केवळ आपलं आहे म्हणून नातं टिकत नाही तर आपलेपणाने वागता आलं पाहिजे.
सोनाली जे.
रणरणत्या उन्हात , तप्त जमिनिवर जेव्हा पहिल्या पावसाची पहिली सर जशी जमीनीवर येते,तेव्हा मातीत ती सर स्वतःमध्ये एवढी एकरूप करून घेते की मातीचा तो सुगंध मुक्त पणाने सभोवतीच्या वातावरणातही एकरूप होऊन जातो.
केवळ आपलं आहे म्हणून नातं टिकत नाही तर आपलेपणाने वागता आलं पाहिजे.
जीवनात खूप व्यक्ती भेटतात पण एक आपुलकीचे , आपलेपणाचे नाते क्वचितच लोकांबरोबर जुळते त्या नात्याला नाव नसते परंतु काळजी ,जिव्हाळा खूप असतो, नाती ही रक्तानेच जुळली जातात असे काही नाही तर सहवास आणि संवाद नाती बनवतो आणि नाती ही आपसातील प्रेम ,माया जिव्हाळा ,स्नेह आपलेपणा, आपुलकीने आणि जाणीवांनी देखील जुळली जातात….जर नात्यात प्रेम, माया, जिव्हाळा, स्नेह, आपलेपणा , ओढ, आपुलकी , विश्वास आणि जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते पण जर नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात……
आयुष्यात येणारी माणसं ही ऋणानुबंधाने येतात, आणि त्या अनुबंधाचं ऋण संपलं की निघून ही जातात..! व.पु. काळे म्हणतात तसे बँकेत खाते बंद केले की account closed असा पासबुकावर शिक्का मारला जातो. तसेच काहीसे. ऋणानुबंध संपले की त्या व्यक्ती चे आयुष्यातले account closed.
आपण जेव्हा आपलं म्हणतो, एखाद्याशी , अनेक व्यक्तींशी नातं जुळवतो. तेव्हा नुसते तो आपला , ती माझी असे नाते लावून किंवा म्हणून ते टिकत नाही. तर त्यावर मेहनत ही नक्कीच घ्यावी लागते. तर एखादी व्यक्ती आपली आहे म्हणले की ती शेवटपर्यंत आपलीच असे नाते टिकविता आले पाहिजे. मग त्या व्यक्तीचे गुण , दोष ही त्यात आले. त्याचा स्वभाव , त्याचे विचार , वर्तन, आर्थिक परिस्थिती उच्च नीच असेल, मानसिकता , कधी कधी राग , शिक्षण , हुद्दा हे सगळे त्यात आले. एक आहे की जी व्यक्ती आपल्यावर रागावते ती आपल्याला आपले मानते म्हणून रागावते.
जेवढी पटकन ती रागावते तेवढ्याच पटकन ती विसरून ही जाते. आणि रागावली, चिडली , वाद घालू लागली म्हणजे तिचे प्रेम , आपुलकी ही कमी होत नसते. उलट राग शांत झाला की पूर्ववत. म्हणूनच जेव्हा आपले म्हणतो तेव्हा अशावेळी आपण खरेच आपलेपणाने साथ दिली पाहिजे. एक तर अशावेळी शांत राहिले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, समजून सांगितले पाहिजे, किंवा बरोबरीने वाद घालून विषय संपविले पाहिजेत.
किंवा मग तेवढी maturity दाखविली पाहिजे की कितीही negative गोष्टी बोलल्या गेल्या तरी त्याचा मनावर कोणताही परिणाम होवू न देता संयम ठेवला पाहिजे. जेव्हा ती व्यक्ती शांत होईल तेव्हा तिला आपली चूक समजेल .आणि जरी नाही समजली तरी परत तो विषय वाढवला नाही पाहिजे. तो विषय closed.
सगळ्यात महत्वाचे की नात्यात बरेचवेळा वाद होतात, अपेक्षा ठेवल्या जातात. त्या पूर्ण झाल्या नाहीत की चिडचिड आणि एकमेकांवर दोषारोप ठेवले जातात. आणि काही वेळेस चांगली नाती ही दुरावतात. मी का बोलू??मी का नमते घेवू ? मी का फोन करू ? प्रत्येकवेळी असेच घडते, काही काळ गेला की परत तो / ती अशीच वागते. तिला माहिती काही झाले तरी मी नाते तोडणार नाही म्हणून ती माझा गैरफायदा घेते. असे विचार येतात.
