Skip to content

आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते, एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही.

आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते, एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या आयुष्याचा जर आढावा घेतला तर जन्माला आल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही ना काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतो, प्रक्रियेत असतो. लहान असताना आवड होती म्हणून घेतल, आता मोठं झाल्यावर काही मिळवावस वाटत नाही अस कोणीही म्हणत नाही. उलटपक्षी जसं जसं आपलं वय वाढत तस तश्या आपल्या आयुष्याच्या कक्षा रुंदावत जातात आणि आपल्या गरजा पण बदलत जातात.

आपल्याला जे मिळवायचं असत ते ही बदलत जात. सुरुवातीला जे आपण आपल्या सामान्य गरजांमध्ये अडकून असतो त्यापलीकडे जाऊन आपण इतर गोष्टींचा शोध घेऊ लागतो. मग ती नाती असतील, सुबत्ता असेल, समाजातील स्थान असेल, स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणं असेल.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला त्या त्या गोष्टी मिळवायची आसक्ती ही लागतेच. आणि ती लागली पण पाहिजे कारण त्यातच आपला विकास असतो, आपली प्रगती असते. पण हे सर्व करत असताना माणसाला त्याग देखील करावा लागतो. कारण कोणतीही गोष्ट सहजासहजी कधी मिळत नाही. आपल्याला काहीही मिळवायचं असेल तर त्यासाठी काहीतरी गमावाव देखील लागत. जसं बहिणाबाईंनी म्हटल आहे,

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

काहीतरी मिळवायचं असेल तर कष्ट लागतात, आपल्याकडे जे आहे ते गमवायची तयारी देखील लागते. जे आहे त्यावरच आपण अडून बसलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही. जसं पाखरांना आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांचं घरट सोडावं लागतं, तश्याच पद्धतीने आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात.

माझ्याकडे जे आहे ते मी सोडणार नाही आणि तरीही मला नवीन गोष्टी हव्या आहेत अस होत नसत. बरीच मुलं कमी वयात स्वतःच घर सोडून बाहेर शिक्षणासाठी निघून जातात. इथे त्यांचा त्यागच असतो. कमी वयात ते आपल्या आई बाबांना, कुटुंबाला दुरावतात. सुट्टीत जेव्हा कधी परत येताना तेव्हा देखील त्यांना हे माहीत असत की आपल्याला परत जायचं आहे. शिक्षण मिळवण्यासाठी एक चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केलेला असतो.

जसं शिक्षणाचं तसच नोकरीच, कामाचं व्यवसायाच आहे. नोकरीनिमित्त बरीच जण लांबवर जाऊन राहतात, त्यांचं कुटुंब बायको मुल ही सर्व गावी असतात. सुट्टीत कधीतरी यायचं थोडे दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवायचे आणि परत जायचं. ही जी त्यागातून काहीतरी मिळवण्याची प्रक्रिया आहे ती जीवनाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी मध्ये दिसून येते आणि ही प्रक्रिया अशीच चालू राहणार आहे.

चांगल शरीर आरोग्य मिळवण्यासाठी ठराविक आहाराचा, काही आरामदायी गोष्टींचा त्याग केला, आजारापासून मुक्ती मिळावी म्हणून जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ त्यांचा त्याग केला. आपलं तान्हं बाळ नीट झोपाव म्हणून आई आपल्या झोपेचा त्याग करते.

या सर्व गोष्टी मिळवताना काहीतरी गमवाव लागलेलच आहे. तरीही माणसाला त्यात बरेचदा आनंद असतो, हा त्याग पण त्याला सुखद वाटतो, यात काही समस्या वाटत नाही. अस का होत? याच कारण या त्यागातून त्या गोष्टी मिळणार असतात त्या जास्त आनंद मिळवून देणाऱ्या असतात. त्यात स्थैर्य असत, त्यात समाधान असत.

ज्याला आपण अंतिम ध्येय अस म्हणतो. जेव्हा माणूस आपलं अंतिम ध्येय लक्षात ठेवून गोष्टी करायला लागतो तेव्हा त्याचा बराचसा त्याग कमी होतो. मला माहीत आहे की आता मला काहीतरी गमवाव लागत आहे, पण त्यातून जे काही मी मिळवणार आहे त्याचा आनंद या दुःखाहून कितीतरी पटीने जास्त असणार आहे ही गोष्ट जेव्हा माणूस स्वतः ला सांगतो तेव्हा तो ध्येय गाठण्यासाठी अजून प्रेरित होतो. त्यामुळे त्याग हा प्रत्येक ठिकाणी असणारच आहे. पण आपण आपलं अंतिम ध्येय लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार वाटचाल करायची आहे.

कोणीतरी खूप छान म्हंटल आहे,

Sacrifice really means

Giving up something good

For something better


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!