Skip to content

आपल्या आनंदी जीवनाला आपणच कसे विरजण लावतो, वाचा या लेखात.

आपल्या आनंदी जीवनाला आपणच कसे विरजण लावतो, वाचा या लेखात.


मेराज बागवान


आनंदी जीवनाची व्याख्या अशी काही नसते.पण ती प्रत्येकाच्या दृष्टिकोयानुसार वेगवेगळी असते.कोणी पैशात आनंद मानतो,तर कोणी चांगल्या नातेसंबंधात.कोणी एकटा राहून आनंदी असतो तर कोणी समूहात.कोणी प्रेमामुळे आनंदी राहतो तर कोणी प्रॉपर्टी मुळे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी.अशी ही आनंदाची व्याख्या व्यक्तीनुसार बदलत जाते.ही आनंदाची व्याख्या असू देखील शकते.पण कधी कधी,हाच आनंद आपण स्वतः हाताने उद्धवस्त करून टाकतो.आणि आयुष्याला मग स्वतःच्या हाताने विरजण लावले जाते.

परीक्षेत कधी तरी अपयश मिळते,किंवा नोकरी ,करीअर मध्ये अपयश अनुभवावे लागते.मग काही जण अपयश आले म्हणून उदास ,हताश होतात आणि अगदी नैराश्यात जातात.फक्त करिअर म्हणजे आयुष्य नव्हे.किंवा एखादे अपयश आले की आयुष्य संपले असे होत नाही.पण अनेकजण असा विचार करीत नाहीत आणि आयुष्यातील आनंद हरवून बसतात.

एकतर्फी प्रेमाचे तर विचारायलाच नको.आजची तरुण पिढी बरेचदा नकार पचवू शकत नाही.आणि मग यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास देणे,तिची बदनामी करणे ,अत्याचार,अशा हिंसक घटना त्या व्यक्तीच्या हातून घडतात.कधी प्रेम मिळाले नाही म्हणून नैराश्यात ती व्यक्ती जाते.वास्तवाचे भान तिला राहत नाही.आणि मग समोरचा आनंद देखील येतो आणि निघून जातो आणि ह्या सगळ्याला ती व्यक्ती स्वतः जबाबदार असते ना की इतर कोणी.एखाद्याचे व्यक्तीचे प्रेम मिळाले नाही म्हणून काही आयुष्य थांबत नाही.पण काही व्यक्तींना हे लक्षात येत नाही आणि यामुळे ते स्वतःच स्वतःच्या आनंदावर विरजण घालतात.

समाजात वावरत असताना निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्ती भेटतात.प्रत्येकाची मते वेगवेगळी असतात.मग कधी तरी मतभेद होतात.आणि त्याचे रूपांतर मनभेदात व्हायला अनेकदा वेळ लागत नाही.मग काही जण मनात त्याच गोष्टी धरून ठेवतात आणि तसेच जगत राहतात.पण त्यांचे जगणे पुढे सरकतच नाही.ते त्याच त्याच गोष्टी उगाळत बसतात आणि मानसिक स्वास्थ्य यामुळे बिघडते आणि मग कशातच मन रमत नाही आणि मन आनंदी देखील राहत नाही.”तो मला असे म्हणाला,मुद्दामच म्हणाला असेल ,मलाच खाली दाखविण्याचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे” असे सतत विचार चालू राहतात आणि आनंदावर विरजण पडायला वेळ लागत नाही.

कधी घरात देखील भांडणे,वादविवाद होतात.एकमेकांवर राग काढला जातो आणि टोकाची भूमिका प्रत्येकजण घेत राहतो.कोणीच मागे हटायला तयार होत नाही.अहंकार,लोभ,ईर्षा ह्या गोष्टी मनात फेर धरू लागतात आणि मग आयुष्यातील आनंद संपू लागतो. आणि हे सर्व होते ते स्वतःच्याच वागणुकीमुळे.कोणीच स्वतःमध्ये बदल करायला तयार नसतो.यामुळे फक्त अहंकार टिकून राहतात आणि आनंद मात्र विरून जातो.

असेच काहीसे प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडत असतात.अशाच काही घटना घडत असतात.ज्यामुळे आपणच आपल्या आनंदावर विरजण लावतो.आणि नशिबाला,परिस्थतीला ,इतरांना दोष देत बसतो.पण खरे तर आपला आनंद आपल्याच हातात असतो.आनंद टिकवून ठेवण्यासाठी खूप कष्ट नाही लागत.पण छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिले तर आयुष्य सहज सोपे होऊन जाते.कधी व्यावहारिक वागून तर कधी थोडे मागे हटून, अहंकार बाजूला ठेवून थोडे दुसऱ्यासाठी जगले की जीवन आनंदी बनते.पण हे प्रत्येकाला जमतेच असे नाही.पण अशी मानसिकता ठेवणे आज काळाची गरज बनलेली आहे.

आज जो तो स्वतःचे आधी पाहतो आणि मग दुसऱ्याचे.यामुळे तात्पुरता आनंद तर मिळतो पण नंतर माणूस असमाधानीच राहून जगत राहतो.आयुष्य खूप छोटे आहे,अगदी छोटे.पण आपण नको त्या गोष्टी कायम मनात धरून ठेवतो आणि आनंदावर विरजण घालतो.म्हणून ‘सोडून द्यायला शिका’.कारण धरून बसलात तर आयुष्य ह्यातच जाईल. मग वेगळे असे काही घडणारच नाही.

जी गोष्ट आयुष्यात मिळवायची आहे.त्यासाठी प्रयत्न तर नक्कीच केले पाहिजेत.पण प्रयत्न करून देखील ती गोष्ट मिळत नसेल तर सोडून द्यायला देखील शिकले पाहिजे.कारण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मिळत नसते.कधीच असे होत नाही.म्हणून वास्तव स्वीकारून काही गोष्टी सोडून देता यायला हव्यात आणि पुढे जाता यायला हवे.

आजकाल अनेकजण मानसिक आजारांना बळी पडलेले आहेत.किंबहुना अनेकांना मानसोपचार तज्ञांचे उपचार देखील सुरू आहेत.ह्या आशा विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस समाजात वाढलेले दिसत आहेत.ह्याला कारण स्वतः तो व्यक्ती आहे.सतत चिंता,ताणतणाव,भीती,राग,अहंकार यामुळे माणूस ह्या आजारांना स्वतःहून आमंत्रण देत आहे. म्हणून वेळीच हे सर्व जाणून जागे होणे गरजेचे आहे.

कोणी आवडती अन्नपदार्थाची डिश खाऊन आनंदी होतो तर कोणी करोडो रुपये मिळवून देखील उदास बसून असतो.असा हा आनंद खूप खूप छोट्या छोट्या गोष्टीत आहे.तो समजून घेता आला पाहिजे.नको तो अट्टाहास कमी करता आला पाहिजे.म्हणजे आनंदावर विरजण पडणार नाही.

विधात्याने खूप सुंदर आयुष्य दिले आहे. ते आणखीन सुंदर बनविण्याचा प्रयत्न व्हायला हवा…बस इतकेच!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!