पण अशावेळी खरेच कोणी तरी माघार घेणे गरजेचे असते.आणि असे कोणतेच नकारात्मक विचार न करता कोणी तरी म्हणजे जे समजूतदार असेल , नात्याची कदर असेल त्याने पुढाकार घेवून हे नाते आपलेपणाने पुढे घेवून जावे लागते. समोरची व्यक्ती अशी का वागते ? विचित्र वर्तन का घडते ? याचे विचार ही शांतपणे केले तर समजून येईल की ती व्यक्ती ही माणूस आहे. भावना आहेत तिला ही .
आणि ती जास्त संवेदनशील आहे. त्यामुळे एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली , किंवा त्या व्यक्तीला कायमच डावलले गेले , दुर्लक्ष केले गेले, तिला गृहीत धरले गेले तर ती व्यक्ती सुरुवातीला आपणहून आपलेपणाने करणारी व्यक्ती ही अपेक्षा ठेवून जात असते की आपण न बोलता, न सांगता आपल्या व्यक्तीला आपण तीच्याकरिता जे करतो याची जाणीव होईल पण जेव्हा तिची निराशा होते तेव्हा मात्र ती चिडचिड करते, वाद घालते आणि अशावेळी हीच गोष्ट पकडली तर मात्र नाते तुटून जाईल याउलट तिच्या वागण्याचे कारण समजून घेतले तर अजून आपलेपणाने नाते टिकविण्याचा प्रयत्न केला जाणे शक्य.
याशिवाय प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट स्पेस दिली पाहिजे. कायम त्याने कसे वागावे , त्याने काय करावे . मी सांगेन तसेच वागावे , मला या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून ती गोष्ट करताना माझ्या अनुभवाचा , माझ्या सल्ल्यानुसार वागावे हे म्हणणे चुकीचे . समोरच्याला त्याचे एक स्वतंत्र अस्तित्व ही असावे. त्याने त्याचे निर्णय स्वतः घ्यावेत. सतत आपल्या म्हणण्यानुसार त्याने वागावे ही अपेक्षा चूक. आपला त्याच्यावर अधिकार .इतर कोणती नाती त्याने महत्वाची मानली नाही पाहिजेत असे वागून इतका ही possessiveness दाखवू नये.
नातं जवळचे ही असावे .त्यात अंतर ही असावे. प्रत्येकाला स्वातंत्र्य ही असावे. आपुलकी असावी पण त्या व्यक्तीवर आपलाच मालकी हक्क असा attitude नसावा.
नात्याची घुसमट होवू देवू नये. ह्यासाठी नात्यातलं योग्य आंतर कायमच काम करतं. त्यामुळे नातं जोपसलं जातं, आणि जपलंही जातं. नातं आणि योग्य अंतर. आणि सगळ्यात महत्वाचे आपलेपणाची जाणिव. त्या व्यक्तीला क्षणभर जरी परके समजले .. व्यवहार येत गेले. मग आर्थिक असतील , किंवा मी तिच्यासाठी , त्याच्यासाठी इतके केले , तितके केले तिने ही माझ्याकरिता केले पाहिजे ही अपेक्षा.
आणि ती नाही पूर्ण झाली की मग अंतर वाढत जाते.म्हणून दोघांना ही किंवा जी नाती असतील त्यांना एकमेकांना एकमेकांची जाणीव असणे , किंवा त्यांनी आपल्याला ज्या गोष्टी दिल्या , केल्या त्याची जाणीव ठेवणे ही गरजेचे असतें. पण होते काय जे केले त्याची जाणीव , कदर कुठेच राहत नाही. तर जे केले नाही ते मात्र सतत मनात येत राहते आणि त्यातून वातावरण धुमसत राहते.
म्हणून एकदा आपले म्हणले की ती व्यक्ती जशी असेल तशी आपलीच हे मनात गृहीत धरले पाहिजे आणि तसेच कायम वागले पाहिजे. येणाऱ्या चढ उतारात ही एकमेकांची साथ दिली पाहिजे, प्रसंगी appreciate, कौतुक केले पाहिजे. जर साथ मागितली , सल्ला मागितला तर तो ही दिला पाहिजे. काही वेळेस समोरची व्यक्ती खूप confuse असते अशावेळी न सांगता ही मदत केली पाहिजे. सल्ला , मार्गदर्शन केले पाहिजे. अर्थात हे सगळे ठरवताना परिस्थिती आणि समोरच्या व्यक्तीची गरज , मानसिकता याचा अभ्यास खूप सखोल असला पाहिजे.
