मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या की टिकतं.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“खरंच आधीचे दिवस कितीतरी चांगले होते अस वाटतंय मला. श्रीमंती नसेल कदाचित त्यावेळी, महागड्या वस्तू नसतील पण निदान मन तरी जुळेलेली होती, हा असा दुरावा नव्हता. तेव्हा अगदी कित्येक दिवस भेटलो नाही तरी जवळच आहोत अशी भावना होती आणि आता; आता एकत्र असूनही अस वाटतं की एकमेकांपासून फार लांब गेलो आहोत.” प्राची रडवेली होऊन बोलत होती. मनात जे काही साठलेलं होत ते बोलण्यातून, अश्रुंमधून बाहेर पडत होत. जयला काही बोलता देखील येत नव्हत.
कारण त्यालाही ठाऊक होत ती बोलत होती त्यात तथ्य होत. आता खरच अशी परिस्थिती होती की तो तिला पाहिजे ते विकत आणून देऊ शकत होता. पण तिला हवं असलेलं प्रेम, त्याचा वेळ, तिला समजून घेणं असेल किंवा तिच्या भावना जाऊन घेणं असेल त्याला आता काहीच शक्य होत नव्हतं, इतका तो स्वतःच्या कामात, विश्वात व्यस्त होऊन गेला होता.
दोघांचं लव्ह मॅरेज होतं. आता त्याने स्वतःच साम्राज्य उभ केल होत. पण लग्नाच्या आधी किंबहुना लग्नाची सुरुवातीची काही वर्ष तशी परीक्षा पाहणारीच होती. त्रास होता, यावेळी आपली माणसं कोण हे देखील समजल. पण तरीही ही दोघं एकमेकांना धरून राहिली, दोघींनीही जास्त त्रास करून घेतला नाही, उलट संयमाने, धीराने सर्व सांभाळलं. त्यावेळी तस पाहायला गेलं तर जयकडे काहीच नव्हत.
आजूबाजूला पाहिलं तर लोक स्वतःच्या आयुष्यात स्थिर झाली होती, नव नवीन यशाची शिखर चढत होती. अश्या वेळी हे दोघं स्वतःच आयुष्य सुरु करण्याची तयारी करत होते. त्या परिस्थितीत जयकडे तिला द्यायला अस काहीच नसायच. पण तिने कधी कसली मागणी केली नाही ना कसला हट्ट धरला नाही.
खूप समजुतदारपणे ती सर्व सांभाळत होती. याचाच त्याला आधार वाटत असे. याच बरोबर हे देखील खर होत की जरी तो तिला मोठ मोठी आश्वासन देऊ शकत नसला, तिच्यासाठी फार काही करू शकत नसला तरी तो शक्य त्या परीने तिचं मन जपायचा. त्यांच्या लांब राहण्यात देखील जवळीक होती.
नेहमीच्या साध्या साध्या गोष्टी, मग ते तिच्या आधी उठून नाश्ता बनवणं असेल किंवा मग तिला घेऊन बागेत जाण असेल. जय सर्व काही करत असे. अश्या काळात आपल्याला आपलं माणूसच तर जवळ हवं असत. तेच इथे होत. त्यांचं लग्न पण अगदी साध्या पद्धतीने झालं होत.
कारण जयच आधीपासून म्हणणं होत की जे काही असेल ते मी माझ्या पायावर करणार. त्याला कसलाही बडेजाव नको होता. प्राचीच मत पण तसच होत. मोजक्या लोकांच्या हजेरीत त्यांनी लग्न केलं होत. त्यावेळी कसलही हौस प्राचीला करता आली नाही. पण जयने हे सर्व स्मरणात ठेवलं होत. तिला आता जे सुख मिळालं नाही ते सर्व तो तिला नंतर देणार होता.
लग्नानंतर त्यांचा पहिल्या पाडव्याला जयने प्राचीला एक छोटीशी सोन्याची नथ भेट म्हणून दिली होती. किती आनंदून गेली होती ती. अजूनही तिने ती नथ जपून ठेवली होती. त्यावेळी त्यांच्या आयुष्यात ना श्रीमंती होती, ना थाटमाट, ना म्हणावी तशी स्थिरता. होता तो विश्वास, आदर, प्रेम आणि एकमेकांचा असलेला आधार.
