Skip to content

समोरचा आपल्याविषयी काय विचार करतोय, हे असं जाणून घ्या.

समोरचा आपल्याविषयी काय विचार करतोय, हे असं जाणून घ्या.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणसाची एक प्रवृत्ती आहे. त्याला समोरचा आपल्याविषयी काय विचार करतो, त्याचे आपल्याबद्दल काय मत आहे, हे जाणून घ्यायची नेहमीच उत्सुकता असते. समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नेमक काय चालू आहे हे सतत शोधण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. पण हे शक्य होत का? खरच आपल्याला समोरचा आपल्याविषयी काय विचार करत आहे हे जाणून घेण्यात यश मिळत का? जरी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी ते अंदाज कितपत खरे ठरतात? खूप कमी. याच कारण आपण दुसऱ्या व्यक्तीचं मन कधीच वाचू शकत नाही. अस कोणाचंही माईंड रीडींग करता येत नाही. का येत नाही? कारण आपल्याला कोणाच्या मनात काय चालू आहे हे नाही समजू शकत. ही एक वैचारिक चूक आहे जी आपण खरी मानून चालत असतो आणि त्यातून बरेचदा समस्याच निर्माण होतात.

कारण जेव्हा वाद होतात, भांडण होतात तेव्हा अस पटकन म्हटल जात की मला माहित आहे तू माझ्याबद्दल काय विचार करतो/करते. मी तुला वाईटच वाटत असणार, हिला/ह्याला काही अक्कलच नाही अस तू मनातल्या मनात म्हणत असणार. हे आपणच बोलत असतो. त्या व्यक्तीच्या तोंडातून हे आलेलं देखील नसत. आणि म्हणूनच ती व्यक्ती देखील म्हणते की माझ्या मनात नाही ते बोलू नको. अस का होत? कारण आपण स्वतःचेच काहीतरी अंदाज बांधतो आणि ते खरे मानून चालतो. ते खरे असतातच अस नाही. हे अस दुसऱ्याचं मन वाचून पाहण्याच्या नादात बाकी काही नाही तर गैरसमज जास्त होतात. अस फक्त समोरच्या माणसाकडे पाहून आपल्याला त्याच मन कधीच वाचता येत नाही. मुळातच मन वाचता येणं शक्य नाही. अगदी कितीतरी वर्ष एकत्र राहून देखील बऱ्याचदा अस होत की हा माणूस मला खरंच समजला का? इतक्या अनपेक्षित घटना, कृती माणसाकडून होतात. जवळच्या माणसाच्या बाबतीत जर हे असं होत असेल तर अनोळखी, अगदी किरकोळ ओळख असलेल्या व्यक्तीचं मन आपण काय वाचणार?

तर पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कोणाचंही मन वाचायचं नाही. आपल्याला त्या माणसाला जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जितकं आपण त्या माणसाला जास्त समजून घेऊ तितका तो माणूस आपल्याला अधिक समजत जातो. यासाठी काय महत्वाचं आहे? तर चांगली निरीक्षण क्षमता. आपलं observation चांगल पाहिजे. समोरची व्यक्ती कशी वागते, कशी बोलते आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कसा आहे हे आपल्याला हळू हळू समजत जात जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत वेळ घालवतो, त्याचा दृष्टिकोन समजून घेतो.

आणि या गोष्टी एक दोन दिवसात कधीच होत नाहीत. त्यासाठी वेळ लागतो. माणूस वाचणं म्हणजे त्याला फक्त पाहून त्याच्याबद्दल अंदाज लावणं नव्हे. तर त्या व्यक्तीचे विचार, वागणं, त्याची एखाद्या प्रसंगात भावना व्यक्त करायची पद्धत हे जाणून घेणं. आपल्याला समोरच्या व्यक्तीला अश्या पद्धतीने समजून, जाणून घ्यायचे आहे. आणि आपली ही क्षमता जेव्हा चांगली विकसित होते जेव्हा ती व्यक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू लागते तेव्हा ती कोणत्या प्रसंगात नेमक काय मत मांडेल किंवा कशी वागेल हे आपल्याला समजू लागत.

आपण काही वागलो तर त्यावर त्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया असेल हे आपल्याला समजत कधी? जेव्हा ती व्यक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीने समजते. अस देखील होत की व्यक्ती खूप चांगली माहीत असून आपले तिच्या विषयीचे अंदाज चुकतात आणि हे अस होणारच आहे. कारण माणसाचं मन हे असच कॉम्प्लेक्स आहे. म्हणून गरज असते ती मनमोकळेपणाने बोलण्याची. आपण जोपर्यंत त्या व्यक्तीशी नीट बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही.

म्हणून आपला इतरांशी संवाद पाहिजे, बोलणं पाहिजे. गैरसमज, वाद, भांडण होण्याचं कारणच हे आहे की संवादच होत नाही. दोन्ही व्यक्ती आपलेच काहीतरी अंदाज लावून ते पुढे नेतात. पण जर इथे नीट संवाद केला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो, त्या समजतात. त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करते हे समजून घ्यायचं असेल तर आधी त्या माणसाला अंतर्बाह्य समजून घ्या आणि मोकळा संवाद साधा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “समोरचा आपल्याविषयी काय विचार करतोय, हे असं जाणून घ्या.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!