माझ्या दृष्टीने येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काही न काही शिकवत असतोच, आणि प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतोच… नेहमी प्रमाणे प्रत्येक नाते हे वेगवेगळ्या घडामोडींनी भरलेलं असणारच…! प्रत्येक वेळी मागे वळून बघताना आपले आपणच आपल्यालाच नव्याने सापडणे.. ती व्यक्ती आपल्याला नव्याने सापडत जाते., आयुष्यातले विविध रंग वेळोवेळी चकित करतातच..!
एकदा नात आपलं झालं म्हणजे केवळ आपलं आहे म्हणून नातं टिकत नाही तर आपलेपणाने वागता आलं पाहिजे.
आयुष्य सुंदर आहे. नशिबाने , सुदैवाने तुम्हाला जी आपली लोक मिळाली आहेत. त्यांच्यातले गुण शोधा. दोष तर प्रत्येकात असतात पण तेच धरून पुढे जावू नका. आपलेपणाने आपल्या व्यक्तीला कायम साथ द्या. सोबत रहा. काही वेळेस physical अंतर येते, कधी कधी मने दुरावतात. अशावेळी गैरसमज दूर करा. नात्यात वाटणारी insecurity कमी करा. ठामपणे नाते घट्ट आहे ते तुटणारे नाही याची जाणीव , विश्वास द्या. पण एकमेकांना थोडी स्पेस द्या. वेळ द्या. वेळ हे सगळ्या वरचे उत्तम औषध आहे. जेव्हा वेळ जाईल तेव्हा पुढे जाताना इतरांची वागणूक आपल्या व्यक्तीची , नात्याची व्यक्ती तिची वागणूक क्षणोक्षणी जाणवू लागते. आणि ते अंतर मग बोलून संवाद साधून , सहवासाने परत कमी होते.
आयुष्यात चढ उतार हे कायम येत असतात पण ते कोणासोबत पार पाडायचे हे आपण ठरवायचे असते. कोणीतरी आपल्यासाठी आहे ही जाणीव असणे ही खूप मोठी गोष्ट असते. सुखात , आनंदात अनेक जण सहभागी होतात. पण आयुष्यात अशी एक तरी आपलेपणा असलेली व्यक्ती असते. जी एकवेळ सुखात नसेल पण आपल्या सोबत दुःखात , अडचणीत , संकटात कायम ठामपणे आपल्या सोबत ती आपली व्यक्ती असते. तिला ओळखा आणि तिला जपा.
नात्यात चूक आणि बरोबर असे नसते. नात्यात २+ २ = ४ हे लॉजिक नसते. ते work होत नाही. अनेकदा असे होते की आपण argument जिंकतो आणि नाते गमावून बसतो. वाद म्हणून जिंकण्याचा थोडा आनंद मिळेल पण आपल्या व्यक्तीला कुठे तरी हरवून बसू आपण.
आपल्या माणसांच्या चुका पोटात न घालणे ही आपली चूक असते. नात्यांना कोणी ठोकताळे लावत नसतात आणि ते लावू नयेत. जर कोणी नात्यांचे हिशोब ठेवले , तुझे गुण किती माझे किती असे ठोकताळे लावले तर आयुष्यात ती व्यक्ती जिंकेल पण नात्यांमध्ये ती व्यक्ती हरेल.
माझे काय म्हणणे यात यश नाही. माझी आपली माणसं कोण ,माझ्या घरचे कोण, आपले नात्याचे कोण त्या सगळ्यांना समजून घेवून, त्या सगळ्यांची मूठ बांधून त्यांना एकत्र ठेवून त्यांना आपल्या बरोबर पुढे घेवून जाणे हे आयुष्याचे आणि नात्याचे खरे यश आहे. प्रसंगी
मान खाली घालावी लागते. ऐकून घावे लागते , माघार घ्यावी लागते, आणि हे सगळे हसऱ्या चेहऱ्याने आणि आनंदाने आणि मानाने आणि मनाने करावे लागते.
सतत मी कशी बरोबर , माझे काय म्हणणे हे करण्यात नात्यांचे यश नाही. कुठलेही नाते आपोआप work होत नाही. त्या नात्यावर रोज काही तरी काम करावे लागते. काही तरी द्यावे लागते. त्या नात्याकडून रोज काही तरी शिकावे लागते. त्या नात्यासाठी रोज त्याग करावा लागतो. आयुष्यभर तडजोड करावी लागते. माघार घ्यावी लागते.
केवळ आपलं आहे म्हणून नातं टिकत नाही तर आपलेपणाने टिकविता आलं पाहिजे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