कितीही काम असल तरी वाढदिवसावेळी जय प्राचीसोबत वेळ घालवत असे. दोघंही समदृकिनाऱ्यावर फिरायला जात. तासनतास गप्पा मारत बसत. त्याची कधी चिडचिड झाली तर प्राची देखील पटकन दुखावून न जाता त्याला समजून घेई, त्याला त्याचा असा वेळ देऊन नंतर त्याच्याशी बोले.
विरेन म्हणजे त्यांचा मुलगा, त्याच्या जन्माच्या वेळी जय बाहेरगावी होता. एका महत्त्वाच्या कामानिमित्त त्याला जावं लागलं होत. अश्या वेळी त्याने प्राची सोबत असणं अपेक्षित होत. जेव्हा त्याला याबद्दल समजल तेव्हा तो लगेच यायला निघाला होता पण प्राचीने त्याला त्याचं काम पूर्ण करून यायला सांगितल. इथे तिची काळजी घेणारी माणसं आहेत, तू तुझ काम सोडून येऊ नकोस.
तिच्या समजूतदारपणावर जयला काय बोलावं हे समजेना. जेव्हा तो आला तेव्हा विरेन झाला होता. सर्व जण त्याला बोलले पण प्राची मात्र काहीच बोलली नाही. तिला माहित होत की तो जे काही करत होता त्यांच्यासाठीच करत होता. त्यानंतर हळू हळू परिस्थिती सुधारत गेली. पण जसं आपल्याला काहीतरी मिळत जात तस आपण काहीतरी गमावत पण जातो.
आता पैसा होता, घर, गाडी, काम सर्व काही होत. पण बायको, मुलाला द्यायला वेळ नव्हता. पाहिजे ती आणून द्यायची ऐपत होती, पण प्राचीला कधी त्याच्याशी बोलायच असल, काही सांगायचं असल तर तो जागेवर नसे. विरेन तर त्याच्या बाबसोबत खेळायला कासावीस व्ह्यायचा. पण जय कधी घरी यायचा आणि कधी जायचा हे समजायचं नाही. हल्ली त्याच्या काही लक्षात देखील राहत नसे.
आता फक्त वचन होती, शब्द होते पण समजून घेणं नव्हत. सुरुवातीला ज्या आधारावर त्यांचं नात टिकून होत तो आधारच कुठेतरी हिरावून घेतल्यासारखं झालं होत. स्थिर व्ह्यायच्या, श्रीमंत, सर्व काही मिळवण्याच्या नादात जय हळू हळू स्वतःच्याच कुटुंबापासून लांब होत चालला होता. प्राची गेले कित्येक दिवस हे सर्व अनुभवत होती, त्याला सांगू पाहत होती. पण त्याच्यापर्यंत ते पोहोचत नव्हत. आज मात्र तिने हे सर्व बोलून दाखवलं. त्याला आरसा दाखवला.
खरच आहे. नात्यामध्ये नुसते शब्द नुसती आश्वासन असून चालत नाहीत. तिथे समजून घेणं, वेळ देणं लागत. जवळीकता लागते. कारण नात नुसत्या शब्दांवर कधीही टिकत नाही. आपल्याला वाटत वस्तू खरेदी करून दिल्या, पैसे दिले की माणूस खुश होतो. पण अस नाही. यात माणूस फार काळ सुखी राहू शकत नाही.
जिथे न सांगता आपल्याला काय म्हणायचं आहे ते समजून घेतलं जातं, आपल्याला सांभाळून घेतल जात, आपल्या भावना समजून घेतल्या जातात तिथेच नात चांगल टिकत. आणि या गोष्टी दोन्ही बाजूंनी व्हाव्या लागतात. कारण नात दोघांमध्ये असत. रथाची दोन्ही चाक नीट असली तरच रथ पुढे जातो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

