Skip to content

नात्यांचं आयुष्य त्यांनाच लाभतं जे निभावण्यावर विश्वास ठेवतात आणि तशी कृतीही करतात.

नात्यांचं आयुष्य त्यांनाच लाभतं जे निभावण्यावर विश्वास ठेवतात आणि तशी कृतीही करतात.


हर्षदा पिंपळे


आठवणीच्या उरल्या-सुरल्या जाळ्यामधुनी,
कातरवेळी अश्रुभरल्या डोळ्यामधुनी
छेडीत जातो आहे तुझीच तान मी
तुझ्या वहितील जुनेच पिंपळपान मी…!!

( सदर गीताच्या ओळी उत्तरायण चित्रपटातील आहेत.)

आयुष्यात नात्यांच स्थान काही वेगळच आहे.कितीतरी नाती ही अशीच वहीतील पिंपळाच्या पानासारखीच असतात. सुंदर, जाळी झाली तरीही आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवावीशी वाटणारी..!

पण सगळ्याच नात्यांना पिंपळाच्या पानासारखं आयुष्य लाभत असेल का ? तर नाही.सगळ्याच नात्यांच आयुष्य हे काही त्या पिंपळाच्या पानासारखं नक्कीच नाही.अहो, इतकं भाग्य कुणाचं म्हणायचं ? छे ! आजकाल जाळी होईपर्यंत नाती टिकतात तरी कुठे ? किंमत कमी होत जाताना दिसतेय. नात्यांचा तोल हल्ली सहजासहजी कुणाला सावरता येत नाही असं दिसतय.

मनुष्य , जन्मापासून नात्यांच्या सुरेख बंधनात बांधला गेलाय.नात्याच्या विविध छटांसोबत त्याचं वेगवेगळं कनेक्शन आहे. मैत्रीचं नातं असो किंवा माणूसकीचं नातं.किंवा कोणतही कौटुंबिक नातं असो.माणूस नात्यांशी जोडला गेलाय.एक वैवाहिक नातं दोन अनोळखी कुटुंब जोडत असतं.अर्थात नाती कशी कुणाशी आणि कधी जोडली जातील काही सांगता येत नाही. पण हेही तितकच खरं,की सगळीच नाती आयुष्यभर टिकत नाही. काही तुटतात, आणि क्षणात संपतात.ती नाती निभावली जात नाहीत.आणि ज्या नात्यांना आयुष्य लाभतं ती सहजपणे निभावली जातात. त्या नात्यांमध्ये एक विश्वास असतो.म्हणून ती अगदी शेवटपर्यंत मुरत राहतात.अगदी लोणच्यासारखीच !

हल्ली, वैवाहिक जीवनाचं उदाहरण घेतलं तर नक्कीच लक्षात येईल. कित्येक वैवाहिक नाती हल्ली सहजपणे तुटताना आपण सगळेच पाहतोय. ना तिथे नातं निभावण्याचा विश्वास दिसतो.ना की,तशी कृती करताना कुणी नजरेस पडतं.जिथे , ज्या नात्यांमध्ये एकमेकांप्रती विश्वास नसेल, नातं निभावण्यासाठी कुणी काही प्रयत्नच करत नसेल तर त्यांना नात्यांच आयुष्य लाभेल तरी कसं ?

एकतर विश्वास ठेवायला क्षणभर पुरेसा नसतो.तो गमवायला मात्र एक क्षणच पुरेसा ठरतो.आपण सगळेच जाणतो,कुठल्याही नात्यामध्ये प्रेमाइतकच , विश्वासाला महत्त्व आहे.मैत्रीत असो किंवा प्रेम,विश्वास असणं आवश्यक आहे. मैत्री आणि प्रेमाच्या या भावना विश्वासाच्या भिंतीवर तर उभ्या असतात.

ज्या मैत्रीत मैत्री निभावण्याचा जर विश्वासच नसेल तर ती मैत्री किती काळ टिकेल काही सांगताच येत नाही.ती टिकेल की नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही.

एखादं नातं कधी कधी तुटायला येतं,तेव्हा ते सावरलं जाऊ शकतं , थोडं नमतं घेऊन नातं निभावण्यासाठी कुणी प्रयत्न करत असेल तरच ते नातं टिकू शकतं.त्यांना त्या नात्यांच आयुष्य नक्कीच लाभू शकतं.पण , आजकाल हे खूप क्वचितच पहायला मिळतं.

कधी कधी एकच जण प्रयत्न करतो तर कधी कधी दोघही हात वर करून मोकळे होतात.एकमेकांना समजून घ्यायला थोडी स्पेस देणं गरजेचं असतं.एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं.आजकाल दोन व्यक्तींमध्ये जे अंडरस्टँडींग असायला हवं ते खूप कमी प्रमाणात दिसून येतं.

विश्वासाचा अभाव, संशयी वृत्ती, सातत्याने अविश्वास दाखवणे, केवळ मोठ्या मोठ्या शब्दांची भाषा वापरणे पण प्रत्यक्षात कोणतीही कृती न करणे.या अशा गोष्टी कुठल्याही नात्यात असतील तर ती नाती फार काळ तग धरून राहत नाही. सहजपणे कोलमडून पडतात ती नाती.त्यांच्यात नात्यांना निभावण्याची क्षमता कमी असते.अशाने नात्यांच आयुष्य वाढत नाही. फुलत नाही.कोणतच नातं बहरत नाही.

म्हणून, नातं कोणतही असूद्या, त्यामध्ये नातं निभावण्याचा विश्वास असायला हवा. तो विश्वास जपता यायला हवा. नुसतं नातं मिरवण्यात काहीच अर्थ नसतो. आणि केवळ बोलणं महत्वाचं नसतं तर त्याचबरोबर कृतीही तितकीच महत्वाची असते.हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं.आज जोडलं उद्या तोडलं याला काहीच अर्थ उरत नाही.जोडलेलं निभावण्यासाठी प्रयत्न करणही आवश्यक आहे.

त्यामुळे कधी कुणासोबत नातं जोडत असाल तर ते निभावण्याचा विश्वास निर्माण करा.आणि त्याप्रमाणेच तशी कृती करायलाही विसरू नका.एखादं नातं पिंपळपानासारखच जुन्या वहीत जपून ठेवावसं वाटत असेल तर त्याची आधी काळजी घ्यायला विसरू नका. त्याला जपायला विसरू नका.त्यापेक्षा वेळीच मायेचं पाणी घाला.एकमेकांमध्ये आशेची किरणं जागवायला शिका.नात्याचा वृक्ष बहरल्याशिवाय राहणार नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “नात्यांचं आयुष्य त्यांनाच लाभतं जे निभावण्यावर विश्वास ठेवतात आणि तशी कृतीही करतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!