आपलं आयुष्य सुंदर बनवणे हे आपल्या हातात आहे, कसे ते वाचा या लेखात.
हर्षदा पिंपळे
अंगणातील मोगरा इतका बहरला होता की काय करावं आणि काय नाही काहीच कळत नव्हतं.अंगणभर त्या मोगऱ्याचा घमघमाट पसरला होता.सगळच वातावरण कसं प्रसन्न आणि धुंद झालं होतं.त्या फुललेल्या मोगऱ्याकडे पाहून आयुष्यच धुंद झाल्यासारखं वाटत होतं.
अर्थात , हे सगळं काल्पनिक !
पण खरचं मोगऱ्याला पाणी घातल्याशिवाय हे शक्य आहे का ?
तर नाही.एकतर पावसाची वाट पाहावी लागेल किंवा कुणीतरी पाणी घालेल या आशेवर त्या मोगऱ्याला सोडावं लागेल.
एखाद्या रोपाला पाणी घातलं,त्याची निगा राखली, छान काळजी घेतली तरच ते छान वाढू शकतं.त्याला हिरवीगार पालवी फुटू शकते.रंगीत फूलं येऊ शकतात.आपल्या आयुष्याचं अगदी असचं आहे.आपल्याला आयुष्य
मिळालय खरं,पण ते सुंदर बनवणं आपल्या हातात आहे.
निसर्गाने इथे असलेल्या प्रत्येकाला आयुष्य दिलं आहे.ज्याला जमेल तसं तो जगण्याचा प्रयत्न करतो.आयुष्यात दिवसागणिक काही ना काही घडत असतं.कधी चांगलं तर कधी वाईट घडत असतं. आयुष्याची जागा खूप विस्तीर्ण आहे. आपण ती वेगवेगळ्या गोष्टींनी व्यापायला हवी. आपल्या आयुष्यात आपणच रंग भरणं गरजेचं असतं.तरच आयुष्याची रांगोळी सुंदर दिसते.
सगळं चांगलं चालू असताना अचानक एखादा प्रसंग असा उद्भवतो की,त्या क्षणाला सगळं संपल्यासारखं वाटतं.आयुष्याची रंगत निघून गेल्यासारखं वाटतं. आयुष्यात करण्यासारखं आता काहीच उरलेलं नाही
अशी भावना मनात घर करून राहते.अगदी असलेलं आयुष्य अनेकजण संपवायला निघतात.
कधी करिअरचे तीन तेरा वाजतात.करिअरच्या कोणत्या वाटा निवडाव्यात काहीच कळेनासं होतं.कधी निर्णय चुकतात आणि प्रचंड त्रास होतो.कधी कधी मनावार वेगवेगळे आघात होतात.ते भरून काढणं जमेनासं होतं. कधी आर्थिक दृष्टीने कमजोर झाल्यासारखं वाटतं.नातीगोती, आजुबाजूला असणारी माणसही नकोशी होतात. कधी कधी सगळं चांगलं असूनही चुकल्यासारखच वाटतं.मग तासनतास चर्चा सुरू होते यावर.असच का ? तसं का ? या सगळ्यामध्ये आयुष्य जगायचं मात्र राहून जातं.आपलं आयुष्य आपणच सुंदर करायचं असतं हे आपण विसरून जातो.
~~
क्षमाचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं होतं.लहानपणी झालेल्या अपघातात तिचे दोन्ही पाय गेले.तिच्या आईबाबांना त्यावेळी प्रचंड त्रास झाला.रोज त्यांना हे दुःख सलत होतं.क्षमा जसजशी मोठी होत होती तसतसं तिला तिच्या गमावलेल्या पायांच दुःख प्रकर्षाने जाणवत होतं.आपल्या अशा अवस्थेमुळे घरच्यांना किती त्रास होत असेल या विचाराने ती कायम त्रस्त असायची.आपण काहीच करत नाही याचा तिला प्रचंड त्रास व्हायचा. वर्षामागून वर्ष सरत होती.क्षमालाही तिच्या अशा निरर्थक जगण्याचा कंटाळा आला होता. नको नको ते विचार तिच्या मनात यायचे. एकतर सगळं संपवून निघून जावं नाहीतर काहीतरी तरी करावं असं तिला वाटत होतं.
शेवटी असचं मिळालेलं आयुष्य असं संपवण्यात काही अर्थ नाही.याची तिला जाणीव झाली.तिच्यासारखेच असंख्य या जगात आहेत हे तिने.मान्य केलं.पाय गमावले आहेत, पूर्ण आयुष्य नाही. हे तिने स्वतःलाच समजावलं.हळुहळू तिने तिची आवड शोधायला निर्माण केली.तिला चित्रकलेत प्रचंड रस होता.
पायांच दुःख बाजूला ठेवून तिने चित्रकलेत स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं.बाहेर जाता येत नसल्याने घरच्या घरीच ती बघून बघून बेसिक शिकली.नंतर मात्र तिचं चित्रकलेवरचं प्रेम पाहून तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी घरीच क्लास भरवले.आईबाबांचा असलेला सपोर्ट तिला प्रचंड प्रेरणा देत होता.तिला आईबाबांचा विश्वास सार्थ करून दाखवायचा होता.शेवटी, रोजच्या सरावाने क्षमाने चित्रकलेला जिंकलं होतं.
ती आता चित्रकलेत चांगलीच पारंगत झाली होती.वेगवेगळ्या स्पर्धेत तिने विशेष प्राविण्य मिळवायला सुरुवात केली होती.कालांतराने ती इतकी पारंगत झाली की तिने तिच्या चित्रांच प्रदर्शन भरवायला सुरुवात केली.तिने प्रचंड मेहनत आणि महत्वाकांक्षेच्या जोरावार तिची विशेष चित्रकला स्कूल चालू केली.
आपलं आयुष्य आपण सुंदर करू शकतो हे तिने सगळ्यांना दाखवून दिलं.
तुम्हीही वाट कसली पाहताय ?
आयुष्य सुंदर करायचं आहे तर क्षमासारखच स्वतः रंग भरायला शिका.आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

