Skip to content

आपल्या वयोवृद्ध आई-बाबांना एक सुट्टी आणि एक संध्याकाळ देऊयात !

श्वेता पेंढारकर

प्रसंग साधे तर काही असे असतात की आयुष्यात खूप काही शिकवून जातात…परवा ताई चे सासरे वारले..अगदी निमोनिया कारण चांगले होऊन घरी आले आणि त्या दिवशी किरकोळ त्रासात जीवनयात्रा संपवली…आणि तरळून गेल्या खूप गोष्टी…परवा परवा पर्यत सर्वांशी बोलणारे दादा ,सतत काहीतरी मागणारे दादा,आजूबाजूला माणसे आहेत ना याचा अंदाज घेणारे दादा…गेले…माणूस जातो आणि असंख्य आठवणी मागे ठेऊन जातो…

ताई च्या थकलेल्या 75 वर्षाच्या सासूबाई,त्याचाच कार्या साठी आलेले माझे 84 वर्ष सासरे 75 वर्षाच्या सासुआई,माझी 65 च्या जवळपास असणारी आई आणि 70 गाठलेले बाबा पाहिले आणि मन शेवरी च्या कापसाच्या सारख विचारात उंच उडत गेलं

वयोमानाप्रमाणे वयस्कर लोकांचा आपल्याला कधी त्रास होत असेल,कधीतरी त्याच्या बडबडीने नको वाटत असेल..कधी त्याचा आपल्यावर चिडण्याचा त्रास होत असेल..कदाचित ते चिडण विनाकारण ही असेल..कधी त्याच रुसणं ,रागावणं उगाच असेल…पण तरी त्यांना समजून घ्या..हे पिकलं पान डहाळीला आहे तो पर्यंत ठीक आहे एकदा गळुन पडलं की बस आठवणी,दुःख आणि पश्चाताप,त्रास या शिवाय काही मिळत नाही…

आलाच त्याच्या बोलण्याचा राग तर सोडून द्या..आपण याच वयाचे झालो की अपेक्षा असेल ना आपल्याला कुणी समजून घेण्याची ,आपलं म्हणणं ऐकण्याची मग सुरुवात आपल्या पासून करुयात… एकत्र कुटुंब पद्धती असेल तर दिवसातील थोडा वेळ या वयोवृद्ध लोकांना द्या..त्याच्या शेजारी बसून थोडे स्वतः हसा थोडे त्यांना हसवा.. त्याच्या कडून काही जुने किस्से ऐका ..काही गोष्टी तुम्ही सांगा…ही मंडळी लांब असतील तर फोन वर निदान दिवसातून एक फोन करा कधी व्हिडिओ कॉल वर बोला…

काही वयोवृद्ध लोक हट्टी असतात पण त्याच्या जीवनातील अनेक घडामोडी ,प्रसंग त्यांना तसे बनवतात हे लक्षात ठेवा…आपणच समजून घेऊ शकत नसलो तर फक्त आपलं बालपण आठवा हेच आई बाबा आपले सगळे हट्ट पुरवत होते ना?तुम्ही आजारी असताना तुमच्या उश्या पायथ्याशी बसून तुम्ही ठीक होण्यासाठी प्रार्थना आणि सेवा करत होते ना? तुमची शी,शु काढताना ह्यांनी कधीच घाण म्हटलं नव्हतं..मग आता त्यांना गरज आहे तर नक्की त्यांना वेळ द्या…

कदाचित तुमच्या रोजच्या धकाधकीत नाहीच शक्य झालं तर आठवड्यातून एक वार त्यांना द्या ..आयुष्याच्या सांजेला जेव्हा तुम्ही निवांत असाल आणि तुम्हाला सोबतीची गरज भासली तर तेव्हा ही सल नको की माझ्या आई वडिलांना मी सोबत करू शकलो नाही…त्यांची देखील एक सांज अशीच एकटी असेल…आपल्याशिवाय….

चला उठा आज आत्तापासून सहजच एक फोन ,एक सुट्टी आणि एक संध्याकाळ देऊयात आपल्या घरातील या वयोवृद्ध पण अनुभवी आपल्याच आई बाबांना…?

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्या वयोवृद्ध आई-बाबांना एक सुट्टी आणि एक संध्याकाळ देऊयात !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!