मन मोकळं होत नाही तोपर्यंत जीवन सुद्धा मोकळं होत नाही.
मेराज बागवान
ह्या मनाबद्दल काय काय बोलायचे? डोळ्यांना दिसत नाही मात्र ह्याच्या करामती खूपच निरनिराळ्या.सगळं काही ह्या मनामुळेच सुरू असते. ते म्हणतात ना ,’मनाचे खेळ’.अगदी तसेच.ह्या मनामध्ये प्रचंड ताकद असते.हे मन काहीही करू शकते.कधी आनंदाने भरून असते तर कधी डोंगराएव्हढे दुःख घेऊन बसलेले असते.
ह्या मनामुळेच आपले जीवन सुरू असते.जसे आपले मन तसे आपले जीवन घडत जाते.म्हणूनच ह्या मनाचा आणि जीवनाचा खूप जवळचा संबंध आहे.हे मन विविध रंगांनी रंगलेले असते,भरलेले असते.पण असे जरी असले तरी हे मन मोकळे होणे फार फार गरजेचे असते.कारण,मन मोकळं होत नाही तोपर्यंत जीवन सुद्धा मोकळं होत नाही.
मनामध्ये कित्येक काळापासून काही गोष्टी साचलेल्या असतात.कधी त्या गोष्टी चांगल्या असतात तर कधी कटू.पण कशाही गोष्टी असतील तरी त्या फक्त मनात राहून उपयोग नसतो.कारण गोष्टी मनात राहिल्या की जीवन जणू एकठिकाणी ठप्प होऊन राहते.आजच्या बोली-भाषेत म्हणायचे तर जीवन ‘Stuck’ होऊन जाते.म्हणूनच,मन मोकळं होणं गरजेचच असतं. एकदा का मन मोकळे झाले की जीवनाचा मार्ग स्पष्ट होतो आणि एक प्रकारची मनःशांती लाभते.
काही जणांना वाटत असते.’मी नाही कोणाशी काही माझ्या गोष्टी शेअर करीत’.हा त्यांचा स्वभाव असतो.पण फक्त कोणाकडे बोलूनच मन मोकळे होते असे नाही. तर ,स्वतःशी शांतपणे संवाद साधून देखील मन मोकळे होते.कधी स्वतःच्या डायरीत मनातल्या गोष्टी लिहून काढल्या तरी देखील मन मोकळे होते.काही जण कविता लिहून स्वतःचे मन मोकळे करतात तर काही जण गोष्टी लिहून मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात.कोणीतरी विश्वासू व्यक्ती मन मोकळे करण्यासाठी असेल तर उत्तमच.अशी वव्यक्ति तुम्हाला नक्कीच समजून घेऊ शकते.आणि यामुळे तुम्हाला एक प्रकराचा मानसिक पाठिंबा मिळू शकतो.आजच्या युगात,सगळे जण स्वतःच्याच धुंदीत आयुष्य जगत आहेत.त्यामुळे व्यक्ती मन मोकळे करायला भेटतीलच असेल नाही.पण वरील काही माध्यमे तुम्ही मन मोकळे करण्यासाठी नक्कीच वापरू शकतात.
मन मोकळे करण्याचे मध्यम महत्वाचे नाही,तर मन मोकळे होणे गरजेचे आहे.काही गोष्टी तुमचे मन कायम धरून ठेवते.खरे तर अशा गोष्टी धरून तुम्हीच तुम्हाला त्रास करून घेत असतात.’कोणीतरी मला खूप बोलले, मला त्रास दिला,वाईट बोलले,फसविले’वगैरे वगैरे विचार घटना घडून गेल्यानंतर देखील मनात साचलेले असतात.पण हा सर्व भूतकाळ असतो.जो की बदलता येणारा नसतो कारण तो घडून गेलेला असतो.मग अशा गोष्टी धरून काय उपयोगाच्या. त्याऐवजी त्या सर्व गोष्टी कोणाशीतरी बोलून,व्यक्त होऊन रिकाम्या केल्या पाहिजेत.म्हणजे नवीन गोष्टींसाठी तुमचे जीवन तयार असेल.कायम लक्षात ठेवा,मागच्या गोष्टी सोडून दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही.म्हणूनच मन मोकळे करा,म्हणजे जीवन आपोआप मोकळे होईल.
आयुष्यात अशा काही वाईट गोष्टी, घटना घडून जातात की तुम्ही कायम त्या मनात ठेवतात.मान्य आहे,ज्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळते त्या गोष्टी विसरणे अशक्य आहे.पण त्याच गोष्टींना स्वतःची ताकद बनवून पुढे वाटचाल करायला तुम्ही शिका.आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही त्या गोष्टी मनात साठवून ठेवणार नाही आणि त्या गोष्टी व्यक्त करायला तुम्ही शिकाल.
छान, चांगल्या गोष्टी देखील मनात असतातच कायम.पण त्या चांगल्या जरी असतील तरी त्यांना कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागतो.मग कारण काहीही असेल.म्हणून त्या चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवून पुढे जायला हवे.
एखादी कितीही चांगली किंवा वाईट गोष्ट असेल तरी ती गोष्ट म्हणजे तुमचे संपूर्ण आयुष्यच असते असे नाही.ती फक्त एकच गोष्ट घेऊन बसलात तर पुढे जीवनात वेगळे असे तुम्ही काहीच करू शकणार नाही.म्हणून ह्या सर्व प्रकारच्या भावना मोकळ्या करायला लागा म्हणजे आयुष्यात नवनवीन Milestones तुम्ही मिळवू शकाल.
मन मोकळे होणे म्हणजेच काय तर Express होणे.काही जण म्हणतील मला नाही आवडत असे काही.आणि जर का तुम्ही ह्या पैकी असाल तर कृपया कृपया Express व्हायला शिका.तुम्हाला जसे आवडते तसे मोकळे व्हा.पण व्हा.जेव्हा तुम्ही मोकळे व्हाल,तेव्हा तुमच्या मनावरची मरगळ दूर होईल,तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला हलके वाटू लागेल.अन्यथा जर तुम्ही मोकळे नाही झालात तर तुमचे मन नेहमी जड राहील.आणि मग तुम्ही नवीन दुसऱ्या कुठल्या गोष्टीनसाठी कायम निरुत्साही असाल.
अनेकजण म्हणतात ,माझ्या आयुष्यात वेगळं अस काही घडतच नाहीये.रोज तेच ते आयुष्य. बोअर झालं आहे.पण ह्या मानसिक स्थितीला तुम्ही स्वतःच जबाबदार असतात.म्हणून काही गोष्टी वेळीच मोकळ्या करायला शिका म्हणजे आयुष्य ‘बोअरिंग’ वाटणार नाही.तुम्हाला जेव्हा असे वाटेल की मनात खूप काही साचलं आहे त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करू नका तर बोलून मोकळे व्हा,स्वतःला व्यक्त करा.
व्यक्त होण्याने अनेक गैरसमज सुटतील.माणसे समजतील.स्वतःची स्वतःशी पुन्हा नव्याने ओळख होईल. आयुष्याला नवीन पालवी फुटेल.जीवनाचा मार्ग स्पष्ट होईल आणि शांती लाभेल.म्हणून जीवन मोकळं करण्यासाठी पहिलं मन मोकळं करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

