Skip to content

प्रतिकूल परिस्थितीतून कसे बाहेर पडावे आणि भावनिकरित्या भक्कम कसे व्हावे?

प्रतिकूल परिस्थितीतून कसे बाहेर पडावे आणि भावनिकरित्या भक्कम कसे व्हावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपलं आयुष्य म्हणजे ऊन पावसाच्या खेळासारखं आहे. आज सर्व काही स्थिरस्थावर असलं म्हणजे ते तसंच कायमस्वरूपी असेल असं नाही. आपल्याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ उताराला, आव्हानांना सामोरं जावं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात जसे चांगले तसे परीक्षा घेणारे, प्रतिकूल प्रसंग पण येतात. व्यक्तीनुसार ते बदलत पण जातात. त्यामुळे कोणाची तीव्रता कमी जास्त करता येत नाही. पण तरी देखील बरीच जण अश्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडतात आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करतात.

पुन्हा सर्व मार्गावर आणतात, ज्याला bounce back ability म्हटल जात. पण हे सर्वांनाच जमत नाही. काही जण अश्या परिस्थितीत इतके खचून जातात की त्यांना त्यातून कसं बाहेर पडावं हे समजत नाही. सर्वच बाजूंनी खच्चीकरण झाल्यासारखं होतं. प्रश्न पडतो की यातून बाहेर तरी कसं पडायचं?

कारण बऱ्याचदा अश्या काही गोष्टी घडतात, घटना प्रसंग घडून जातात की ज्यामध्ये आपलं बरंच नुकसान झालेलं असतं. आणि हे नुकसान बऱ्याच प्रमाणत मानसिक त्रास देणार जास्त ठरतं. कारण गोष्टी होऊन गेलेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी लगेच जात नाहीत. आठवणींच्या रूपातून त्या गोष्टी परत परत त्रास देतात. काही वेळा कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसत, कुठेतरी काहीतरी राहून जात असत. अश्या वेळी यातून कसं बाहेर पडायचं, किंवा स्वतःला इमोशनली स्ट्राँग कसं करायचं हे समजत नाही रादर आपण त्या वेळी त्या मानसिकतेतदेखील नसतो.

त्यामुळे समस्या अजून वाढतात. म्हणूनच या समस्या कमी करायच्या असतील, अश्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढायचं असेल तर काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. काही बदल आपल्याला स्वतःलाच करावे लागतात.

सर्वात पहिलं म्हणजे आपल्या विचारांमध्ये करायचा बदल. सर्वात आधी आपल्याला आपले विचार बदलावे लागतात. कारण आपण जे काही अनुभवतो त्याच मुळ आपल्या विचारांमध्ये आहे. जेव्हा वाईट घटना, प्रसंग घडतात, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो त्रास असेल किंवा तो अनुभव आपल्याला इतका मोठा वाटतो, इतका पक्का वाटतो की आता ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा माझ्यासोबत हे जे काही घडत आहे ते कधी संपणारच नाही, हे असच चालू राहणार अस आपल्याला वाटत.

आता जर असे काही वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात घडत आहेत, ज्यातून माझं नुकसान होत आहे ते कधीच भरून निघणार नाही असा आपण समज करून घेतो आणि इथेच आपली चांगले विचार करायची क्षमता थांबते. जर इथून पुढे काही चांगल होणारच नसेल, जर मी यातून बाहेर पडणारच नसेन तर मी करणार तरी काय? जर परिस्थितीच अशी राहणार असेल तर माझ्या हातात काहीच नाही अशी माणसाची मानसिकता तयार होते आणि या परिस्थितीतून बाहेर पडायचे मार्ग सुचायचेच बंद होतात. जे आपणच नकारात्मक विचार करून बंद केलेलं असतात.

म्हणून सर्वात अशी आपले विचार बदलले पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही परिस्थिती आहे तशी टिकत नाही. त्यातून बाहेर पडता येत. हे जोपर्यंत आपण स्वतः ला सांगत नाही तोपर्यंत आपण त्यातून बाहेर पडू शकतं नाही. जेव्हा आपण स्वतः ला ही गोष्ट पटवून देतो की जे काही झालं ते पुन्हा नीट होऊ शकत, त्यातून मार्ग काढता येऊ शकतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागतो.

कारण आपले हे विचार आशा दाखवणारे, सकारात्मक तसच वास्तववादी असतात. आणि हे सिद्ध झालं आहे की सकारात्मक विचार आपल्याला विचार करण्याच्या पुढे जाण्याच्या नवीन वाटा उपलब्ध करून देतात. आपण सर्व बाजूंनी विचार करून वागतो त्यानुसार वेगवेगळे बेत आखतो ते आजमावून पाहतो. हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपल्याला आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकतो हा विश्वास असतो. आणि अश्या पद्धतीने जेव्हा आपण सकारात्मक, वास्तववादी

थोडक्यात तार्किक विचार करून वागू लागतो तेव्हा आपण पुन्हा मूळ पदावर येतो आणि जेव्हा आपल्या विचारांमध्ये सुधारणा होते तेव्हा आपण भावनिक दृष्ट्या देखील भक्कम होत.

कारण जसं आधी म्हटल आपल्या वर्तनावर, भावनांवर सर्वात जास्त प्रभाव हा विचारांचा पडत असतो. ते नीट झाले की या पुढच्या गोष्टी देखील नीट होतात. म्हणून काहीही झालं तरी आपल्या हातात जे काही करण शक्य आहे ते करत राहत, स्वतः वर विश्वास ठेवणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून, त्यांचं व्यवस्थापन करून जर आपण परिस्थिती हाताळली तर आपली समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि आपण पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करू लागतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रतिकूल परिस्थितीतून कसे बाहेर पडावे आणि भावनिकरित्या भक्कम कसे व्हावे?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!