परिस्थिती कशीही असो, आयुष्यात संतुलन खूप महत्त्वाचे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
परिस्थिती, situation जी कधीही एकसारखी असत नाही. प्रत्येक वेळी त्यात काही ना काही बदल हे होतच असतात. अगदी क्षणात काय होईल हे सांगता येत नाही असे प्रसंग आपल्या आयुष्यात येऊन जातात. ज्याची आपण कल्पना देखील केलेली नसते. पण या सतत बदलत जाणाऱ्या परिस्थितीत तग धरून राहणे, त्यात टिकणे हे माणसाचे खरे सामर्थ्य आहे. आपल्याला फक्त टिकून राहायचे नाही तर स्वतःला, आपल्या आयुष्याला संतुलित देखील ठेवायचे आहे आणि हे खर आव्हानात्मक काम आहे. कारण बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला स्थिर ठेवणं वाटते तितकी साधी गोष्ट नाही. सर्वांना ते जमत अस देखील नाही.
वादळ आल्यावर मोठे मोठे वृक्ष अगदी भक्कम असलेली झाडं उन्मळून पडतात, मोडतात. पण गवताचं साधं पात ते मात्र मोडत नाही. तुटत नाही. का? याच कारण त्याच्यामध्ये लवचिकता असते. परिस्थितीनुसार स्वतःला वळवयाची क्षमता असते. वारा ज्या दिशेने येईल त्या दिशेने ते पात वळत असत आणि तितक्याच सहजतेने ते वर देखील येत असत. आपल्या मूळ पदावर येत असत. यालाच स्थितीस्थापकत्व अस म्हणतात. काहीही झालं, कितीही संकट आली तरी त्यांना पार करून, त्यांच्यावर मात करून आपल्या मूळ पदावर येणे.
आता अस हे स्थितीस्थापकत्व असणं का गरजेचं आहे? याचा आयुष्य संतुलित असण्याशी काय संबंध आहे? तर जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात, असे प्रसंग येतात जे अंत पाहणारे असतात अश्या वेळी आपण आपल्या ठराविक विचारांना धरून राहिलो,एका विशिष्ट पद्धतीनेच त्या गोष्टीकडे त्या प्रसंगाकडे पाहत राहिलो तर आपण त्यात अडकून पडतो, आपण एका प्रकारे त्या परिस्थितीला शरण जातो. आणि या सर्व गोष्टींमध्ये आपण आपलं संतुलन गमावून बसतो. ज्यातून आपलं नुकसानच होत.
स्वतःच संतुलन गमावून बसल्याने आपण अनेकदा अश्या गोष्टी करून बसतो ज्या आपल्याला करायच्या नसतात, असे काही निर्णय घेतो ज्याचा नंतर आपल्याला पश्र्चाताप होतो. आपण नंतर म्हणतो देखील, या गोष्टीचा मला आता पश्र्चाताप होत आहे पण त्यावेळी माझ्याकडून ही चूक झाली. हे अस होत याच कारण आपण स्वतः त्यावेळी संतुलित नसतो. म्हणजेच काय तर आपले विचार लवचिक नसतात. आपल्या भावना, आपल्या कृती आपल्याच ताब्यात राहत नाहीत.
म्हणूनच जर आपल्याला आपलं आयुष्य संतुलित ठेवायच असेल तर त्यासाठी स्वतः ला संतुलित ठेवता आलं पाहिजे. कारण शेवटी आपलं आयुष्य हे आपणच बनवत असतो. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जर कोण आपल्या आयुष्याला आकार देत असेल तर ते आपणच असतो.
इतर लोक फार फार तर त्यात हातभार लावत असतात. पण आपल्या आयुष्याच्या दोऱ्या या आपल्याकडेच असतात. त्यामुळे त्याला कसं संतुलित ठेवायच हे देखील आपल्यालाच जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार वागल पाहिजे. म्हणजे कसं?
तर कोणत्याही परिस्थितीमध्ये टोकाचा अवास्तव विचार न करता वास्तवाला धरून ज्यातून काहीतरी चांगल निर्माण होईल असा विचार करून आपल्याला वागल पाहिजे. खूप जास्त चांगल आणि खूप जास्त वाईट ही दोन्ही टोक आहेत. आपल्याला सुवर्णमध्य गाठायचा असतो. आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगात जरी आपण अस वागू लागलो तरी आपलं आयुष्य संतुलित होईल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


खूपच प्रेरणादायी विचार, वैचारिक व मानसिक मदत करणारा लेख आहे.