपयश आलं तर या भीतीने माणूस तो बदल करायला धजावत नाही.
७. लोकांची भीती: कुुछ तो लोग कहेंगे. बरेचदा माणसाच्या मनात खूप काही करायचं असं असत. पण या एका भीतीपोटी तो काही करायला जात नाही. जी खर तर अवास्तव असते. लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल या भीतीने, लाजेने माणूस आव्हानं घेत नाही, स्वतःला बदलायला, स्वतःच आयुष्य बदलायला तयार होत नाही.
८. स्व नियंत्रण कमी असते: आपलं स्वतःवरच नियंत्रण कमी असत तेव्हा पण बदल व्हायला अडथळे येतात. याच अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे पथ्य पाळणे. समजा वजन वाढलं असेल, ते कमी करण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळायला सांगितल्या जातात. पण किती जणांना ते जमत? यासाठी स्वतःवर नियंत्रण असणं खूप आवश्यक असत. तेच होत नाही आणि त्यामुळे बदल अवघड होऊन बसतो.
९. दिनचर्या बदलता येत नाही: आपलं नियमित आयुष्य जगण्यासाठी आपण एक ठराविक दिनचर्या तयार केलेली असते. जी बऱ्याच प्रमाणात आपल्याला सवयीची असते. त्यात बदल करून पुन्हा नव्याने काहीतरी सुरू करण कष्टाचं आणि थकवून टाकणार काम असत. जे जमत नाही, ज्यासाठी तयारी नसते.
१०. एकट्यानेच सर्व करत राहणे: बरीच लोकं आपलं आयुष्य आहे, जर बदल करायचा असेल तर तो आपणच केला पाहिजे अश्या विचाराने एकट्यानेच सर्व करू पाहतात आणि अपयशी होतात. पण इथे लक्षात घेतलं पाहिजे की जरी हे आपल आयुष्य असल तरी त्यात इतर लोकांचा सहभाग हा असतोच. आपण एकटे कधी असत नाही. त्यामुळे आपण जर काही चांगल करायचा प्रयत्न करत आहोत, जे आव्हानात्मक काम आहे तर त्यासाठी आपण इतरांची मदत ही घेतली पाहिजे. तरच आपली वाटचाल सुखकर होते.
ही अशी काही कारणे आहे ज्यातून माणसाला स्वतःच आयुष्य बदलता येत नाही.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

